बुद्धिबळातील भारताचे यश

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत महाशक्ती म्हणून नावारूपास
India chess victories
बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे यश
Published on
Updated on
नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेतील भारताचे यश अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जाते. एके काळी सोव्हिएत रशियाच्या बुद्धिबळपटूंचा बोलबाला होता. त्यांच्या अचाट खेळीने जग स्तब्ध व्हायचे. त्यांच्या खेळाडूंसमोर निभाव लागणे कठीण असायचे. हीच स्थिती आता भारतीय संघाची झाली आहे. भारतीय संघ शक्तिशाली आहे. खेळाडू नवोदित आहेत आणि जिद्दी आहेत. त्यांना पराभूत करणे आगामी काळात अधिक कठीण राहू शकते. ऑलिम्पियाडमधील यश याची झलक म्हणावी लागेल.

अथक प्रयत्नांनंतर भारताला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत महाशक्ती म्हणून नावारूपास येण्यात यश आले. भारताने 1956 मध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सहभागी होण्यास सुरुवात केली. यादरम्यान अनेकदा अपयश पदरी पडल्यानंतर पहिल्यांदा 2014 मध्ये ब—ाँझ पदक जिंकण्यात भारताला यश आले. पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकत महिला संघानेही 2022 मध्ये ब—ाँझ पदक जिंकण्यात यश मिळवले आणि त्याचवेळी पुरुष संघानेही ब—ाँझ जिंकले. आता बुडापेस्ट बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने दोन्ही वर्गांत सुवर्णपदक जिंकत इतिहास घडविला आहे. भारताच्या बुद्धिबळातील यशाला आणखी एक अध्याय जोडणे बाकी आहे. डी. गुकेश हा सर्वात कमी वयाचा खेळाडू चॅम्पियन ठरला आहे. आता 20 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत चालणार्‍या जागतिक चॅम्पियनशीपमध्ये त्याला चीनच्या डिंग लिरेनला आव्हान द्यायचे आहे. यात यश मिळाले, तर अशा प्रकारचे यश मिळवणारा तो आनंदनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू राहील. दोन्ही खेळाडूंची मागची कामगिरी पाहिली, तर गुकेश हाच अजिंक्य राहण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. लिरेन हा अनेक महिन्यांपासून क्लासिकल बुद्धिबळ खेळलेला नाही आणि ‘फीडे’च्या लाईव्ह क्रमवारीतही तो 21 व्या स्थानापर्यंत घसरला. गुकेश हा चांगल्या कामगिरीमुळे पाचव्या स्थानावर आहे आणि 2800 ईएलओ रेटिंगजवळ पोहोचला आहे.

ऑलिम्पियाडमधील भारतीय संघाच्या वर्चस्वाची कहाणी इथेच संपत नाही. 32 वर्षांत सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवणारा संघ म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. भारत अकरा फेर्‍यांत 44 डावांत केवळ एकदाच पराभूत झाला आणि 27 डाव जिंकले आणि उर्वरित डाव अनिर्णित राहिले. भारताने शेवटच्या फेरीत स्लोव्हेनियावर 3.5-0.5 अंकांनी विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. महिला संघानेही शेवटच्या फेरीत अझरबैजानवर विजय मिळवत अजिंक्यपदाची रेषा गाठली. भारतासाठी पुरुष वर्गात गुकेश आणि अर्जुन एरिगेसी तसेच महिला वर्गातील दिव्या देशमुख आणि वंतिका अग्रवालने व्यक्तिगत सुवर्णपदक पटकावले. अर्जुन हा भारताचा पहिल्या क्रमाकांचा खेळाडू. त्याला ऑलिम्पियाडमध्ये तिसर्‍या बोर्डवर खेळवण्याची भारताची रणनीती अचूक ठरली. त्याने दहापैकी नऊ डाव जिंकत सुवर्णपदक पटकावले. गुकेशने पहिल्या बोर्डवर खेळत दहापैकी आठ डाव जिंकले आणि सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले.

महिला वर्गात 18 वर्षीय दिव्या देशमुख आणि 21 वर्षीय वंतिका अग्रवालने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकत भारताला अंजिक्यपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दिव्याने अकरापैकी आठ डाव जिंकले, तर वंतिकाने नऊपैकी सहा डाव जिंकले. अर्जुनला तिसर्‍या बोर्डवर खेळविण्याचा फायदा म्हणजे त्याला प्रत्येक फेरीत विरोधी पक्षाच्या संघातील तिसर्‍या क्रमाकांच्या सर्वोत्तम खेळाडूचा सामना करावा लागला, त्यामुळे त्याला अकरा फेरीत दहा डाव जिंकण्यात यश आले आणि त्यामुळे त्याने तिसर्‍या बोर्डवरील व्यक्तिगत सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले. गुकेश टॉप बोर्डवर खेळला आणि त्याने सर्व संघांतील सर्वोत्तम खेळाडूचा सामना करत दहापैकी नऊ डाव जिंकत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. कामगिरीबद्धलचे 3056 रेटिंग मिळवणारा तो ऑलिम्पियाडमधील आणि तीन हजार गुणांचा पल्ला पार करणारा एकमेव खेळाडू ठरला. भारतासाठी 1998-2022 या काळात बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सर्वाधिक 113 डाव खेळणारा शशिकिरण म्हणतो, भारतीय संघाने माझ्या कारकिर्दीतच सुवर्णपदक जिंकल्याचा मला आनंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news