

मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा स्वप्नांची पेरणी सुरू झाली आहे. घरे, मोफत वीज आणि आर्थिक मदतीची आश्वासने दिली जात आहेत; मात्र निधी, अंमलबजावणी आणि मागील वचनांचा हिशेब कुठेच दिसत नाही.
मुंबईकरांना प्रचंड सुविधा देण्याचा फार मोठा खटाटोप राजकीय पक्षांनी सुरू केला आहे. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना आता पुन्हा एकदा मुंबईच्या मुख्य भूमीत आणले जाणार आहे. कारण, तसे वचनच शिवसेना ठाकरे बँडने दिले आहे. मुंबईत एक लाख घरे बांधणार आहेत. ही घरे बांधण्याची जागा कुठे आहे? त्यासाठीचा निधी कुठून घेणार? याचा लेखाजोखा सध्या मागायचा नाही. अशी आश्वासने फक्त ठाकरे देत आहेत असं नाही, तर प्रत्येक राजकीय पक्ष असलेच काही तरी निवडणुका आल्यावर बोलत असतो.
जाहीरनामे, वचननामे, दिलेला शब्द ही सगळी ‘शब्द बापुडे केवळ वारा’ या वर्गवारीत मोडणारी शब्दबंबाळ प्रकरणे आहेत. राजकीय पक्षांना त्याबद्दल प्रचंड आत्मविश्वास आहे. गेल्या काही वर्षांत काय केले, याचा लेखाजोखा ना जनता मागते ना राजकीय पक्षांना तो द्यावासा वाटतो. काही राजकीय पक्ष आम्ही तो देतो आहोत, अशी घोषणा करतात आणि ज्या शपथा घेतल्या होत्या, त्यास सोयीचा इतिहास कळवत राहतात. हा सगळा मामला इतका नेहमीचा झाला आहे की, जनताही त्याकडे किती लक्ष देऊन बघते, हा प्रश्नच; परंतु लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या गोष्टी पुन्हा पुन्हा नव्याने केल्या जातात आणि त्याचे कौतुकही पुन्हा पुन्हा करायचे असते. ‘हे हे’ दिले असे सांगत त्यातले प्रत्यक्षात काय दिले, याचा पाच वर्षांनी हिशेब मांडू, असाही पवित्रा घ्यायचा असतो.
‘जमा-खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा? जाब उंच प्रसादांचा मागणार केव्हा’ ही मंगेश पाडगावकर यांची अत्यंत गाजलेली कविता. जनता मनातल्या मनात हे आळवत असते आणि पुन्हा मतदान करायला जात असते. यावर्षी सात वर्षांच्या अवकाशानंतर निवडणुका होत आहेत. त्यामुळे वचने देण्याची अहमहमिका लागली आहे. एका पिढीने या वचनांचा फोलपणा बघितला. नवी पिढी ती आधीच जाणते. त्यामुळे गांभीर्याने बघत नाही; पण राजकारणी मात्र न चुकता निवडणूक आली की, अशी वचने देत असतात. ही एक लाख घरे मिळण्याची योजना शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाप्रमाणेच आहे काय, ते कळेल.
भाजपनेही मुंबईकरांचा घराचा प्रश्न सोडवण्याची हमी दिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बीबीडी चाळी ते अभ्युदयनगरचे रूपांतरण झाले हे मान्य; परंतु अशी एक लाख घरे कुठून येणार? किती गिरणी कामगारांना घरे मिळाली? केवळ घरेच नाही, तर प्रत्येक घरात 100 मेगावॅट वीज ठाकरे बंधू मोफत देणार आहेत. प्रत्यक्षात पहिल्या किती युनिटला वीज माफ असते, ते विजेचे बिल वाचले तर लक्षात येते. मुंबईत खरे तर काहीच मोफत मिळत नाही आणि येथे परिश्रम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या, मराठी-अमराठी कुणालाही फुकटमध्ये काहीच नको असते. मेहनत करून जगणाऱ्यांचे, स्वतःचे पोट भरणाऱ्यांचे आणि श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचं हे शहर आहे. येथे अशा घोषणांऐवजी उत्तम पायाभूत सुविधा कशा निर्माण करता येतील, यावर बोलणे उचित ठरते.
