

राजेंद्रकुमार चौगले
‘खोटं बोल; पण रेटून बोल’ ही म्हण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तंतोतंत लागू पडते. भारत-पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्ध केवळ मध्यस्थीमुळेच टळले, असा खळबळजनक दावा त्यांनी पुन्हा केला. यापूर्वीही ट्रम्प यांनी अनेकदा असे दावे केले असले, तरी त्यांच्या या पोपटपंची वक्तव्यांनी पोकळपणाची चाळीशी गाठली. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यामध्ये काही राजकीय संदर्भ किंवा छुपे हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण ‘मीच युद्ध थांबवले’ हा त्यांचा वारंवार केला जाणारा दावा आता निव्वळ आत्मप्रौढीचा नमुना ठरतोय.
अमेरिकन कॉर्नरस्टोन इन्स्टिट्यूट फाऊंडर्स डिनर्सच्या 20 सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक समारंभामध्ये ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत मध्यस्थी केल्याचा पुनरुच्चार केला. अमेरिकेला जो काही सन्मान मिळत आहे, त्याचा कर्ताकरविता मीच आहे, हे सोदाहरण सांगताना भारत-पाकिस्तानसह जगातील 7 देशांत उद्भवलेल्या युद्धजन्य स्थितीचा त्यांनी उल्लेख केला. भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबतची पहिली घोषणा ट्रम्प यांनी 10 मे रोजी केली. ट्रम्प यांनी सांगितले की, सध्याचा काळ अमेरिकेसाठीचा सुवर्ण काळ आहे. एवढंच नाही, तर मी पुन्हा सांगतो, भारत-पाकिस्तान युद्धासह मी इतर देशांमधील सात युद्धे थांबवली आहेत. भारत-पाकिस्तानला मी व्यापारी करारातून बाहेर काढण्याची किंवा त्यांच्यावर टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. त्यांच्या मते, यामुळेच दोन्ही देशांनी युद्ध थांबवण्यास सहमती दर्शवली; मात्र दुसर्या बाजूला भारताने ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा दावा सपशेल फेटाळला.
याबाबत भारताचे स्पष्ट म्हणणे की, भारत-पाकिस्तानमधील संबंध हे पूर्णपणे द्विपक्षीय आहेत आणि त्यात कोणत्याही तिसर्या देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही. भारताचे परराष्ट्र धोरण हे स्वायत्त असल्याने अमेरिकाच काय, तर इतर कोणत्याही देशाच्या दबावाखाली भारत निर्णय घेत नाही. रशियाकडून तेल खरेदी करण्यासारखे निर्णय भारताने राष्ट्रीय हितासाठी घेतले आहेत, ज्यावर ट्रम्प यांनी टीका केली होती आणि त्यासाठी भारतावर अतिरिक्त कर लावण्याचाही प्रयत्न केला. ट्रम्प यांनी सर्वप्रथम भारत-पाक युद्धप्रकरणी आपण मध्यस्थी केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा त्याचे पडसाद लोकसभेतही उमटले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने याबाबत प्रश्न उपस्थित करून पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे, अशीही मागणी केली होती; पण मोदी यांनी कुणाचीही मध्यस्थी भारताने सहन केली नाही, कुणीही यात मध्यस्थी केली नाही, असे लोकसभेत ठणकावून सांगितले होते.
काही विश्लेषक ट्रम्प यांच्या दाव्याकडे त्यांच्या कूटनीतीचा एक भाग म्हणून पाहतात. ट्रम्प यांचे दावे त्यांच्या राजकीय स्वाार्थासाठी असतात. दुसर्या बाजूला वस्तुस्थिती अशी की, त्यावेळी अमेरिकेने शांतता राखण्यासाठी पडद्यामागून काही प्रयत्न केले असतीलही; पण आमच्यामुळे युद्ध थांबले, असा डांगोरा पिटणे म्हणजे अतिशयोक्ती आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत वाढवलेली जवळीक आणि भारतावर टॅरिफ लावण्याच्या धमक्या यामुळे भारत-अमेरिका संबंधात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन आणि जेक सुलिवन यांनीही ट्रम्प यांच्या पाकिस्तान धोरणामुळे भारताशी असलेल्या संबंधांना धोका निर्माण झाल्याचा घरचा आहेर दिला, हे विशेष! भारताने भूमिका ठामपणे मांडली असली, तरी अशा दाव्यांमुळे काही प्रमाणात गैरसमज निर्माण होऊ शकतात, हे निश्चित!
