

युवराज इंगवले
पदभार स्वीकारून एका वर्षापेक्षा कमी कालावधीतच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी नुकतीच देशाच्या सर्वोच्च पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे जपानच्या राजकारणात पुन्हा अस्थिरतेचे ढग दाटून आले आहेत. इशिबा म्हणाले की, मी या पदाला चिकटून राहणार नाही आणि जे करायला हवे ते पूर्ण झाल्यावर योग्य वेळी राजीनामा देईन, असे मी नेहमीच म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत आयात शुल्क करार यशस्वी केल्यानंतर आता सूत्रे दुसर्यांच्या हाती देण्याची वेळ आली आहे, असे सांगताना हा निर्णय वेदनादायी असल्याचेही त्यांनी मान्य केले. इशिबा यांच्या राजीनाम्याची चर्चा बर्याच काळापासून सुरू होती. विशेषतः त्यांच्या नेतृत्वाखालील लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला (एलडीपी ) सलग दोन निवडणुकांमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला होता.
गेल्या ऑक्टोबरमध्ये इशिबा यांनी बोलावलेल्या मुदतपूर्व निवडणुकांमध्ये एलडीपी आणि त्यांच्या मित्रपक्षाने संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील बहुमत गमावले. त्यानंतर जुलै महिन्यात वरिष्ठ सभागृहातही बहुमत मिळवण्यात त्यांना अपयश आले. 1955 नंतर ही पहिलीच वेळ होती, जेव्हा एलडीपीकडे दोन्ही सभागृहांपैकी कशातही बहुमत नव्हते. या पराभवानंतर पक्षातूनच इशिबा यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. पक्षाच्या नेतृत्वाची लवकर निवडणूक घेण्याबाबत एलडीपी निर्णय घेणार होती, जे एकप्रकारे त्यांच्यावरील अविश्वास प्रस्तावासारखेच होते. त्याच्या एक दिवस आधीच इशिबा यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
जपानमध्ये पंतप्रधानपदाचा कार्यकाळ कमी असणे ही सामान्य बाब आहे. सरासरी कार्यकाळ सुमारे 2 वर्षांचा असतो. दिवंगत शिंजो आबे यांच्यासारखे दीर्घकाळ सेवा देणारे नेते (2006-2007, 2012-2020) हे अपवाद आहेत. आबे यांच्यानंतर इशिबा हे तिसरे ‘फिरत्या दरवाजा’प्रमाणे बदलणारे पंतप्रधान ठरले आहेत. वाढती महागाई आणि सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी झळ यामुळे जपानची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असतानाच एलडीपी पक्ष आपल्या सर्वात कमकुवत काळातून जात आहे. प्राध्यापक जेफ किंग्स्टन यांच्या मते, इशिबा यांच्या राजीनाम्याची मुळे आबे यांच्या मृत्यूनंतरच्या घडामोडींमध्ये आहेत.
आबे यांनी एलडीपीमध्ये एक मोठी फूट पाडली होती. विशेषतः युनिफिकेशन चर्च (मूनीज) सोबतच्या त्यांच्या जवळच्या संबंधांबद्दलचे खुलासे झाल्यानंतर या चर्चवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होते आणि 2022 मध्ये आबे यांची हत्या करणार्या व्यक्तीने याच चर्चवरील रागातून हे कृत्य केल्याचे म्हटले होते. यानंतर असे आढळून आले की, पक्षाच्या जवळपास निम्म्या सदस्यांचे या चर्चशी संबंध होते. आता इशिबा यांच्या राजीनाम्यानंतर जपानच्या भावी पंतप्रधानपदी कोण असेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.