

नेपाळ आमचा धाकटा भाऊ. तो बरा असला की, आम्ही पण बरे असतो. त्याच्या भेटीला आम्ही सत्वर तयारच असतो. दरवेळेला आमचे प्रवासी त्यांच्या देशाला भेटी देतच असतात. यंदाही नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांची भारतात चांगलीच बडदास्त ठेवली. पंधरा हजार कोटींची मदत जाहीर केली. रेल्वे सुरू केली. राष्ट्रपतींसोबत भेटही घडवून आणली. हे एवढं सगळं करण्याचे कारण म्हणजे, हा धाकटा भाऊ आपल्या माघारी दुसऱ्या कुणाला गुपचूप भेटू नये म्हणून... तसे आम्हाला माहितीय. तो गुमान चीनला भेटून येतो आणि कधीकधी भारताची डोकेदुखी वाढवतो. म्हणून म्हणावेसे वाटते, ‘नेपाळा, नेपाळा, देवकीनंदन नेपाळा... सांभाळसी तुझे लेकरे, पुण्य समजती पापाला...’
आमची भाऊबंदकी थोर. भावाला म्हणायचे दादा, तुझेच बरोबर. आणि दादाच्या माघारी शेजाऱ्याला सांगायचे, आमच्या दादाचे काही खरे नाही. शेजाऱ्यांसोबत मैत्री वाढवून दादाची डोकेदुखी वाढवून ठेवली आहे. नाहीतर आमच्या देशाने त्यांना झोपाळ्यावर बसवायचे तेवढे ठेवले आहे. भाऊ-भाऊ म्हणून किती जपले... पण, या भावाने चांगलेच पांग फेडले...
दादाने कितीही हात पुढे केला, तरी धाकट्याचा दुसरा हात चीनच्या खांद्यावरच! दादाच्या ताटात जेवायचे आणि चीनच्या पंगतीत जाऊन कौतुक करायचे, हा कसला भाऊपणा? दादाचे उपकार आठवायचे भारतात आणि चीनचे गुणगान गायचे बीजिंगमध्ये, हीच याची भावकी! दादाने घर सांभाळायचे आणि धाकट्याने शेजाऱ्याला घराची खबर द्यायची, असा हा संसार! दादाच्या पैशावर घर चालवायचे आणि दादालाच शहाणपण शिकवायचे, हा धाकट्याचा उद्योग!
‘ऊ साबजी’ म्हणत भारताकडे मदतीचा हात मागायचा आणि ‘ऊ चीनजी’ म्हणत तिकडे दोस्तीचा पतंग उडवायचा! वा रे नेपाळा, तुझी ही भाऊबंदकीही भारीच; दादाच्या खिशाला हात आणि शेजाऱ्याच्या गळ्यात गळा! दादाने घराचा दरवाजा उघडा ठेवला, तरी धाकटा भाऊ खिडकीतून चीनशी गप्पा मारतो. दादाने चहा विचारला, की तिकडे नूडल्सची ऑर्डर देतो. दादाने कितीही लाड केले, तरी धाकट्याला शेजाऱ्याच्या घरचीच ओढ! दादाच्या खांद्यावर हात ठेवून आधार घ्यायचा आणि त्याच खांद्यामागून चीनला डोळा मारायचा. अशा भावाला काय म्हणावे? प्रेमाने जवळ घ्यावे की, नकाशा दाखवून सीमारेषा समजावून सांगावी?