Sculptor Ram Sutar | किमयागार!

internationally-renowned-sculptor-ram-sutar-passes-away-end-of-an-era
Sculptor Ram Sutar | किमयागार!Pudhari Photo
Published on
Updated on

निर्जीव मूर्तींमध्ये प्राण फुंकणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेतील एका पर्वाचीच समाप्ती झाली आहे. त्यांच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृती इतिहास आणि भावना यांचा अनोखा संगम झाला होता. देशभरातच नाही, तर जगभरात त्यांनी महात्मा गांधी यांची शिल्पे साकारली. सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात राज्यातील केवडिया येथे जगातील सर्वात उंच 182 मीटर उंचीचा पुतळा त्यांच्याच हातातून सिद्ध झाला. भगवान बुद्ध, महावीर आणि विवेकानंद यांच्यासह इतर महान विभूतींच्या मूर्ती अत्यंत सुबक आणि चित्तवेधक पद्धतीने त्यांनी साकारल्या. अगदी अलीकडे अनावरण करण्यात आलेला अंदमान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा त्यांनी घडवला. मालवणच्या राजकोट येथील समुद्रकिनार्‍यालगतचा छत्रपती शिवरायांचा नवा पुतळा सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल यांनीच तयार केला. भारतीय शिल्पकलेला देदीप्यमान इतिहास आहे.

पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतनमधील रामकिंकर बैज यांनी 1930 पासून आधुनिक भारतीय शिल्पकलेच्या पायाभरणीचे कार्य सुरू केल्यावर, विविध भागांत या कलेचा हळूहळू विकास होत गेला. सदानंद बाकरे, ए. एम. दवेरवाला, पिलू पोचखानवाला, धनराज भगत यासारख्या शिल्पकारांनी आत्मप्रकटीकरणाचे माध्यम म्हणून शिल्पकलेत प्रयोगशीलता आणून, ही कला अधिक पुढे नेली. वि. पां. करमरकर यांनी रवींद्रनाथ ठाकूर यांच्या अर्धपुतळ्याच्या निर्मितीद्वारे आधुनिकतेच्या खुणा दर्शवून दिल्या. 1960 नंतरच्या दशकात भारतीय शिल्पकलेमध्ये पौर्वात्य आणि पाश्चिमात्य कलाप्रवाहांचा संगम दिसू लागला.

शिल्पकार नवनवीन द्रव्ये आणि तंत्रे वापरू लागले. घाटांच्या बाबतीतही नवनवे प्रयोग होऊ लागले. याच आधुनिक शिल्प परंपरेचे एक पाईक असलेले सुतार हे स्वातंत्र्योत्तर भारतीय स्मारक शिल्पांच्या इतिहासातील एक लखलखीत पानच होते. प्रचंड आकाराची शिल्पे हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य. सुतार हे धुळे जिल्ह्यातील गोंदूरचे. त्यांचे वडील लोहारकाम आणि सुतारकाम करत असत. त्यामुळे शेतीची अवजारे तयार करणे, बैलगाडी बनवणे, लाकडावर कोरीव काम करणे, मातीची खेळणी बनवणे, शेणाने सारवलेल्या भिंतींवर चित्रे रंगवणे या गोष्टी ते बालवयातच शिकले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिल्पकलेचे औपचारिक शिक्षण घेतले. परंतु, त्यापूर्वीच त्यांचे मूर्तिकौशल्य हेरून, चित्रकलेचे शिक्षक श्रीराम जोशी यांनी 1948 साली त्यांच्याकडून महात्मा गांधीजींचा पुतळा बनवून घेतला होता. त्यांनीच राम यांना घडवले. 1947 साली एका शरीरसौैष्ठवपटूचा पुतळा सुतार यांनी प्रथम घडवला.

