

भारतात शाश्वत ऊर्जेचा अलीकडच्या काळातील विकास पाहिला तर तो लवकरच या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या स्थितीत येऊ शकतो. गुंतवणुकीतील सातत्य आणि नवोन्मेषासह आत्मनिर्भर शाश्वत ऊर्जा व्यवस्था निर्मितीच्या द़ृष्टीने भारतात वेगाने काम केले जात आहे. पर्यायी ऊर्जा स्रोतांच्या क्षेत्रात चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा जगातील तिसर्या क्रमांकाचा देश ठरला आहे. नजीकच्या काळात शाश्वत ऊर्जेची निकड वाढणार आहे.
दहा वर्षांपूर्वी भारत पर्यायी ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात आघाडीच्या दहा देशांतही नव्हता. पण आज चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा या क्षेत्रात जगातील तिसर्या क्रमांकाचा देश ठरला आहे. प्रत्यक्षात व्यापक प्रमाणात सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होत असल्याने भारतातील ऊर्जा निर्मितीचे चित्र बदलत आहे. कधीकाळी जीवाश्म इंधनावर अवलंबून असणारा देश आता वेगाने शाश्वत ऊर्जेचा स्वीकार करत आहे. हा बदल आर्थिक विकास, ऊर्जा सुरक्षा आणि स्वच्छ पर्यावरणामुळे होत आहे. सौरऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत स्वच्छ हवा आहे. कोळशाचा वापर कमी करणारी सौरऊर्जा कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हवेची गुणवत्ता ही चांगली राहते. आरोग्याच्या द़ृष्टीनेही ही सकारात्मक बाब मानली जाते. प्रचंड प्रदूषण असलेल्या शहरात श्वसनासंबंधीचे विकारही या प्रयत्नांमुळे कमी होऊ शकतात. सौरऊर्जा उद्योगातील अनेक क्षेत्रांत रोजगारवृद्धी होत आहे. पॅनेल निर्मिती, सिस्टीम उभारणीपासून त्याची देखभाल आणि ग्रीड एकीकृतपर्यंत अनेक क्षेत्रांत रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होत आहेत.
जागतिक ऊर्जा क्षेत्रावर लक्ष ठेवणारी संस्था ‘एम्बर्स’ ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यूच्या मागील अहवालानुसार गेल्यावर्षी जागतिक पातळीवर एकूण वीज निर्मितीत पवन आणि सौरऊर्जेचा वाटा 15 टक्के राहिला आहे. याचवेळी कमी कार्बन उत्सर्जन करणारे स्रोत जसे शाश्वत ऊर्जा आणि आण्विक ऊर्जा या स्रोतांतून 40.9 टक्के वीज निर्मिती झाली. याप्रमाणे भारत आता पवन आणि सौरऊर्जेतून वीज तयार करणारा जगातील तिसर्या क्रमांकाचा देश ठरला आहे. 2024 मध्ये आपण या दोन्ही स्रोतांच्या बळावर जर्मनीला मागे टाकले आहे. संपूर्ण जगात एकूण पवन आणि सौरऊर्जा निर्मितीत भारताचा वाटा 10 टक्के आहे.
भारताने एकूण शंभर गीगावॅट सौरऊर्जा निर्मिती क्षमतेच्या प्रकल्पाची स्थापन करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यानुसार 2030 पर्यंत 500 गीगावॅट ऊर्जा क्षमता साध्य करण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयप्राप्तीच्या द़ृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. गेल्या काही वर्षांत सौर पॅनेल, सौर पार्क अणि रुफ टॉप सौर प्रकल्प यांसारख्या योजनांमुळे वीज निर्मितीचे चित्र बदलत आहे. भारतीय सौरऊर्जा क्षेत्राने गेल्या 10 वर्षांत असामान्यपणे 34.5 टक्के वाढ नोंदविली आणि याप्रमाणे 2014 च्या 2.82 गीगावॅटवरून शंभर गीगावॅट झाली आहे. 31 जानेावरी 2025 पर्यंत भारतात उभारण्यात आलेल्या एकूण सौर प्रकल्पाची क्षमता ही 100.33 गीगावॅट झाली आहे.
याशिवाय सध्याच्या काळात 84.10 गीगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पावर काम सुरू असून 47.49 गीगावॅटचे दुसरे सौर प्रकल्प निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात आहेत. भारतात हायब्रीड आणि राऊंड द क्लॉक शाश्वत ऊर्जा प्रकल्पांचीही वाढ नोंदली गेली आहे. ‘राऊंड द क्लॉक’चा अर्थ 24 तास वीज पुरवठा. देशातील 64.67 गीगावॅटचे उत्पादन प्रकल्प अजूनही बांधकाम स्थितीत किंवा निविदा टप्प्यात आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर सौर आणि हायब्रीड प्रकल्पांची एकूण क्षमता 296.59 गीगावॅट होईल. राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेच्या एका अंदाजानुसार देशातील एकूण ओसाड जमिनीच्या तीन टक्के भागावर सौर पॅनेल्सची उभारणी केली तर देशात 748 गीगावॅट सौरऊर्जेची निर्मिती करता येणे शक्य आहे.