आर. चिदंबरम

भारताच्या अणुऊर्जा प्रकल्पाचे शिल्पकार
R.Chidambaram
आर. चिदंबरमpudhari photo
Published on
Updated on
युवराज इंगवले

भारताच्या अणुऊर्जा प्रकल्पाचे शिल्पकार आणि 1974 (स्माईलिंग बुद्धा) आणि 1998 मध्ये पोखरणमधील (ऑपरेशन शक्ती) अशा दोन्ही आण्विक चाचण्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान बजावणारे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम (आर. चिदंबरम) यांनी वयाच्या 88 वर्षी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. चिदंबरम हे भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठित शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांचे भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे दूरदर्शी नेतृत्व कायम स्मरणात राहील, अशी आदरांजली त्यांना अणुऊर्जा विभागाने (डीएई) वाहिली आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणू संशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षासह अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी चोखपणे बजावली आहे. चिदंबरम यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत भारताची अण्वस्त्रे विकसित करण्यात मोलाची कामगिरी केली आहे.

1974 मध्ये पोखरण चाचणी रेंजमध्ये पहिल्या भारतीय अणुचाचणीच्या (स्माइलिंग बुद्धा) या पथकाचे ते एक भाग होते. त्यांनी या टीमचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. तसेच त्यांनी डीएईने मे 1998 मध्ये दुसर्‍या अणुचाचण्या घेण्याच्या प्रयत्नांचे निरीक्षण आणि नेतृत्व केले होते. ही चाचणी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात घेण्यात आली. त्यावेळी चिंदबरम हे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखालील पथकाचे एक भाग होते. डॉ. चिदंबरम यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1936 मध्ये मद्रास प्रांतात झाला. चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे ते माजी विद्यार्थी होते. डॉ. चिदंबरम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 1975 मध्ये पद्मश्री आणि 1999 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारने भारत सरकारने गौरविले आहे. इतकेच नाही, तर त्यांना अनेक विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेटसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

डॉ. चिदंबरम यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (2001-2018), भाभा अणू संशोधन केंद्राचे संचालक (1990-1993), अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष (1993-2000) अशा अनेक मानाच्या पदांवर काम केले आहे. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष (1994-1995) म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराचे समर्थक म्हणून डॉ. चिदंबरम यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे नेतृत्व केले आहे. अणू विज्ञानात अनेक देश एकमेकांना मदत करतात; पण भारत या क्षेत्रात एकटाच आहे. भारताने स्वतःचे अणू तंत्रज्ञान व प्रकल्प तयार केले आहेत. अमेरिकेच्या अणू प्रकल्पात ब्रिटन, रशिया-चीन, चीन-पाकिस्तान, अमेरिका-फ्रान्स, फ्रान्स-इस्रायल आदींचे अणू करारात संबंध आहेत; पण भारताला दुसर्‍यांच्या अणू प्रकल्पात हेरगिरी करण्याची गरज पडत नाही. कारण, भारताकडे जागतिक दर्जाच्या अणू शास्त्रज्ञांचे पथक असल्याचे ते सातत्याने सांगत असत. अशा थोर शास्त्रज्ञाला देश आता मुकला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news