

स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस हा पूर्ण देशामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. नुकताच 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन सर्वत्र उत्साहाने साजरा केला गेला. बालवाडीपासून ते शाळेपर्यंत आणि शाळेपासून ते महाविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या. कधीकाळी आपल्या राज्यातही बडवणारे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक असायचे. आता बडवण्याचे प्रकार बंद झाले आहेत. चुकून शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या पाठीवर धप्पा मारला, तरी तक्रारी होतात आणि शिक्षकाच्या नोकरीला धोका निर्माण होतो. काळ बदलला तसे शिक्षकही बदलले आणि विद्यार्थीवर्गही बदलत गेला.
ज्ञान मिळवण्याची असंख्य इतर साधने विद्यार्थ्यांना आज उपलब्ध झाल्यामुळे ते शिक्षकांवरच अवलंबून असतील अशी काही शक्यता राहिलेली नाही. पूर्वी शाळांमध्ये पाढे पाठ करून घेतले जात असत. कॅल्क्युलेटर आल्यापासून गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी काही सेकंदांत यंत्रावर व्हायला लागल्या. त्यामुळे पाढ्यांचे महत्त्व कमी झाले. 25 पाचे किती हेपण मुलांना माहीत नसते. कारण, 25 गुणिले पाच असा गुणाकार काही सेकंदांत कॅल्क्युलेटरवर करता येतो.
पूर्वी शिक्षक जीव तोडून शिकवायचे आणि विद्यार्थीपण तितक्याच तन्मयतेने अभ्यास करायचे आणि त्यातील काही नाही समजले, तर दुसर्या दिवशी शिक्षकांकडून शंका निरसन करून घ्यायचे. कोरोना काळात आलेल्या ऑनलाईन शिक्षणाने या शिक्षण पद्धतीची वाट लावली असे दिसून येईल. सर्वप्रथम म्हणजे गुगल नावाचे सर्च इंजिन आले. कुठलाही प्रश्न तुम्ही त्यावर टाका. त्याचे उत्तर काही सेकंदांत ते तुमच्यासमोर हजर करते. चॅट जीपीटी नावाचा प्रकार आल्यामुळे तुम्ही प्रश्न टाका. ते उत्तर तयार करून देते. ना विचार करण्याची गरज ना बुद्धीला ताण देण्याची काही गरज. गुरुकुलपासून गुगलपर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे. तुमची शंका अभ्यासक्रमातली असो किंवा दैनंदिन जीवनातील असो, असंख्य पर्याय गुगल तुम्हाला देत असते.
थोडक्यात म्हणजे, या आधुनिक उपकरणांनी शिक्षक-विद्यार्थी या संबंधांनाच वेगळ्या पातळीवर नेऊन सोडले आहे. समजा तुम्हाला गृहपाठ करायचा आहे. यूट्यूबवर तो विषय टाकल्याबरोबर तो गृहपाठ तुमच्यासमोर सादर केला जातो. चॅट जीपीटीच्या माध्यमातून तो गृहपाठ तयार तुमच्या मोबाईलवर येतो. एवढे सगळे असताना पुन्हा शिक्षकाची गरज काय, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल. किंबहुना हा प्रश्न नवीन पिढीच्या मनात निर्माण झालेला आहे, असे समजा. शिक्षकाच्या शिकवण्यामध्ये जे ममत्व, जी जबाबदारीची जाणीव, विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तळमळ असते ती कुठल्याही यंत्रामध्ये येणे शक्य नाही.