अमेरिकेच्या राजकारणात वादळ निर्माण करणारे ट्रम्प यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा एखाद्या नाण्याच्या दोन बाजूंसारखी आहे. एका बाजूला ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देत देशाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा एक खंबीर नेता, तर दुसर्या बाजूला आंतरराष्ट्रीय करार आणि मित्र राष्ट्रांशी असलेले संबंध धोक्यात आणणारा एक लहरी राष्ट्रप्रमुख. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जागतिक राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली, ज्याचे पडसाद आजही उमटत आहेत. ट्रम्प यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा ही त्यांच्या देवाणघेवाणीच्या परराष्ट्र धोरणाचे प्रतिबिंब आहे. त्यांनी पारंपरिक मैत्री किंवा मूल्यांपेक्षा थेट फायदा-तोट्याच्या गणितावर अधिक भर दिला. काही देशांना त्यांच्या धोरणांमुळे फायदा झाला, तर अनेकांना तोटा सहन करावा लागला. त्यांचे समर्थक त्यांना एका धाडसी नेत्याच्या रूपात पाहतात, ज्याने प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिले, तर त्यांचे टीकाकार त्यांना जागतिक स्थैर्यासाठी धोका मानतात. एकंदरीत ट्रम्प यांनी जागतिक पटलावर न पुसता येणारा; पण वादग्रस्त ठसा उमटवलाय, हे निश्चित! तरीही, ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ नीतीने ट्रम्प प्रशासनाने चीनच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठी भारताला एक महत्त्वपूर्ण रणनीतिक भागीदार मानले आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी एकत्र काम केले. याचा पुढचा टप्पा म्हणून अमेरिकेने भारताला अत्याधुनिक लष्करी शस्त्रे विकली, ज्यात अपाची आणि चिनूक या अद्ययावत हेलिकॉप्टर्सचा समावेश होता. यामुळे ट्रम्प-मोदी मैत्रीचे चांगले बंध जुळले होते.
ट्रम्प-मोदी वैयक्तिक संबंधामुळे दोन्ही देशांतील भागीदारीला एक वेगळीच दिशा मिळाली, हे नाकारता येणार नाही. काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांचे भारताच्या संदर्भातील धोरण हे प्रामुख्याने तीन गोष्टींवर आधारित होते. त्यात व्यापार, संरक्षण आणि दोन्ही देशांमधील वैयक्तिक संबंधांचा समावेश होता. त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणामुळे भारताकडून आयात होणार्या वस्तूंवर उच्च शुल्क लादले. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंधात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. ट्रम्प यांनी अमेरिकेची भारतासोबतची व्यापार तूट मुद्दामहून कमी करण्यावर भर दिला. त्यांच्या मते, भारताने त्यांची उत्पादने अमेरिकेला निर्यात करून जास्त फायदा मिळवला होता. या तुलनेत अमेरिकेला तोटा सोसावा लागला. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. यामध्ये रशियाकडून भारताने केलेली तेलाची आयात, भारतावर आकारलेला 50 टक्के टॅरिफ, एच-1 बी व्हिसासाठी केलेली भारतीयांसाठी न परवडणारी वाढ आदी घडामोडी ट्रम्प यांच्या राजकीय रणनीतीचा भाग असेलही; पण भारताच्या द़ृष्टीने दोन्ही देशांमधील कोणताही संघर्ष हा द्विपक्षीय पातळीवरच सोडवला गेला आणि अमेरिकेच्या मध्यस्थीचा त्यात थेट सहभाग कुठेही नाही, हे मात्र स्पष्ट आहे. ट्रम्प यांच्या दाव्यामुळे हे पुन्हा स्पष्ट झाले की, अण्वस्त्रधारी भारत-पाकिस्तान या शेजारी देशांतील छोटासा संघर्षही किती भयानक रूप घेऊ शकतो आणि महासत्तेला त्यात हस्तक्षेप का करावासा वाटतो. या दाव्यामागील सत्य काहीही असले, तरी त्याने दक्षिण आशियातील भू-राजकीय तणावाकडे आणि त्याच्या परिणामांकडे जगाचे लक्ष पुन्हा वेधले, हे निश्चित!