

चॅम्पियन्स करंडकावर भारताने तिसर्यांदा मोहोर उमटवून या स्पर्धेचे सुमारे 12 वर्षांनंतर जेतेपद पटकाविले आहे. गेल्यावर्षी टी-20 विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाने एका तपानंतर चॅम्पियन्स करंडक जिंकल्यामुळे संपूर्ण देशात आनंदलहरी निर्माण झाल्या आहेत. टीम इंडियाने काही चुका केल्यास टीकेचे प्रहार करणारा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भारताच्या या विजयानंतर मैदानावर नाचून आनंद साजरा केला.
वास्तविक, ऑस्ट्रेलिया दौर्यापासून कर्णधार रोहित शर्माच्या कारकिर्दीविषयी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. काँग्रेस पक्षाच्या एका महिला प्रवक्त्यानेही रोहितवर टीकाटिप्पणी केली होती. कोणतेही दडपण झुगारून देऊन जिंकायचे कसे आणि खेळाचा आनंद कसा लुटायचा, हे आता भारतीय संघाला चांगलेच उमगले असल्याचे उद्गार रोहितने काढले असून, त्यावरून त्याची प्रगल्भता दिसून येते. अंतिम लढतीत भारतीय संघाने तुल्यबळ न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला आणि यासह चॅम्पियन स्पर्धा तीनवेळा जिंकणारा पहिला संघ ठरण्याचा मानही भारताने पटकावला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणार्या न्यूझीलंडने उत्तम सुरुवात केली. मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या या जलदगती गोलंदाजांना खेळपट्टीकडून विशेष मदत मिळाली नाही; पण कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती ही जोडी न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात यशस्वी ठरली. वरुणने फिलिप्सचा ज्या पद्धतीने त्रिफळा उडवला, तो सामन्यातील एक निर्णायक क्षण होता. न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि रोहित यांनी 105 धावांची भागीदारी रचत तडाखेबंद खेळी केली. न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारतीय फळीच्या अडचणी वाढवल्या. श्रेयस व अक्षर पटेल आणि राहुल व हार्दिक पंड्या हे संघावर दबाव येणार नाही, अशा पद्धतीने खेळले. या सामन्यात रोहितने 76 धावांच्या खेळीने टीकाकारांना सणसणीत उत्तर दिले. यापूर्वी 30 किंवा 40 धावा झाल्यावर रोहित बाद होतो, त्याच्यात सातत्य नाही वगैरे शेरेबाजी सुरू असूनही तो खचला नाही. खरे तर, या स्पर्धेत सर्वाधिक बळी न्यूझीलंडच्या मॅट हेन्री या वेगवान गोलंदाजाच्या नावे असूनही, उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे तो सामना खेळू शकला नाही. भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात त्याने पाच बळी मिळवले होते. एकप्रकारे मॅटच्या अनुपस्थितीमुळे भारतास फायदाच झाला.
दुर्दैवाने नेहमीप्रमाणे नाणेफेक जिंकण्यात सलग बाराव्या एकदिवसीय सामन्यात रोहितला अपयश आले. याबाबतीत वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या विक्रमाशीच रोहितने बरोबरी साधली. न्यूझीलंडने नाणेफेक जिकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारताना अवघ्या सात षटकांतच 50 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे भारतीय संघ दडपणाखाली आला होता; पण भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या साखळी सामन्याची खेळपट्टीच अंतिम सामन्यातही असल्यामुळे ती संथ होती. त्यामुळे वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना ती अनुकूल ठरणार, हाच अंदाज होता आणि तोच खरा ठरला. रोहितचे वैशिष्ट्य म्हणजे 76 धावांची खेळी करूनही विजेतेपद मिळवल्यानंतरच त्याने सहकार्यांचा दिलदारपणे गौरव केला. वास्तविक स्पर्धेत उत्कृष्ट खेळणे आणि नेतृत्वही करणे याचा तणाव पुष्कळ असतो; पण रोहितमध्ये संघनायकाला साजेसे गुण आहेत. पाच-पाच फिरकी गोलंदाज घेऊन जाण्याच्या निर्णयावर शंका उपस्थित करण्यात आल्या; पण दुबईत खेळपट्टी संथ आहे, हे लक्षात घेऊनच हा निर्णय झाला होता. भारतीय संघात कमालीची गुणवत्ता असून, संघातील वातावरण आनंदी व खेळीमेळीचे आहे, ही बाब मुद्दाम नोंदवली पाहिजे. वरुण चक्रवर्तीला शेवटच्या क्षणी संघात घेण्याच्या निर्णयाबद्दल सवाल उपस्थित करण्यात आले; पण त्याने क्रिकेटप्रेमींना निराश केले नाही. युवा पिढीकडे भारतीय क्रिकेट पुढे घेऊन जाण्याची नक्कीच क्षमता आहे. भारताने 2002 मध्ये प्रथम चॅम्पियन्स चषक मिळवला होता; पण त्यावेळी श्रीलंका व भारताला जेतेपद विभागून दिले होते. त्यानंतर 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स चषक जिंकला होता.
2017 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन इंग्लंड आणि वेल्समध्ये करण्यात आले होते. उपांत्य फेरीत बांगला देशचा पराभव करत आपण अंतिम सामन्यात धडक मारली होती; मात्र अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 338 धावांचा डोंगर रचला. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 158 धावांवरच आटोपला, तेव्हा 180 धावांनी पाकिस्तानने विजय मिळवला. हा पराभव भारतीय क्रिकेट चाहत्यांना जिव्हारी लागला होता. 2021 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत झाली. यामध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानने पराभव केला आणि उपांत्य फेरीही गाठता आली नाही; मात्र यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पाकिस्तानचा 6 विकेटस्नी दणदणीत पराभव केला आणि 2017च्या पराभवाचा बदला घेतला. विराट कोहलीचे शानदार शतक आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा विजय साकारला. भारताने विजय मिळवला; पण अंतिम सामन्यानंतर या स्पर्धेचे यजमान असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) कोणत्याही प्रतिनिधीची पुरस्कार वितरणात व्यासपीठावर उपस्थिती नव्हती. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही याबाबत आश्चर्य व्यक्त केले असून, आयसीसीने पीसीबीच्या अधिकार्यांना मंचावर बोलावले नाही, असे सांगण्यात येत असले, तरीही हा पराभव पचवणे पाकिस्तानला जड गेले असणार, हे स्पष्टपणे दिसते. चॅम्पियन्स स्पर्धा ऑस्ट्रेलियाला आजवर दोनदाच जिंकता आली आहे. या स्पर्धेत तरी भारत तीनदा अजिंक्यपद मिळवून ऑस्ट्रेलियापेक्षा सरस ठरला आहे. कसोटी अजिंक्यपद, एक दिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि त्यामागोमाग चॅम्पियन्स करंडक अशा सलग चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात भारताने यश मिळवले. चारपैकी दोनमध्ये अजिंक्यपद आणि दोनमध्ये उपविजेतेपद, ही कामगिरी कौतुकास्पद म्हणावी लागेल. ज्येष्ठ व तरुण अशा खेळाडूंचा व्यवस्थित मेळ साधत भारताने मिळवलेल्या या यशामुळे ‘चक दे इंडिया’ असेच म्हणावेसे वाटते.