पाकिस्तानला तडाखा

जयशंकर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले
Jaishankar harshly criticised the Pakistani Government for supporting Terrorist organisations
पाकिस्तानला तडाखाPudhari File Photo
Published on
Updated on

पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाचा त्याग करत नाही, तोपर्यंत त्या देशाशी सुरळीत संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच स्पष्ट केले होते. पाकिस्तानने अतिरेकी कारवाया केल्यास, त्याला मूँहतोड जवाब दिला जाईल, असे केवळ सुनावूनच ते थांबले नव्हते, तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक घडवला. पुलवामात अतिरेक्यांनी धिंगाणा घालताच, बालाकोट येथे घुसून दहशतवादाला आणि त्याच्या पाठीराख्यांना चोख उत्तर दिले. सत्तेवर आल्यानंतर पुढच्याच वर्षी, म्हणजे 25 डिसेंबर 2015 रोजी मोदी यांनी रशियाच्या दौर्‍यावरून परत येताना अचानकपणे लाहोरला उतरून पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. 2004 साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. भारताने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतरदेखील पाकिस्तानने भारतात अतिरेकी पाठवून लष्करी तळांवर हल्ले करणे तसेच निरपराध नागरिकांची हत्या करणे चालूच ठेवले. त्यानंतर मात्र भारताने कडक पवित्रा धारण केला. नऊ वर्षांपूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जम्मू-काश्मीरमध्ये येऊन हुर्रियतच्या नेत्यांना भेटणार होते, तेव्हा त्यास परवानगी नाकारण्यात आली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्या विरोधात दाद तर मागितलीच, परंतु आपल्या तुरुंगात असलेल्या पाकिस्तानच्या बारा कैद्यांची सुटका करण्याचे नाकारले.

स्वयंघोषित इस्लामिक धर्मगुरू आणि अनेक अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेला झाकीर नाईक धार्मिक प्रवचने देण्यासाठी सध्या पाकिस्तानला गेला आहे. अशा गोष्टी भारताला रुचणे केवळ अशक्य आहे. डिसेंबर 2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज इस्लामाबादला गेल्या होत्या. त्यावेळी जयशंकर यांचा परराष्ट्र सचिव या नात्याने स्वराज यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात समावेश होता. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर इस्लामाबादेत आयोजित करण्यात आलेल्या ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेला त्या उपस्थित होत्या आणि तेव्हा त्यांनी पाकिस्तानला खडे बोलही सुनावले होते. आता इस्लामाबादेत आयोजित करण्यात आलेल्या ‘एससीओ’, म्हणजेच ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्रमंत्री जयशंकर पाकिस्तानच्या दौर्‍यावर जाऊन आले. ‘एससीओ’च्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा हा दौरा होता. भारत-पाकिस्तान यांच्यात संयुक्त चर्चा नव्हती, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे जर ही परिषद पाकमध्ये नसती, तर भारताचे परराष्ट्रमंत्री तेथे जाण्याचा प्रश्नच उद्भवला नसता; परंतु इस्लामाबादमध्ये जाऊन पाकिस्तानला स्पष्टपणे सुनावण्याची धमक जयशंकर यांनी दाखवली. सीमापार सुरू असलेला दहशतवाद, अतिरेकीवाद आणि फुटीरतावाद या तीन दुष्ट शक्तींमुळे व्यापार, ऊर्जा व दळणवळण यात बाधा येते. प्रादेशिक सहकार्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि दहशतवादासोबत व्यापार शक्य नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शरीफ यांच्या उद्घाटनपर भाषणानंतर जयशंकर यांचे भाषण झाले. त्यामुळे पाकिस्तानच्या भूमिकेचा त्यांना नीट समाचार घेता आला. परस्पर आदर आणि एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान राखला, तरच एकमेकांशी सहकार्य होईल. परस्पर विश्वासाने ‘एससीओ’ गटाने काम केले, तर त्याचा सदस्य देशांना मोठा फायदा होईल. स्वतःचा एकट्याचाच अजेंडा ठेवून पुढे जाणे टाळायला हवे, असा टोला जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीनला समोर ठेवूनच लगावला. विकासासाठी शांतता आणि स्थिरता आवश्यक असते. चांगला शेजार कुठेतरी हरवल्यासारखा वाटत असेल आणि अविश्वासाची भावना असेल, तर आत्मचिंतनाची गरज आहे, हे जयशंकर यांचे उद्गार या दोन्ही देशांना अचूक लागू पडतात.

चीनचे ‘वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह’ आणि चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग यांची व्याप्ती वाढायला हवी. या प्रकल्पांकडे संकुचित मनाने पाहायला नको, अशा शब्दांत शाहबाज यांनी चीनची बरीच प्रशंसा केली. वास्तविक या प्रकल्पातील चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग हा पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताचा त्यास पहिल्यापासून विरोध आहे आणि वेगवेगळ्या व्यासपीठांवरून तो प्रकटही केला गेला आहे; परंतु भारतविरोधी मोहिमा राबवण्यासाठी चीन वर्षानुवर्षे पाकला मदत करत आहे आणि म्हणूनच पाकिस्तान या संदर्भात चीनची बाजू घेत आहे. इस्रायलच्या गाझापट्टीतील हल्ल्यांचा शरीफ यांनी यावेळी निषेध केला; परंतु हमासनेही इस्रायलमध्ये घुसून बॉम्बहल्ले केले, क्षेपणास्त्रे डागली आणि अनेक लोकांना ओलीस ठेवले, याबद्दल त्यांनी चकार शब्द काढला नाही. इस्लामाबादमध्ये जयशंकर आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री मुहम्मद इसहाक दार यांच्यात चर्चा झाली.

पुढील फेब्रुवारीत पाकिस्तानात चॅम्पियन चषकाचे क्रिकेट सामने होणार असून, त्यात भारतीय चमूचा सहभाग असेल का, याबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत. दोन्ही देशांतील क्रिकेटसंबंध पुनःप्रस्थापित करण्याची चाचपणी केली जात असल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तानचे गृहमंत्री सय्यद मोहसिन रझा नकवी हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आहेत. जयशंकर हे स्वतः क्रिकेटचे चाहते आहेत; मात्र याबाबत सावधपणेच पावले टाकली जातील, हे स्पष्ट आहे. यापूर्वी एससीओची बैठक मे 2023 मध्ये गोव्यात झाली होती. पाकिस्तानचे तेव्हाचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी जम्मू-काश्मीर व 370 कलमाचा तेव्हा उल्लेख केला होता. वास्तविक हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून, त्यात बिलावल यांनी नाक खुपसण्याचे काहीएक कारण नव्हते. त्यामुळे जयशंकर यांनी तिथल्या तिथेच त्याला प्रत्युत्तर दिले होते. सुदैवाने यावेळी पाकिस्तानने असा कोणताही आगाऊपणा केला नाही. दार हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे निकटवर्तीय सहकारी आहेत. आता किमान क्रिकेटच्या वाटेने तरी दोन देशांतील कटुता कमी होण्यासाठी दार यांचा काही उपयोग होऊ शकेल. कोविडमधून जग सावरत असतानाच, जगात ठिकठिकाणी नव्या संघर्षभूमी तयार होत आहेत. अशावेळी किमान शेजारी देशांनी परस्परांना त्रास न देण्याचे ठरवले, तरी ते लाभदायक ठरू शकेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news