Global Maritime influence | सागरी सामर्थ्यात भारत आघाडीवर

india leads in maritime power
Global Maritime influence | सागरी सामर्थ्यात भारत आघाडीवरPudhari File Photo
Published on
Updated on

विनिता शाह

आता शक्तिसंतुलन केवळ हवाई आणि पायदळापुरतीच मर्यादित राहिलेले नाही. जागतिक राजकारण आणि आर्थिक हिताची पाळेमुळे महासागराच्या खोलीतही व्यापली आहेत. म्हणूनच जगभरातील देश नौदलाच्या आधुनिकीकरणावर भर देत आहेत. भारतही त्यापासून अपवाद राहिलेला नाही. एकीकडे चीनकडून सागरी हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले जात असताना पाकिस्तानच्या पाणबुडी कार्यक्रमामुळे प्रादेशिक पातळीवर असंतुलन निर्माण झाले आहे.

भूराजकीय विचार करून भारताने नौदलाच्या ताफ्याला भक्कमपणा आणण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. 2024-25 या काळात नौदलाचा विस्तार आणि व्याप्ती पाहिल्यास आत्मनिर्भर आणि दूरद़ृष्टीचे आकलन होते. स्वदेशी पातळीवर युद्धनौकांची निर्मिती, बांधणी, संरक्षण सहकार्य आणि सामरिक मोहिमांतील यश पाहता भारतीय नौदल भक्कम रूप धारण करत असल्याचे निदर्शनास येते. जानेवारी 2025 मध्ये भारतीय नौदलात तीन प्रमुख लढाऊ जहाजांचा समावेश झाला. यात आयएनएस नीलगिरी, आयएनएस सूरत आणि आयएनएस वाग्शीर. हे लढाऊ जहाज केवळ अत्याधुनिकच नाही, तर भारतीय जहाज बांधणीतील अत्युच्च नमुना आणि आत्मनिर्भरतेची साक्ष देणारे आहेत.

याशिवाय रशियाकडून मिळालेले आयएनएस ‘तुशील’मध्ये परकी अवलंबित्व कमी करताना 90 टक्के स्वदेशीवर भर दिला आहे. आता नौदलाकडे 130 पेक्षा अधिक सक्रिय लढाऊ जहाज आहेत आणि 2035 पर्यंत या जहाजांची संख्या 200 वर नेण्याची योजना आहे. त्यामुळे याकडे केवळ आकडेवारी म्हणून न पाहता कुशल रणनीतीचादेखील तो भाग ठरत आहे. भारताने आपल्या सागरी रणनीतीला केवळ देशांतर्गतच निर्मितीपुरती मर्यादित ठेवले नाही.

फ्रान्ससमवेत 26-राफेल एम लढाऊ विमानांचा आणि तीन नवीन स्कॉर्पिन पाणबुड्यांचा व्यवहार आयएनएस विक्रांतची क्षमता वाढविणार्‍या आहेत. त्याचवेळी जर्मनच्या थिसेनकू्रपच्या मदतीने सहा पाणबुड्यांच्या निर्मितीचा करार आपल्या पाणबुडी कार्यक्रमाला जागतिक पातळीवर अधोरेखित करणारा आहे. या सहकार्याचा प्रभाव केवळ शस्त्र प्रणालीपुरताच मर्यादित राहणार नाही. वरुणा, मालाबार, मिलान यासारख्या नौदल सरावातून भारतीय सागरी कूटनीतीला बळकटी दिली आहे. त्यामुळे हिंद प्रशांत भागात भारत एक निर्णायक भूमिकेत अस्तित्वात येत आहे.

भारताचे नौदल प्रबळ होत असताना पाकिस्तान देखील चीनच्या मदतीने सागरी शक्ती वाढविण्याचे काम करत आहे. पाकिस्तानला 8 हांगोर श्रेणीतील पाणबुडी अण्वस्त्रसज्जता करणारी आहे आणि परिणामी प्रादेशिक संतुलनाला आव्हान मिळू शकते. त्यामुळे पाकिस्तानची सेकंड स्ट्राईक कॅपेबिलीटीची क्षमता विकसित होऊ शकते आणि ही बाब भारताला डोकेदुखी ठरू शकते. प्रामुख्याने बाबर-3 क्षेपणास्त्र सज्ज असलेल्या पाणबुड्या अरबी समुद्रात भारताच्या सामर्थ्याला काही प्रमाणात आव्हान देऊ शकतात. त्यामुळे भारतासाठी एएसडब्ल्यू (अँटिसबमरीन वॉरफेअर) क्षमता अणि देखरेख प्रणालीतील गुंतवणूक आवश्यकच नाही, तर अनिवार्य झाली आहे.

दि. 18 जुलै 2025 रोजी नौदलात आयएनएस निस्तार ही भारताच्या सागरी शक्तीतील मैलाचा दगड ठरली. त्याचवेळी आधुनिक डायव्हिंग सपोर्ट व्हिसल ही 80 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार झालेली असून ती समुद्रात 650 मीटरपर्यंत बचावकार्य राबविण्यास सक्षम आहे. यात साईड स्कॅन सोनार, आरओव्ही आणि डीप सी डायव्हिंग सिस्टीम यासारख्या उच्च प्रतीच्या प्रणाली आहेत. सिंगापूर येथे पॅसेफिक रीच 2025 च्या युद्ध सरावात सहभागी झालेले निस्तार हे भारतीय नौदलाचे तंत्रज्ञान, कुटनीती आणि जागतिक सहकार्य असा त्रिवेणी संगमाचे प्रतीक दाखविणारे ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news