Pawan Kumar Chandana | अंतराळातील टॅक्सीचा भारतीय सारथी

Pawan Kumar Chandana |
Pawan Kumar Chandana | अंतराळातील टॅक्सीचा भारतीय सारथी
Published on: 
Updated on: 

सचिन पाटील

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. गणितात मध्यम म्हणता येतील एवढेच गुण मिळविणारा मुलगा. तरीही प्रचंड कष्टाच्या बळावर आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश मिळविला आणि आज ते भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक, एरोस्पेस अभियंता आणि स्कायरूट एरोस्पेसचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पवन कुमार चंदना त्यांचे नाव. नोव्हेंबर २०२६ मध्ये TIME१०० Next India २०२६ यादीत त्यांचा समावेश झाला आहे. जागतिक आवृत्तीच्या तीन मुख्य मुखपृष्ठांपैकी मुखपृष्ठावर त्यांना मानाचे स्थान मिळाले आहे, हे विशेष.

मूळचे तेलंगणामधील हैदराबाद येथील पवन कुमार यांनी २००७ मध्ये आयआयटी खरगपूर गाठले. त्याच काळात ‘स्पेसएक्स’ने पहिल्यांदा फाल्कन-१ रॉकेट यशस्वीरीत्या अवकाशात पाठवले होते. त्या घटनेने प्रेरित होऊन पवन यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमात योगदान देण्याचे स्वप्न पाहिले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) काही वर्षे नोकरी केली. तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये रॉकेट वैज्ञानिक म्हणून जवळपास ६ वर्षे काम केले. येथे त्यांनी भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या GSLV Mk-II, GSLV Mk-III (LVM३) आणि जगातील सर्वात मोठ्या S-२०० सॉलिड रॉकेट बूस्टर प्रकल्पांवर प्रणाली अभियंता म्हणून काम केले. २०१८ मध्ये त्यांनी नोकरी सोडली.

पवन यांनी इस्रोमधील सहकारी वैज्ञानिक नागा भरत डाका यांच्यासोबत हैदराबाद येथे स्कायरूट एरोस्पेस कंपनीची स्थापना केली. ऑगस्ट २०२० मध्ये स्कायरूटने ‘रमण-१’ या भारतातील पहिल्या १०० टक्के ३ डी-प्रिंटेड लिक्विड रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली. २०२० मध्ये केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले. २०२१ मध्ये इस्रोसोबत अधिकृत सामंजस्य करार करणारी स्कायरूट ही पहिली खासगी कंपनी ठरली. याच वर्षी त्यांनी ३ डी-प्रिंटेड क्रायोजेनिक इंजिन ‘धवन-१’ची देखील यशस्वी चाचणी केली.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून विक्रम-एस या सब-ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून स्कायरूटने इतिहास रचला.

सुमारे ८९.५ किमी उंची गाठणारे आणि ३ उपग्रह वाहून नेणारे हे भारताचे पहिले खासगी रॉकेट ठरले. १८ जुलै २०२६ रोजी श्रीहरिकोटा येथून विक्रम-१ हे भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. ३५० ते ४८० किलोपर्यंतचे उपग्रह लो-अर्थ ऑर्बिटमध्ये नेण्याची क्षमता या रॉकेटमध्ये आहे. या ऐतिहासिक यशानंतर कंपनीचे मूल्यांकन १.१ अब्ज डॉलर (सुमारे ९,२०० कोटी रुपये) पार गेले आणि ती भारताची पहिली स्पेस-टेक युनिकॉर्न कंपनी बनली. हैदराबाद येथे ६०,००० चौ. फूट जागेवर ‘मॅक्स-क्यू’ मुख्यालय आणि २ लाख चौ. फूट जागेवर ‘इन्फिनिटी कॅम्पस’ उभारला आहे. येथे दर महिन्याला एक संपूर्ण ऑर्बिटल रॉकेट तयार करण्याची क्षमता असून, १,००० हून अधिक तरुण अभियंते कार्यरत आहेत.

पवन कुमार चंदना स्कायरूटचे वर्णन ‘स्पेस टॅक्सी सर्व्हिस’ असे करतात. ज्याप्रमाणे आपण कॅब बुक करतो, त्याचप्रमाणे जगातील कोणत्याही कंपनीला किंवा देशाला त्यांचा लहान उपग्रह अवकाशात पाठवायचा असल्यास स्कायरूट प्रतिकिलो सुमारे १०,००० ते १५,००० डॉलर्स या दरात प्रक्षेपण सेवा देते. देशातील २०० हून अधिक अंतराळ स्टार्टअप्सचे नेतृत्व स्कायरूट करत आहे. भविष्यात पुनर्वापर करता येणारी मोठी रॉकेटस्‌ तयार करणे, अवकाशात डेटा सेंटर्स उभारणे आणि मानवी अंतराळ मोहिमा पाठवणे हे पवन यांचे पुढील ध्येय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.