

सुचित्रा दिवाकर
भारतीय रेल्वेने देशभरातील सुमारे 74 हजार डब्यांमध्ये आणि 15 हजार इंजिनांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ तांत्रिक यश नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. भारतातील रेल्वे व्यवस्था ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे व्यवस्थांपैकी एक असून रोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेचा वापर करतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर देशात लोकांचे हालचाल माध्यम म्हणून कार्यरत असणार्या रेल्वे व्यवस्थेमध्ये सुरक्षिततेच्या द़ृष्टीने ठोस आणि विश्वासार्ह उपाययोजना असणे अपरिहार्य आहे.
गेल्या काही वर्षांत रेल्वेगाड्यांमध्ये चोरी, लूटमारी, महिलांशी छेडछाड, प्रवाशांचे सामान चोरी जाणे, प्रवाशांवर हल्ला होणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः रात्रीच्या गाड्यांमध्ये किंवा काही विशिष्ट मार्गांवर या घटनांचे प्रमाण इतके वाढले आहे की, त्या मार्गांवरील प्रवासाला लोक घाबरू लागले आहेत. रेल्वे प्रशासनाने अनेक वेळा सुरक्षा दलाची नियुक्ती करून आणि तपासणी वाढवून या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रमाणात त्यात यशही आले आहे; परंतु तरीही अनेक घटना अशा घडतात ज्या क्षणात घडून जातात आणि त्याचे पुरावे मिळणे कठीण होते. त्यामुळे गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांना ओळखण्यासाठी अशी कोणती तरी तंत्रज्ञानाधारित सुविधा हवी होती जी सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेला हातभार लावेल.
सीसीटीव्ही हा पर्याय रेल्वे प्रशासनाने योग्य वेळेस आणि योग्य प्रकारे स्वीकारलेला आहे. या कॅमेर्यांमुळे प्रत्येक डब्याच्या दरवाजाजवळून येणार्या-जाणार्या प्रत्येक प्रवाशाचा चेहरा कॅमेर्यात कैद होईल. यामुळे एखादा गुन्हा घडला, तर त्या वेळेच्या द़ृश्याचं विश्लेषण करून संशयिताची ओळख पटवणे शक्य होईल. हे द़ृश्य केवळ तपासासाठी उपयुक्त ठरणार नाही, तर न्यायालयात साक्ष आणि पुरावा म्हणूनही वापरता येईल. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात सीसीटीव्ही तंत्रज्ञान खूपच मोलाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये वापरण्यात येणार्या तंत्रज्ञानाची गुणवत्ता इतकी उत्कृष्ट आहे की, 100 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावणार्या रेल्वेमध्ये, अगदी कमी प्रकाशातही चेहर्यांची स्पष्ट नोंद करता येते. यामध्ये नाईट व्हिजन कॅमेरे, डिजिटल झूम, मोशन डिटेक्शन आणि क्लाऊड स्टोरेज यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
या निर्णयाचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, प्रवाशांमध्ये सुरक्षा आणि विश्वासाची भावना निर्माण होईल. आज अनेक प्रवासी प्रवास करताना आपल्या सामानाची, महिलांची किंवा वृद्धांची काळजी करत असतात. अनेकजण रात्रीच्या प्रवासाला टाळू लागले आहेत. अशा परिस्थितीत सीसीटीव्ही कॅमेरे सतत देखरेख करत असतील, तर गुन्हेगारच आधीच घाबरून जातील आणि कोणत्याही गैरकृत्याला हात घालणार नाहीत. ही भीतीच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे मुख्य साधन ठरेल. शिवाय अशा उपकरणांचा अवलंब केल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल आणि उत्तरदायित्वाबद्दल सामान्य जनतेमध्ये सकारात्मक भावना निर्माण होते.
पूर्वी अनेक वेळा अशी उदाहरणे समोर आली की, प्रवाशाचे सामान चोरीला गेले अथवा महिलांची छेडछोड केली जाऊनही त्याचा काहीच मागोवा लागला नाही. कारण, ना कोणती द़ृश्ये उपलब्ध होती ना कोणती ओळख; पण आता जेव्हा एखादी घटना घडेल तेव्हा रेल्वे पोलिसांना आणि तपास अधिकार्यांना तपासासाठी ठोस आधार मिळेल. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या योजनेचा मोठा फायदा म्हणजे भविष्यात होणार्या गुन्ह्यांना आधीच रोखणे शक्य होईल.