

व्ही. के. कौर
अवकाशात स्थापन केलेल्या अवकाश स्थानकाच्या माध्यमातून भविष्यात काही देशांकडून क्षेपणास्त्र हल्ले होण्याची शक्यता पाहता भारतदेखील अवकाश क्षेत्रात पावले टाकताना दिसत आहे. आपण इतरांपेक्षा अधिक काळ मागे नाही. दहा वर्षांत आत स्वत:च्या अवकाश स्थानकात स्वत:चे अंतराळवीर उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी भारतीय शास्त्रज्ञांचे प्रयत्न शेवटच्या टप्प्यात असून अंतराळवीर शुभांशू शुक्ला परतल्यानंतर या अवकाश कार्यक्रमाला आणखीच उत्साह आला आहे. एकुणातच ही मोहीम दहा वर्षांत तडीस पोहोचू शकते आणि अवकाशातदेखील भारत यशाचे शिखर पादाक्रांत करू शकतो.
आत्मनिर्भरच्या द़ृष्टीने वाटचाल करताना जमिनीपासून हजारो किलोमीटर लांबीवर अवकाशात भारताचे स्थानक असेल. ‘इस्रो’कडून 2035 पर्यंत अवकाशात स्वत:चे स्पेस स्टेशन स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थात, शुभांशू शुक्ला हे नासाच्या अधिकृत मोहिमेच्या मदतीने नुकतेच अवकाश स्थानकात जाऊन आले. हा अवकाशस्थानक स्थापनेच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. भविष्यात एखादा अंतराळवीर अवकाशात प्रवास करेल तेव्हा तो स्वत:च्याच अवकाश स्थानकात उतरेल. अशा प्रकारचे यश हे बदलत्या भारताची अलौकिक कामगिरी मानली जाईल.
सध्याच्या काळात बहुतांश देश जमिनीऐवजी आकाशातून संघर्ष करत आहेत. समोरासमोरची लढाई टाळत क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. इराण, इस्रायल, गाझा, पॅलेस्टिनी, युक्रेन-रशिया आणि अलीकडचे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणि शस्त्रसंधी हे त्याचेच उदाहरण आहे. म्हणूनच आगामी संघर्षाच्या ठिणग्या अवकाशात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत दोन देशांतील संघर्ष हा आपण जमीन, हवा आणि पाणी यावरच पाहिले; परंतु भविष्यातील लढाई अवकाशातून लढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत दोनच स्थानक अवकाशात आहेत. पहिले इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि ते अमेरिका अणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारास आले. दुसरे स्थानक चीनचे असून ते खासगी आहे. अर्थात, आता रशिया, अमेरिका, भारत अणि अन्य एक देश आपापले खासगी स्थानक तयार करण्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत.
पुढील दहा वर्षांत भारताबरोबरच रशियादेखील स्वत:चे स्थानक स्थापन करेल. त्याचा उद्देश हा अवकाशातील प्रयोग करण्याचा असला, तरी या माध्यमातून काही उपग्रहांना क्षेपणास्त्र हाताळण्यासाठी कामाला लावले जाण्याची शक्यता आहे. तूर्त 41 वर्षांनंतर शुभांशू शुक्ला यांच्या रूपातून भारताचा एक अंतराळवीर अवकाशात जाऊन आला. त्यांच्या अवकाश प्रवासाचे माध्यम अॅक्सिओम मिशन-4 का असेना; परंतु भविष्यात परकी यानावरचे अवलंबित्व संपण्याची शक्यता आहे. पृथ्वीपासून अवकाशस्थानक 62 मैल अंतरावर असून ते गाठण्यासाठी 28 तास लागतात. एवढ्या मारक क्षमतेचे क्षेपणास्त्र अमेरिका तयार करत आहेत.
अवकाशात 24 तासांत 16 वेळेस सूर्योदय होतो आणि 16 वेळेस सूर्यास्त होतो. 90-90 मिनिटांचा दिवस आणि रात्र असते. अवकाशस्थानक 24 तासांत पृथ्वीला सुमारे 16 वेळेस प्रदक्षिणा घालते. उपग्रह क्षेपणास्त्राचा वापर अवकाशातून कसा केला जाईल, यावर ‘नासा’कडून बर्याच काळापासून अभ्यास सुरू आहे. ‘इस्रो’ आणि नासाचे शास्त्रज्ञ हे अवकाशात मानवी जीवन, ऑक्सिजन, पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चाचपणी करत आहे. अवकाशातून परतलेले शुभांशू यांची केवळ उड्डाणापुरतीच मोहीम नव्हती, तर ती एक भारतीय अवकाश संशोधनाच्या नव्या युगाची सुरुवात म्हणता येईल.