

भारतीय शेअर बाजार आंतरराष्ट्रीय दबावांना, प्रतिकूल बदलांना कशाप्रकारे यशस्वी तोंड देऊ शकतो, हे आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ (जकात दर) परिणामातून स्पष्ट झाले. भारतीय बाजारातून अमेरिकेला निर्यात होणार्या वस्तूंवर आता 25 टक्क्यांऐवजी 50 टक्के कर द्यावा लागेल. या बातमीचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजार प्रचंड प्रमाणात घसरेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र नेहमीच्या चौकटीत 300 ते 500 अंकांतच बाजार प्रारंभी राहिला. भारतीय शेअर बाजाराची ही आर्थिक सक्षमता किंवा प्रतिकार क्षमता निश्चितच स्वागतार्ह आणि अभिमानास्पद आहे.
प्रा. डॉ. विजय ककडे
दीर्घकालीन गुंतवणूक संधी भारतातच असल्याने भारतीय बाजारातून विदेशी गुंतवणूकदार संस्था पलायन करत नाहीत, हे स्पष्ट होते. भारतीय भांडवल बाजाराची ही सकारात्मक आणि शक्तिमान वैशिष्ट्ये छोट्या गुंतवणूकदारांना संधी देत असतात. या एकूण घटनेचा अर्थ व अन्वयार्थ महत्त्वाचा ठरतो. यानंतर सेन्सेक्सने 80 हजारांची पातळी तोडून खाली गेलेला बाजार दुपारच्या सत्रात व्ही शेप उसळी घेत पुन्हा 80,623.26 च्या पातळीवर स्थिरावला. जागतिक बाजारपेठेत युद्ध, धोरण गोंधळ यांच्या जोडीला येणारी अनिश्चितता बाजार दिशा भरकटण्यास कारणीभूत ठरत असते. अंतर्गत घटकदेखील महत्त्वपूर्ण ठरतात. खरे तर, अशा संकटाच्या वेळी देशाच्या विकास क्षमतेचा, गुंतवणूक शक्यतांचा कस लागत असतो. एप्रिल 2025 मध्ये ‘बाजार स्थिती आणि दिशा’ या अहवालात भारतीय बाजार सक्षमता किंवा जागतिक व्यापार महायुद्धात पडझड न होता का टिकून आहे, हे स्पष्ट केले आहे. यामध्ये उपयोगिता सेवा क्षेत्र 15.5 टक्के दराने, तर भांडवली वस्तू निर्देशांक 13.5 टक्के, आरोग्य क्षेत्र 8.5 टक्के आणि वित्त सेवा 8 टक्क्यांनी वाढत असल्याने निप्टीने 5.3 टक्क्यांची (वार्षिक) वाढ नोंदवली. यातही मध्यम आणि छोट्या कंपन्यांचा निप्टी मिडकॅप 10.2 आणि स्मॉलकॅप 11.9 टक्क्यांनी वाढला. हे सर्व भारताची अर्थव्यवस्था मृत असल्याचे म्हणणार्यांना सज्जड पुरावा देते. पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत बि—क्स देश वेगाने विकसित होत आहेत. नॅसडॅक (संयुक्त दर्शक) 8.2 टक्क्यांनी घसरला, तर भारताचा आंतरराष्ट्रीय भांडवल इंडेक्स 9.2 टक्क्यांनी वाढला, असे ‘मॉर्गन स्टॅन्ले’ची आकडेवारी दर्शवते.
बाजार हा अंधपणे मूल्यमापन करत असतो आणि कोणासही सवलत अथवा शिक्षा देत नाही. ज्याची अंतर्गत क्षमता उत्तम, वर्धिष्णू असते त्याला हिरवा झेंडा मिळतोच. भारताबाबत हेच प्रकर्षाने दिसून येत आहे. भारत ही मृत अर्थव्यवस्था, असे म्हटल्यावर त्याच आठवड्यात आयपीओसाठी 2.5 लाख कोटी भारतीय गुंतवणूकदार हा भारत असल्याचा संदेश देणारे आहेत. प्रचंड मोठी आणि वेगाने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था आहे. भारतातील मध्यमवर्गीयांचे वाढते उत्पन्न आणि उंचावणारे जीवनमान दरवर्षी 4 लाख मोटारी खरेदी करत आहे. वित्तीय शिस्त, पोषक आणि लवचिक पतधोरण, व्यापार, उद्योग याबाबतचे सकारात्मक धोरण हे सर्व घटक असल्याने आपली विकासगंगा दीर्घकाळासाठी फायदा देणारी ठरेल.
