

शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानने पुन्हा मूळ रूप दाखवून दिले आहे. खरे पाहता भारताला डिवचण्याची खुमखुमी असणार्या पाकला गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये भारताच्या सामरिक सज्जतेचा अंदाज यायलाच हवा होता. आज दोन्हीही देश भलेही अण्वस्त्रधारी असले तरी सांख्यिकीद़ृष्ट्या, संहारकद़ृष्ट्या आणि अद्ययावततेबाबतही भारताचे सामरिक सामर्थ्य पाकिस्तानपेक्षा किती तरी पटींनी अधिक आहे. त्यामुळे भारताच्या संयमाचा अंत पाहिल्यास जगाचा नकाशाही बदलू शकतो, हे नापाक पाकने समजून घ्यायला हवे.
अमेरिकेच्या दबावामुळे आणि भारताच्या वज्रप्रहाराने भयभीत झाल्यामुळे पाकिस्तानच्या डीएमओंनी फोन करून भारताला संघर्ष थांबवण्याची विनंती केली. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने लष्करी प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेताना ‘नॉन स्टेट अॅक्टर्स’ना म्हणजेच दहशतवाद्यांना धडा शिकवणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले होते. तरीही पाकिस्तानने प्रतिहल्ला केल्याने भारताने त्यास सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे भारताचे ईप्सित साध्य झालेले आहे. साहजिकच भारतानेही पाकिस्तानच्या दयायाचनेनंतर शस्त्रसंधीसाठी होकार दर्शवला.
भारत आणि पाकिस्तान हे दक्षिण आशियातील दोन अणुशक्ती संपन्न शेजारी देश आहेत. 1947 मध्ये झालेल्या फाळणीनंतर या दोन राष्ट्रांमध्ये चार मोठी युद्धे झाली असून या चारही युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलेले आहे. भारताची लष्करी यंत्रणा ही जगातील तिसर्या क्रमांकाची मोठी यंत्रणा मानली जाते. स्थलसेना, नौदल आणि वायुदल ही भारताची तीनही संरक्षण दले अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, उपग्रह तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र प्रणाली आणि अण्वस्त्रक्षमतेने परिपूर्ण आहेत. भारताचे संरक्षण बजेट 70 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असून, गेल्या काही वर्षांत स्वदेशी संरक्षण उत्पादनालाही देशात मोठ्या प्रमाणावर चालना दिली जात आहे. सांख्यिकीद़ृष्ट्या तुलनात्मक अभ्यास केल्यास भारताकडे सुमारे साडेचौदा लाखांहून अधिक सक्रिय सैनिक आहेत; तर पाकिस्तानकडे अवघे साडेसहा लाख सैनिक आहेत.
राखीव सैनिकांची संख्याही पाकिस्तानची सुमारे साडेपाच लाख आहे; तर भारताची 11.50 लाखांहून अधिक आहे. भारताकडे 4200 हून अधिक रणगाडे आहेत; तर पाकिस्तानकडे 2600 रणगाडे आहेत. भारताकडे एकूण विमानांची संख्या 2230 हून अधिक आहे. पाकिस्तानकडे 1400 विमाने आहेत. लढाऊ विमानांच्या बाबतही भारत पाकिस्तानपेक्षा सरस आहे. संरक्षण दलात वापरल्या जाणार्या हेलिकॉप्टर्सचा विचार केल्यास भारताकडे अशा हेलिकॉप्टर्सची संख्या पाकिस्तानपेक्षा अडीच पटींनी जास्त म्हणजे 900 इतकी आहे. यामध्ये 80 लढाऊ हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. आर्मड् व्हेईकल्सच्या क्षेत्रात पाकिस्तान भारतापेक्षा कोसो मैल दूर आहे. भारतीय लष्करात अशा वाहनांची संख्या सुमारे 1.5 लाख इतकी आहे; तर पाकिस्तानात केवळ 17500 इतकीच आर्मड् व्हेईकल्स आहेत. समुद्री लढाईसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्या पाणबुड्यांबाबतही भारत पुढे आहे. भारताकडे 18 पाणबुड्या आणि 13 विनाशिका आहेत. पाकिस्तानकडे एकही विनाशिका नसून पाणबुड्यांची संख्याही केवळ 8 इतकी आहे.
