

सचिन बनछोडे
पाच हजार वर्षांपूर्वी, द्वापारयुगाच्या शेवटी संपूर्ण चराचराला व्यापून राहिलेले एकमेवाद्वितीय परमतत्त्व भगवान श्रीकृष्णाच्या रूपात अवतरित झाले. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. त्यानिमित्त...
भगवंतांनी गीतेत म्हटले आहे की ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥’ (हे भारता, अर्जुना, ज्या ज्या वेळी धर्माची हानी व अधर्माची वृद्धी होते, त्यावेळी मी साकार रूपात प्रकटतो.) पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजेच द्वापारयुगाच्या अखेरीस हेच परमतत्त्व ‘श्रीकृष्ण’ या नावाने अवतरित झाले. या सावळ्या, सुंदर रूपात भगवंताने ज्या लीला केल्या त्या थक्क करणाऱ्याच होत्या व त्यामुळेच स्वतः भगवदावतार असलेल्या महर्षी व्यासांनीही ‘कृष्णस्तु भगवान स्वयम्’ असे गौरवोद्गार काढले! स्वतः श्रीकृष्णांनीच गीतेत म्हटले आहे की ‘जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः। त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन॥’ (हे अर्जुना, माझे जन्म व कर्म दिव्य आहेत, जो त्यांना तत्त्वतः जाणतो, त्यांचा पुनर्जन्म होत नाही, तर ते माझी प्राप्ती करतात.) भगवान श्रीकृष्णांच्या या अवतार व लीला अत्यंत गोड आहेत. त्यांच्या हातात नेहमी दिसणारी बासरी व तिचा मधुर नाद याचे तर अनेक संतमहात्म्यांनी वर्णन केलेले आहे. महाप्रभु श्रीवल्लभाचार्यांनी रचना केलेल्या ‘मधुराष्टका’मध्ये श्रीकृष्णांच्या रूप व लीलामाधुर्याचे अत्यंत मधुर वर्णन आहे. त्यामध्येच भगवान श्रीकृष्णांच्या बासरीचाही ‘वेणुर्मधुरो रेणुर्मधुराः’ असा उल्लेख आहे. महर्षी वेदव्यासांनी लिहिलेल्या श्रीमद् भागवत महापुराणाच्या दहाव्या स्कंधामध्ये श्रीकृष्णचरित्र असून त्यामध्येच गोपींचे परममधुर ‘वेणुगीत’ही आहे. वेणुगीतात श्रीकृष्णांच्या वेणुमाधुर्याचे स्वतः गोपींनी केलेले वर्णन अत्यंत मनोहारी आहे.
यामध्ये गोपी एकमेकींना सांगतात, गोपाळांसह श्रीकृष्ण वृंदावनात आले पाहा! त्यांच्या मस्तकावर मोरपंख आहे आणि कानांवर कण्हेरीच्या फुलांचे गुच्छ आहेत. त्यांनी सोन्यासारखा झळझळीत पीतांबर परिधान केलाय आणि गळ्यात वैजयंती-माळा घातली आहे. हातातील बासरीची छिद्रे ते आपल्या अधरामृताने भरत आहेत. या वेणूने असे कोणते पुण्य केले आहे की, तिला हे भाग्य लाभले? या वेणूला आपल्या पाण्याने वाढविणारे जलाशय कमळांच्या मिषाने रोमांचित होऊ लागले आहेत आणि आपल्या वंशामध्ये जन्मलेल्या भगवत्प्रेमी वेणूला पाहून वृक्षसुद्धा श्रेष्ठ पुरुषांप्रमाणे ‘भगवद्भक्त आपला वंशज आहे’ हा विचार मनात येऊन मधुबिंदुंच्या मिषाने आनंदाश्रू ढाळीत आहेत! जेव्हा श्रीकृष्ण मुरली वाजवतात, तेव्हा मोर धुंद होऊन नाचू लागतात आणि पर्वतशिखरावरील पशु-पक्षी स्तब्धपणे हे पाहत राहतात.
स्वर्गातील ललनाही ज्यावेळी सौंदर्य व शील यांचा खजिना असलेल्या श्रीकृष्णांना पाहतात आणि त्यांनी बासरीवर गायिलेले मधुर संगीत ऐकतात तेव्हा त्या विमानातच आपली शुद्ध हरपून बसतात. त्यावेळी वेणीतील फुले व अंगावरची वस्त्रे गळून पडत असल्याचेही भान त्यांना नसते! श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेले वेणुगीतरूपी अमृत गायी कान टवकारून पितात. आपल्या डोळ्यांमधून श्यामसुंदरांना हृदयात घेऊन त्यांना आलिंगन देतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. तसेच त्यांची वासरे गायींच्या सडांतून कृष्णप्रेमाने आपोआप स्रवणारे दूध तोंडात घेऊन तशीच उभी राहतात. त्यांच्याही डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहत असतात. या वनातील पक्षी हे बहुधा मुनीच आहेत. ते सुंदर पालवी फुटलेल्या झाडांच्या डहाळ्यांवर गुपचूप बसून श्रीकृष्णांनी वाजवलेली मोहक बासरी ऐकतात.