

प्रा. विजया पंडित
भारताने आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आणि भुवनेश्वर येथील प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी मिळून मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशातील पहिली स्वदेशी लस विकसित केली आहे. ही लस केवळ उपचारात्मक नाही, तर प्रतिबंधात्मक आहे. कारण, ती मलेरियाचा परजीवी रक्त प्रवाहात शिरण्याच्या आधीच त्याला रोखण्याची क्षमता ठेवते. ही क्रिया केवळ वैयक्तिक पातळीवर नाही, तर संपूर्ण समाजात संसर्ग प्रसार थांबविण्यात मदत करणारी आहे.
एडफाल्सीव्हॅक्स नावाची ही लस शरीरात मजबूत अँटिबॉडीज तयार करते आणि त्या प्लास्मोडियम फॅल्किपॅरम या मलेरियाच्या प्रमुख परजीवींना नष्ट करण्याचे काम करतात. पारंपरिक लसी हे कार्य परजीवी शरीरात शिरल्यानंतर करतात; पण ही नवी लस परजीवीचे प्रवेशद्वारच बंद करते. या लसीत लॅक्टोकोकस लॅक्टिस नावाचा एक विशेष जीवाणू वापरण्यात आला आहे. हा जीवाणू सामान्यतः पनीर आणि ताक यांसारख्या खाद्यपदार्थांच्या निर्मितीत वापरला जातो आणि मानवी शरीरासाठी सुरक्षित आहे. त्यामुळे जैविक प्रणाली आधारित ही लस घातक दुष्परिणाम करणारी ठरणार नाही. आयसीएमआरच्या माहितीनुसार, सध्या मलेरियावरील जागतिक बाजारात दोन लसी उपलब्ध असून या दोन्ही लसींची परिणामकारकता 33 ते 67 टक्क्यांदरम्यान आहे. त्यांच्या तुलनेत भारतीय लसीचा प्रभाव दुहेरी स्वरूपाचा आहे. म्हणजेच, रक्तात परजीवी पोहोचण्यापूर्वीच त्याला रोखणे आणि समुदायस्तरावर संसर्गाचा प्रसार थांबवणे ही दोन वैशिष्ट्ये एडफाल्सीव्हॅक्स लसीला जागतिक स्तरावर अत्यंत प्रगत स्थान देतात.
या लसीचे आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे, तिची स्वदेशी निर्मिती. आतापर्यंत भारताला मलेरियावरील उपचारासाठी आयातीत लसींवर आणि औषधांवर अवलंबून राहावे लागत होते. हे केवळ खर्चिकच नव्हते, तर देशाच्या सार्वजनिक आरोग्य नीतीच्या द़ृष्टीनेही अस्थिरतेची जोखीम असणारे होते. या पार्श्वभूमीवर नवी लस हा मेक इन इंडियाचा आरोग्य क्षेत्रातील अत्यंत यशस्वी प्रयोग ठरू शकतो. लसनिर्मितीची पुढील प्रक्रिया खासगी कंपन्यांशी करार करून सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून ती लवकरात लवकर बाजारात उपलब्ध होईल.
भारतीय आयुर्विज्ञान परिषद गेली अनेक दशके डासजन्य रोगांविरोधात संशोधनात कार्यरत आहे. विशेषतः मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका अशा आजारांविरुद्ध सतत लस संशोधन आणि औषध पद्धती विकसित केल्या जात आहेत. भुवनेश्वर येथील आयएमआरसी संस्थेने या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी प्रादेशिक परिस्थितीनुरूप संशोधन आणि वैद्यकीय गरजांनुसार नवे प्रयोग करून हे यश साध्य केले आहे. मलेरियावरची ही लस आरोग्यव्यवस्थेच्या खर्चात मोठी घट घडवू शकते. ग्रामीण भागात मलेरियामुळे दरवर्षी हजारो लोक दगावतात आणि लाखो कुटुंबे आर्थिकद़ृष्ट्या परावलंबी होतात.
ही लस केवळ त्या मृत्यूंना रोखणार नाही, तर उपचाराचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात कमी करेल. शाळकरी मुले, गरोदर स्त्रिया आणि कृषी कामगार यासारख्या संवेदनशील गटांसाठी ही लस आयुष्यदायी ठरू शकते. सामाजिक न्यायाच्या द़ृष्टिकोनातूनही ही लस गरिबांपर्यंत पोहोचवणे आवश्यक ठरेल. जागतिक आरोग्य संघटनने मलेरियावर नियंत्रणासाठी लसीकरणाला सर्वोच्च उपाय म्हणून मान्यता दिली आहे. सध्या मंजूर असलेल्या दोन लसींपैकी मॅट्रिक्स एम2 लस ही 2022 मध्ये घाना आणि नायजेरियामध्ये वापरात आणली गेली आहे.