भारताची सामरिक ताकद बहुआयामी आहे. जमीन, जल, वायू आणि अंतराळ क्षेत्र; इतकेच नव्हे तर सायबर वॉरफेअरमध्येही भारत पाकिस्तानपेक्षा काही पटींनी वरचढ आहे. भारताचे संरक्षण बजेट 86 अब्ज डॉलर्स इतके आहे; तर पाकिस्तानचे केवळ 10 अब्ज डॉलर्स. फ्रान्स, रशिया व अमेरिकेकडून घेतलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे भारताची सामरिक सज्जता अत्याधुनिक, अभेद्य आणि प्रचंड मारकक्षमता असणारी आहे. पाकिस्तानला 81 टक्के शस्त्रे चीनकडून मिळतात आणि त्यांची उपयुक्तता किती आहे, हे ताज्या हल्ल्यानंतर जगाला दिसून आले आहे. पाकिस्तान लष्कर राजकीयद़ृष्ट्या प्रभावशाली असून दहशतवाद आणि हायब्रिड वॉरफेअरवर लक्ष केंद्रित करत आहे. याउलट भारताचे संरक्षण धोरण हे प्रतिरोधनवर आधारित आहे. आजवरच्या इतिहासात भारताने कोणत्याही राष्ट्रावर आपणहून हल्ला केलेला नाही. त्यामुळेच अण्वस्त्रधारी देश असूनही भारताकडे जबाबदार अणुशक्ती म्हणून पाहिले जाते. याउलट पाकिस्तानचा अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र बनण्याचा इतिहासच प्रारंभीपासून संशयास्पद राहिला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय वायुदलात, नौदलात आणि स्थलसेनेमध्ये एकाहून एक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दाखल झाली आहेत. आज भारताची एस-400 सुदर्शन चक्र यांसारखी संरक्षण यंत्रणा पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ करत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांतील स्थिती पाहता पाकिस्तानचे सुरक्षा कवच कुचकामी ठरताना दिसून येत आहे. याउलट भारताची सक्षम क्षेपणास्त्र प्रणाली लांब पल्ला आणि अनेक ठिकाणांवरून वापरण्यात येणारे तंत्रज्ञान यांचे अनोखे मिश्रण आहे. अग्नि-5 हे भारताचे आघाडीचे क्षेपणास्त्र मानले जाते आणि हे क्षेपणास्त्र पाच ते आठ हजार किलोमीटरचा पल्ला पार करू शकते. विशेष म्हणजे अग्नि क्षेपणास्त्र चीन, युरोप आणि त्याहीपुढे जाण्यास सक्षम आहे.
रशियाच्या सहकार्याने विकसित केलेले सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ब्राह्मोस हा भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याचा मेरूमणी आहे. ब्राह्मोसला जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीतूनही डागता येऊ शकते. या क्षेपणास्त्राची 290-600 किलोमीटरची रेंज आणि लक्ष्य अचूकतेने भेदण्याची क्षमता पाहता शत्रूच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी सर्वंकष शस्त्र म्हणून पाहता येईल. भारताने 2024 मध्ये एका हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. शिवाय ‘प्रलय’ आणि ‘शौर्य’ नावाचे सामरिक क्षेपणास्त्रही भारतीय लष्कराच्या ताफ्यात आहे. त्याची क्षमता अनुक्रमे 500 किलोमीटर आणि 700किलोमीटर आहे. पाकिस्तानचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हा चीन आणि बेलारूसच्या मदतीने विकसित केला जातो. पाकिस्तानचा शस्त्रसाठा हा सक्षम असल्याचे बोलले जाते. पण रेंज आणि तंत्रज्ञानाच्या आघाडीवर तो भारताच्या खूपच मागे आहे. शाहिन मालिकेतील 2750 किलोमीटरची रेंज असलेले शाहिन-3 हे पाकिस्तानचे सर्वात दूरवरचे लक्ष्य भेदणारे क्षेपणास्त्र आहे. भारताचे अग्नि-5 आणि ‘एसएलबीएम’ क्षेपणास्त्र रेंजच्या बाबतीत पाकिस्तानच्या शाहिन-3 पेक्षा कैक पटींनी अधिक भेदक आणि अत्याधुनिक आहेत. या माध्यमातून भारताला दक्षिण आशिया क्षेत्राबाहेर रणनीती आखण्यास मदत मिळते. पाकिस्तानकडील क्षेपणास्त्र कार्यक्रमाला मर्यादा असून बहुतांश क्षेपणास्त्रांची मारक क्षमता कमीच आहे.