Jishnu Dev Varma | जिष्णू देव वर्मा

Jishnu Dev Varma Maharashtra Governor
Jishnu Dev Varma Maharashtra Governorpudhari photo
Published on
Updated on

राजेश नाईक

त्रिपुराच्या राजघराण्याचे सदस्य असलेले जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली. या आधीच्या राज्यपालांसारखे ते केवळ राजकारणी नाहीत, तर खेळाडू, कवी, लेखक असे अनेक आयाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. त्यांचे वडील रामेंद्र किशोर देव वर्मा हे त्रिपुराचे शेवटचे राजे महाराजा वीर विक्रम माणिक्य यांचे लष्करी आणि गृह सचिव म्हणून कार्यरत होते. वर्मा यांनी कोलकाता विद्यापीठातून बी.ए. ऑनर्स ही पदवी संपादन केली आहे. त्यांचे ‘व्ह्यूज रिव्ह्यूज अँड माय पोएम्स’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्यांच्या शिक्षणाचा आणि राजघराण्यातील संस्कारांचा त्यांच्या प्रशासकीय कामावर मोठा प्रभाव दिसून येतो.

1990 मध्ये राम जन्मभूमी आंदोलन टिपेला पोहोचले होते. त्याचवेळी जिष्णू देव वर्मा यांनी या आंदोलनात उडी घेतली. ते भाजपचे सक्रिय सदस्य बनले. त्रिपुरासारख्या डाव्या चळवळीने व्यापलेल्या राज्यात भाजप सारख्या नवख्या पक्षात प्रवेश करणे हेच मोठे धाडस होते. त्यांनी आपले पक्षकार्य नेटाने चालू ठेवले. तरुणांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास उद्युक्त केले. अथक परिश्रम घेत संघटना बांधणीचे काम रात्रंदिवस केले. त्यांच्या या मेहनतीची दखल घेत पक्षाने त्यांना 1993 मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. या काळात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास संपादित केला. त्रिपुरामध्ये भाजपचे बर्‍यापैकी संघटन त्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले. त्याचेच फलित म्हणून 1996, 1998 आणि 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने उमेदवारी दिली.

तेव्हा त्यांना खेळातही रुची होती. ते उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होते. त्यांनी राष्ट्रीय बॅडमिंटन असोसिएशनचे प्रमुख म्हणूनही काही काळ काम पाहिले आहे. त्यांच्यासारख्या नेत्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे त्रिपुरामध्ये 2018 मध्ये भाजपचे सरकार येऊ शकले. या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. 2023 पर्यंत ते या पदावर होते. या काळात त्यांनी वित्त, ऊर्जा, नियोजन, पंचायत राज आणि ग्रामीण विकास यांसारख्या विभागांचे नेतृत्व केले. आर्थिक नियोजन, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यावर त्यांनी भर दिला. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्रिपुराच्या विकास प्रक्रियेत त्यांच्या नेतृत्वाची नोंद ठळकपणे घेतली गेली.

2024 मध्ये त्यांना तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वांत महत्त्वाचे आणि राजकीयद़ृष्ट्या संवेदनशील असलेले राज्य आहे. काही अपवाद वगळता महाराष्ट्राच्या आजवरच्या राज्यपालांनी आपली प्रतिष्ठा काटेकोर जपली आहे. सुसंस्कृत घराण्यातून आलेले जिष्णू देव वर्मा या पदाला नक्कीच जपतील. राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असला, तरी विरोधी पक्षांसाठी न्याय मागण्याचे एक केंद्रही आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यपाल पदापर्यंत पोहोचलेले जिष्णू देव वर्मा यांना सामान्यांच्या प्रश्नांची नक्कीच जाण आहे. येत्या काळात ते आपली जबाबदारी कशा पद्धतीने निभावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news