

तानाजी खोत
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील गुंतवणुकीने ऐतिहासिक उच्चांक गाठला असून, ही गुंतवणूक एक टिकाऊ ‘तंत्रज्ञान क्रांती’ आहे की लवकरच फुटणारा ‘गुंतवणूक फुगा’ हा गंभीर प्रश्न जागतिक अर्थव्यवस्थेसमोर उभा आहे. या प्रश्नावर टेक क्षेत्रातील दिग्गजांमध्ये दोन टोकाची मते आहेत. गुंतवणुकीचा वाढलेला ओघ आणि एआय कंपन्यांच्या मूल्यांकनातील विक्रमी वाढ यामुळे हा प्रश्न उभा राहिला आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत ओपन एआयचे अंदाजित मूल्यांकन 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. एआय चिपमेकर एनव्हीडीया कंपनीने 2023 सालापासून मूल्यांकनात 500 टक्केपेक्षा जास्त वाढ नोंदवत 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला. ही आकडेवारी अनेकांना सन 2000 पूर्वीच्या ‘डॉट कॉम’ गुंतवणुकीच्या ‘हाइप’ची आठवण करून देत आहे.
अनेक प्रमुख एआय स्टार्टअप्सचे मूल्यांकन प्रचंड असले तरी, त्यांचे निव्वळ उत्पन्न खूप कमी आहे किंवा त्या तोट्यात सुरू आहेत. जनरेटिव्ह एआय मॉडेल्सला प्रशिक्षित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी क्लाऊड सेवा व चिप्सवर होणारा प्रचंड डेटा सेंटर खर्च नफ्याच्या मार्गातील मोठा अडथळा ठरत आहे. बिग टेक कंपन्या एआय स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवतात आणि ते स्टार्टअप्स त्याच मोठ्या कंपन्यांकडून चिप्स आणि क्लाऊड सेवा खरेदी करतात. या चक्रीय फंडिंग प्रक्रियेमुळे मूल्यांकने कृत्रिमरीत्या फुगवली जात असल्याचा आक्षेप अनेकजण घेत आहेत. जे टेक लीडर्स एआयमधील गुंतवणुकीच्या बाजूने आहेत, ते याला ‘फुगा’ मानत नाहीत, तर इंटरनेट नंतरची सर्वात मोठी तांत्रिक आणि आर्थिक क्रांती मानतात. त्यांच्या मते, सध्याची गुंतवणूक भविष्यात अमर्याद नफा देईल.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला हे याच बाजूचे आहेत. त्यांच्या मते, एआय हे केवळ एक उत्पादन नसून तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मची पुढील पिढी आहे. 2020 ते 2025 मध्ये कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांमध्ये को-पायलटसारखी एआय फीचर्स यशस्वीरीत्या समाविष्ट केली. प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक कर्मचार्याला या बदलाचा फायदा होणार आहे.
दुसरीकडे, काही मोठे गुंतवणूकदार आणि टेक लीडर्स सावधगिरीचा इशारा देत आहेत. टेस्ला आणि एक्सचे प्रमुख इलॉन मस्क यामध्ये आघाडीवर आहेत. त्यांनी वारंवार एआय कंपन्यांच्या मूल्यांकनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मस्क यांच्या मते, एआय क्षेत्रात सध्या बरीच सट्टेबाजी आणि अतिउत्साह दिसत आहे. अनेक कंपन्या, ज्यांच्याकडे ठोस नफा नाही, त्यांचे मूल्यांकन अब्जावधींमध्ये पोहोचले आहे. जेव्हा या गुंतवणुकीचे वास्तव समोर येईल, तेव्हा अनेकांना मोठा धक्का बसेल, असा इशारा देतानाच बाजारात असलेले अनेक एआय मॉडेल्स खरोखर उपयुक्त नाहीत आणि फक्त ‘हाइप’वर चालत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. जवळपास सर्वच टेक लीडर्स एआयला खरे आणि क्रांतिकारी तंत्रज्ञान मानतात. त्यामुळे ‘डॉट कॉम’ फुग्याप्रमाणे संपूर्ण एआय क्षेत्र भुईसपाट होण्याची शक्यता कमी आहे. परंतु गुंतवणूक मूल्यमापन अतिरंजित असू शकते. याचा अर्थ एआयचा फुगा पूर्णपणे फुटणार नाही, पण त्यात ‘घसरण’ (उेीीशलींळेप) होण्याची शक्यता नक्कीच आहे. ज्या स्टार्टअप्सकडे ठोस व्यावसायिक मॉडेल नाही आणि केवळ ‘हाइप’वर उभे आहेत, त्यांच्या मूल्यांमध्ये मोठी घट होण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.