चंबळ नदीवरील गांधीसागर धरणानजीकचे ‘चंबळा आणि तिला बिलगलेली दोन बालके’ (या धरणाचे लाभ मिळणार्‍या मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांचे प्रतीक) असे 45 फुटी शिल्प, हा सुतार यांच्या कलेतील भारतीयतेचा आदर्श मानला जातो. विचारमग्न स्थितीत असलेले महात्मा गांधी यांचे संसदभवन येथील कलात्मक व्यक्तिशिल्प आणि वल्लभभाई पटेल यांचे सरदार सरोवर येथील उत्तुंग शिल्प, ही सुतार यांची सर्वात लोकप्रिय अशी शिल्पे. सुतार यांची शिल्पे अत्यंत चैतन्यशील आणि जिवंत वाटतात. अयोध्येच्या राम मंदिरात अनेक उत्कृष्ट मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक मूर्ती जटायूची असून, ती सुतार यांनी बनवलेली. व्यक्तिशिल्पे, म्यूरल्स, एखाद्या संकल्पनेला धरून शिल्प, असे शिल्पकलेचे विविध प्रकार त्यांनी हाताळले. तिशीत असतानाच त्यांनी अजिंठा-वेरूळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनवण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले.

रवींद्रनाथ टागोर यांचा टोकियोतील पुतळा त्यांच्याच हातांनी घडवला. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, ब्रिटन अशा विविध देशांत त्यांनी साकारलेली शिल्पे उभी आहेत. महात्मा गांधीजींचे त्यांच्या स्टुडिओत घडलेले अनेक अर्धपुतळे भारत सरकारने परदेशी राष्ट्रप्रमुखांना भेट म्हणून दिलेले आहेत. दगड आणि संगमरवरातील शिल्पकामात सुतार यांचा हातखंडा होताच, ब—ाँझ धातूत शिल्पकाम करण्याची विशेष आवड त्यांना होती. प्रमाणबद्धता व सूक्ष्मता हे त्यांच्या कलेचे एक वैशिष्ट्य. दिल्लीतील रफी मार्गावरील गोविंद वल्लभ पंत यांचे दहा फुटी शिल्प म्हणजे सुतार यांचे अद्वितीय कौशल्य, प्रतिभा आणि अचूकता यांचा उत्कृष्ट नमुना आहे. दिल्लीस भेट देणार्‍या कोणाच्याही नजरेत हे शिल्प भरते. त्यांनी बनवलेल्या इतर प्रसिद्ध शिल्पांमध्ये दिल्लीतील हरिजन सेवक संघातील महात्मा गांधी वुईथ हरिजन किडस्, महाराजा रणजितसिंह यांचा अमृतसर येथील पुतळा आणि गंगा-यमुना देवींचे लुधियाना येथील शिल्प यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशातील 45 फूट उंचीचे ‘चंबळ स्मारक’ हे त्यांच्या कारकिर्दीतील मोठे आणि कौतुक झालेले काम. हे स्मारक एकाच खडकापासून बनवण्यात आले. शिल्पकलेसारख्या अवघड कलेला आपल्या परीसस्पर्शाने सुतार यांनी नवीन आयाम मिळवून दिला. दोनशेहून अधिक भव्य पुतळ्यांच्या उभारणीचे अवघड काम त्यांनी करून दाखवले. सुतार यांना गेल्या मार्च महिन्यातच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे हा पुरस्कार त्यांना मुंबईत भव्य सोहळ्यात प्रदान करता आलेला नव्हता. गेल्या नोव्हेंबरमध्ये नोएडा येथील त्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो सन्मानपूर्वक प्रदान केला होता. तो स्वीकारल्यानंतर सुतार यांच्या तोंडी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हेच बोल होते.

आजारी अवस्थेतदेखील त्यांच्या तोंडून महाराष्ट्राच्या राज्यगीताच्या ओळी ऐकताना मुख्यमंत्र्यांचादेखील ऊर साहजिकच अभिमानाने भरून पावला होता. शिल्पकला हे सर्जनशील काम. त्या त्या व्यक्तीच्या जीवनाचे सार पुतळ्यात किंवा स्मारकात अक्षरशः ओतावे लागते. शारीरिक परिश्रमासह शिल्पकाराची जीवनद़ृष्टीही त्यातून प्रतिबिंबित होत असते. महापुरुषांच्या स्मारकातून नवीन पिढ्यांना प्रेरणा मिळत असते. या पुतळ्यांमधून इतिहास जिवंत होतो आणि नवा इतिहास घडवण्याचे सामर्थ्यही त्यात असते. राम सुतार शतायुषी होईपर्यंत इतरांची शिल्पे घडवत राहिले. परंतु, शिल्पांच्या या किमयागाराचे जीवनशिल्पदेखील कोट्यवधी लोकांना प्रेरणादायी वाटेल, असेच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news