Indonesia’s Puncak Jaya | उष्णकटिबंधातील एकमेव हिमनदीची मृत्यूघंटा

Indonesia’s Puncak Jaya |
Indonesia’s Puncak Jaya | उष्णकटिबंधातील एकमेव हिमनदीची मृत्यूघंटा
Published on
Updated on

मुरलीधर कुलकर्णी

जागतिक हवामान संघटना म्हणजेच डब्ल्यूएमओ आणि दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेला वार्षिक अहवाल केवळ नैर्ऋत्य पॅसिफिक क्षेत्रासाठीच नव्हे, तर भारतासाठीही धोक्याची घंटा वाजवणारा आहे. ‘डब्ल्यूएमओ’द्वारे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचा विविध क्षेत्रांवर होणारा परिणाम तपासण्यासाठी ‘स्टेट ऑफ द क्लायमेट’ या मालिकेअंतर्गत दरवर्षी असे प्रादेशिक आणि जागतिक अहवाल प्रसिद्ध केले जातात.

ताज्या अहवालातील धक्कादायक वास्तव म्हणजे, इंडोनेशियातील पापुआ प्रांतात असलेली ‘पुंचाक जया’ ही एकमेव उष्णकटिबंधीय हिमनदी आता अंतिम घटका मोजत आहे. १९८८ च्या तुलनेत या हिमनदीचा आकार आता केवळ दोन टक्के उरला असून, पुढील काही वर्षांत ती भूतकाळाच्या पडद्याआड जाण्याची भीती आहे. विषुववृत्ताजवळ असलेल्या या बर्फाळ प्रदेशाचा अंत हा जागतिक तापमानवाढीचा सर्वात जिवंत पुरावा आहे; परंतु हा बदल केवळ पॅसिफिक महासागरापुरता मर्यादित नसून, हवामान शास्त्रातील ‘टेलिकनेक्शन’ या संकल्पनेनुसार हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारताच्या हवामान चक्राला आणि मान्सूनच्या ‘लाईफलाईन’ला थेट विळखा घालत आहे.

​पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा सरासरीपेक्षा कमालीचे वाढते, तेव्हा ‘अल निनो’ या भौगोलिक स्थितीचा जन्म होतो. ही हवामान प्रणाली भारतासाठी नेहमीच चिंतेची ठरली आहे. यामुळे पॅसिफिकमधील उष्णता हिंदी महासागराकडे सरकते आणि भारताकडे येणारे मान्सूनचे वारे कमकुवत होतात. परिणामी, भारतात कमी पाऊस पडतो. याच्या अगदी उलट असणारी ‘ला निना’ ही स्थिती पॅसिफिकचे पाणी थंड करत असली आणि भारतात भरपूर पाऊस आणत असली, तरी तिच्यामुळे अनेकदा ढगफुटी आणि महापुराचे संकट ओढवते. हा बदल भारतीय शेतीला आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या जुगाराच्या खाईत लोटत आहे.

या महासागरीय उष्णतेचा थेट परिणाम भारताच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरही दिसून येत आहे. सागरी उष्णतेच्या लाटांमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पूर्वी कधीही न पाहिलेली तीव्र चक्रीवादळे वारंवार धडकत आहेत. यासोबतच पॅसिफिकमधील बर्फ वितळल्यामुळे जागतिक पातळीवर समुद्राची पातळी वाढत आहे. तिचा सर्वाधिक फटका भारताच्या किनारपट्टीला बसत आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या किनारपट्टीवरील महानगरांमध्ये समुद्राचे पाणी पुढे सरकत असून, किनाऱ्यांची धूप वेगाने होत आहे. पावसाळ्यात समुद्राच्या भरतीचे पाणी शहरांमध्ये तुंबून राहिल्याने सखल भाग कायमस्वरूपी जलमय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा बदल केवळ भौगोलिक नसून आर्थिक आणि सामाजिक आहे. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे माशांच्या प्रजाती थंड पाण्याच्या शोधात स्थलांतरित होत आहेत, ज्यामुळे किनारपट्टीवरील कोळी बांधवांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. तसेच, समुद्राचे खारे पाणी भूगर्भात झिरपल्याने किनारपट्टीवरील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. कार्बन उत्सर्जनात तातडीने कपात आणि योग्य हवामान अनुकूलन धोरण राबवले नाही, तर निसर्गाचा हा असमतोल भारताच्या अन्नसुरक्षेला आणि किनारपट्टीच्या अस्तित्वाला मोठा सुरुंग लावू शकतो, हाच ‘डब्ल्यूएमओ’च्या या वार्षिक अहवालाचा मुख्य आणि सर्वात गंभीर इशारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news