

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या देशामध्ये भूक आणि गरिबीमुळे मरणार्यांची संख्या भरपूर होती. यावर इलाज म्हणून आपण हरित क्रांती यशस्वी केली. हरित क्रांती म्हणजे सर्वांना मुबलक धान्य आपण निर्माण करत आहोत. यानंतर प्रथिनांची आवश्यकता भरून काढण्यासाठी धवल क्रांती म्हणजेच दुधाचे उत्पादन आपण फार मोठ्या प्रमाणावर वाढवले. आज जगामध्ये दूध उत्पादनामध्ये आपला देश अग्रगण्य आहे.
असे सगळे सुरू असतानाच नवीन पिढीसाठी जंक फूड नावाचा प्रकार आपल्या देशामध्ये आला आणि आता चांगल्यापैकी रुजलासुद्धा. जागोजागी तरुण मुले आणि मुली पिझ्झा, बर्गर, चायनीज आणि तत्सम पदार्थ खाताना दिसायला लागले. याचा परिणाम असा झाला की, आपण कुठेही फिरायला गेलो, तर आपल्याला चांगल्यापैकी लठ्ठ लोक दिसण्यास सुरुवात झाली. हरित आणि धवल क्रांतीनंतर देश हा लठ्ठमभारती होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एका सर्वेक्षणानुसार आपल्या देशात 24 टक्के महिला आणि 23 टक्के पुरुष अधिक वजनाचे किंवा लठ्ठ आहेत आणि तीस वर्षांपूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास पाचपट आहे असे नमूद केलेले आहे. लठ्ठपणाचे प्रमाण शहरांमध्ये जास्त आणि ग्रामीण भागात कमी आहे. उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये 41 टक्के महिला लठ्ठ आहेत, तर महाराष्ट्रात 13 टक्के मुले लठ्ठ आहेत. लठ्ठपणामुळे होणारे आजारही फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत.
आम्हाला कमाल याची वाटते की, कधीकाळी अन्नधान्य कमी होते. त्यामुळे आपण कुपोषित होतो. आज या जंकफूडमुळे आपण लठ्ठ होऊन वेगळ्याच आजारांना सामोरे जात आहोत. प्रौढ व्यक्ती तरुण मुलांना जंकफूड खाऊ नका, असे सांगत असतात; परंतु ऐकतोय कोण? घरबसल्या पिझ्झा किंवा बर्गर ऑर्डर करायचे, काही क्षणात ते घरी येऊन पोहोचते आणि पुढच्या काही क्षणात त्याचा फडशा पाडला जातो. या अन्नाचा जीवनसत्त्वे किंवा खनिजे यांच्यासाठी काय उपयोग होतो, हे फक्त देवच जाणे; परंतु हे जंक फूड खाण्याचे फॅड वाढत चालले आहे, हे निश्चित! जंक फूड क्रांती ही देशाला लठ्ठ मुले आणि बेडौल तरुण देणारी क्रांती आहे, अन्य काही नाही, हे आता सिद्ध झाले आहे.
अमेरिकेसारख्या देशात लठ्ठपणा ही राष्ट्रीय समस्या झालेली आहे. आपल्या देशात आधीच असंख्य समस्या आहेत. त्यात नजीकच्या काळात या नवीन समस्येची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आणि आरोग्यदायी सवयी लावण्याचे प्रयत्न करण्याची गरज आता निर्माण झाली आहे, हे निश्चित!