भारतीय गुंतवणूक क्षेत्र एसआयपीमार्फत सातत्यपूर्ण योगदान देत असून, बाजार स्थिरतेत हा खारीचा वाटा मोठा आहे. 2016-17 मध्ये केवळ 43 हजार कोटी रुपयांची वार्षिक एसआयपी आता 3 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करून पुढे जात असून, जीएसटीपेक्षा अधिक भर टाकत आहे. सक्षम भविष्याचा बचतीतून पाया घालणारे हे सर्व एसआयपी देणारे महत्त्वपूर्ण ठरतात. त्याच्या उत्तम व्यवस्थापनातून 15 ते 20 टक्के आणि व काही योजनांतून 35 टक्के परतावा दिला आहे.
अमेरिकेने भारतीय मालासाठी जकात दर 25 टक्क्यांऐवजी 50 टक्के करण्याचा विचार बाजारात अल्पकालीन प्रतिक्रिया अत्यंत संथपणे आणि डोकेदुखी न देणारा ठरला. शेअर बाजार दुपारच्या सत्रानंतर व्ही आकाराची भरपाई देत वाढला. हे धक्के आपणास शिस्त न सोडता उत्तम शेअर्सची एसआयपी करण्यासाठी अधिक योग्य ठरेल. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत केवळ स्वतंत्रच नाही, तर अनेक हादरे, हल्ले, परतावून लावतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ट्रम्प यांच्या एकांगी आणि दबावखोर धोरणास शांतपणे उत्तर देत आहोत हीच आपल्या देशाची क्षमता आहे, हे निश्चित!आंतरबँक चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी वधारून 87.67 वर पोहोचला. परकीय गुंतवणुकीचा स्थिर ओघ आणि डॉलर निर्देशांकातील नरमाई, यामुळे रुपयाला बळकटी मिळाली. बाजारात सुरुवातीला झालेल्या घसरणीनंतर, गुंतवणूकदारांनी कमी झालेल्या किमतीत दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याची संधी साधली. विशेषतः, ऑटो, फार्मा, आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली, ज्यामुळे बाजारात चौफेर सुधारणा झाली.
भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी एक नाट्यमय चढ-उतार अनुभवला. सुरुवातीच्या सत्रात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर, शेवटच्या तासात झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराने सर्व नुकसान भरून काढले आशियातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये तेजीचे वातावरण होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई 225, शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग हे सर्व निर्देशांक वाढीसह बंद झाले. बुधवारी अमेरिकेचे बाजारही सकारात्मक पातळीवर बंद झाले होते आणि वॉल स्ट्रीट फ्युचर्समधील तेजीने देशांतर्गत बाजाराला आधार दिला. एकंदरीत, सुरुवातीच्या धक्क्यानंतर बाजाराने दाखवलेली लवचिकता गुंतवणूकदारांचा वाढलेला आत्मविश्वास दर्शवते. आगामी काळात जागतिक घडामोडी आणि व्यापार वाटाघाटींवर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल.
तज्ज्ञांच्या मते, दोन्ही देशांमध्ये वाटाघाटींसाठी अजूनही संधी उपलब्ध आहे, ज्यामुळे बाजाराला मोठा आधार मिळाला. वाटाघाटींसाठी अजूनही 20 दिवसांची मुदत आहे आणि 24 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे एक व्यापारी शिष्टमंडळ भारत दौर्यावर येण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे बाजारातील घसरण थांबली. अमेरिकेच्या शुल्कवाढीच्या घोषणेमुळे सुरुवातीला बाजारावर दबाव होता; पण दिवसाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीयस्तरावर शांतता चर्चेची शक्यता निर्माण झाल्याने आणि अमेरिकेच्या भूमिकेत नरमाई येण्याच्या आशेने बाजाराचे वातावरण सुधारले, हे विशेष! गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली घसरण थांबवत गुरुवारी भारतीय शेअर बाजारात शेवटच्या क्षणी खरेदी दिसून आली. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ नोंदवली गेली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.