पहिला चहा | युद्धबंदी आणि ट्रुथ..!

पहिला चहा | युद्धबंदी आणि ट्रुथ..!
पहिला चहा | युद्धबंदी आणि ट्रुथ..!
Published on
Updated on

इराण-अमेरिकेचा युद्धबंदीचा करार पार पडायचा बाकी आहे तोपर्यंत डोनाल्ड तात्यांनी युद्ध समाप्तीची घोषणा करून इराणला खूश केले. इराणी चहा आणि इंधन बहुतेक दोन्ही स्वस्त होईल याची तमाम जनतेला उत्सुकता लागली. इराण तर भलताच जोमात येऊन वाकुल्या दाखवत अमेरिकन लोकांना भिडू लागला मीडियावर. ट्रुथ चॅनेलवर ढग दाटून येऊन बातम्यांचा पाऊस आणि परस्परविरोधी कमेंटस्‌च्या गारा पडू लागल्या.

इराण : घाबरलात? होर्मुझ थोड्या दिवसांत खुली करू; पण इतिहासात तुमचे नाव घाबरट म्हणूनच ओळखले जाईल.

अमेरिका : कोणीही घाबरत नाही. युद्ध संपलं; पण करारावर डोनाल्ड तात्यांची सही राहिलीय. ती होऊ द्या.

इराण : तात्या ऐनवेळी भोपळ्यात तलवार खुपसून परागंदा होतात. बरं त्या भोपळ्यात म्हातारी कधी बसली असेल माहिती नाही; पण त्याच भोपळ्यात तात्याला घालणार आणि व्हाईट हाऊसमध्‍ये पाठवणार.

अमेरिका : आमच्या नेत्याबद्दल आपण काहीही बोलता. म्हणून प्रत्येकवेळी करार रद्द करावे लागतात. आता यावेळी इराणने तोंड बंद ठेवावे करारावर स्वाक्षऱ्या होईपर्यंत. तुमचीपण स्वाक्षरी राहिलीय.

भारत : तुमच्या भांडणात बाकीच्या देशांना त्रास होतोय. आता तात्याने पुन्हा बदलू नये. पेट्रोलचे वांदे झालेत तुमचे. इथेनॉल भारतातून सप्लाय करावे लागेल.

इराण : सही बोला. ट्रम्प ऊर्फ डोनाल्ड तात्या आपणास समज आली तर ठीक, नाहीतर होर्मुझमधून पाण्याच्या खालून जाणारी केबल कट करण्यात येईल. सगळ्या देशांचे इंटरनेट बंद. त्यात किम भाऊला काही फरक नाही पडणार. त्याने इंटरनेटवर बंदी घातलीय आपल्या देशात.

भारत : आम्हाला काही फरक नाही पडत. मरा तिकडं. नुसत्या धमक्या एकमेकांना.

अमेरिका : केबल काढावीच तुम्ही, मग बघाच. हल्ले थांबणारच नाहीत.

इराण : त्यापेक्षा डोनाल्ड तात्यांनी एकमत ठेवून वागावे. येडे चाळे बंद करावेत.

उत्तर कोरिया : लवकर बंद करा ते इंटरनेट. नाहीतर मीच केबल कापतो. जरा इंटरनेट उघडून पाहावं तर तात्या उलाढाल्या लेकाचा अजून सह्या करतोय करारावर. येऊ काय तिकडं? (किम जॉन ऊन.)

सारे गायब. ट्रुथवर फक्त वारा वाहताना दिसला आणि चॅनेलला मुंग्या आल्या. (बंद)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news