मुंबईला खड्ड्यांचे रस्ते, त्या रस्त्यांच्या मागे असलेले कंत्राटदारांचे साटेलोटे, त्या कंत्राटदारांच्या लाभातून राजकारणी उभी करत असलेली घरे, झपाट्याने श्रीमंत होणारे नगरसेवक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे सारे आता फारच ओळखीचे झाले आहे. मला जर लाभ होत असेल, तर कुठे, याची चिकित्सा करा, असे मानणारा वर्गही मोठा आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दर महिना मिळतात. त्यात तेवढीच भर घालून घर कामगार महिलांना देण्याचे आश्वासन ठाकरे बंधूंनी दिले आहे. यात कोकणातील तसेच परप्रांतीय महिलाही आहेत. आता हे पंधराशे रुपये कुठून येतील, याबद्दल बोलायचे काही काम नाही. ठाकरे बंधू एकत्र आले, त्या पाठोपाठ त्यांचे छावेही एकत्र आले. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी वचननाम्याची तपशीलवार माहिती मुंबईकर जनतेला दिली. हे दोघे अत्यंत उत्तमरीत्या भविष्याचे सादरीकरण करत होते. ते बघताना निधी कुठून येईल, त्याचे स्रोत काय, राज्य सरकार नक्की काय मदत करेल, केंद्र आणि महानगरपालिका यांच्या उत्पन्न भागीदारीचा फॉर्म्युला काय, अशा प्रश्नांना कोणीही समोर आणू नये. निवडणुका आल्या की, अशी आश्वासने द्यायची असतातच. काँग््रेास पक्षही त्यात मागे नाही.
मुंबईकरांना वाहतुकीसाठी आवश्यक असलेली बेस्ट उत्तम करण्याचं आश्वासन काँग््रेासने दिले. महामेट्रोचे जाळे अजून विस्तारण्याचा शब्द भाजपनेही दिला. आज 40 टक्के मुंबईकर झोपडपट्टीत राहतात. चाळींची अवस्था जीर्ण झालेली आहे. पागडी इमारतींना दिलेल्या सवलती कितपत पुरेशा आहेत, ते अद्याप समोर आलेले नाही. या भाऊगर्दीत काहीतरी बोलायचे आणि ते जनतेने स्वीकारायचे, हा पायंडा पडला आहे. भावनात्मक राजकारणात भावाभावांनी एकत्र येण्यात परस्परांच्या घरी जाण्यात, भेटी घेण्यात मुंबईकरांचे काय हित आहे, असा प्रश्न शिंदे यांच्या जवळच्या लोकांनी सुरू केला आहे. ते असेही म्हणतात की, ‘हिंदुहृदयसमाट’, ‘हिंदू’ हे शब्द ठाकरे बंधूंच्या वचननाम्यातून बाजूला झाले. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी केलेला द्रोह आहे.
मुंबईत बहुभाषकांची गर्दी प्रचंड मोठी झाली आहे. यांचा मतदानातला टक्का मोठा असल्यामुळे कदाचित एकत्रित मतदान झाले, तर ते मराठी मतदारांना छोटे करणारे ठरेल. मराठीचा टक्काच कमी झाला आहे. नव्याने घरे नेमकी कोणाला दिली जातील, याबद्दलही मुंबईकरांना जाणून घ्यायला आवडेल. मुंबईकरांना अशा आश्वासनांची, खैरात सवयीची ओळख आहे. एकेकाळी झुणका भाकर केंद्र योजना सुरू झाली होती. त्यानंतर एका निवडणुकीत मोफत विजेची घोषणा झाली होती. प्रत्यक्षात त्यातले काहीही उतरले नाही, हे सत्य आहे. मध्यंतरी मोफत वायफायच्या आधारावर प्रगती करता येईल, असे स्वप्न दाखवले जायचे. प्रत्यक्षात तसे काहीही झालेले नाही. स्वच्छ मुंबईची संकल्पना कागदावर आहे.
भाजपचे व्हिजन काही दिवसांनी समोर येईल. त्यांनी जनतेकडूनच जाहीरनामा मागवला आहे; मात्र राजकीय पक्ष आपली विचारपूस करतात, नवी स्वप्ने दाखवून ती प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करतात, यावरच आता जनतेचा विश्वास राहिला नसेल, तर ‘मुकी बिचारी कुणीही हाका’च्या नादाने जनता नेते जे बोलतात ते ऐकत असते. वचननामे हे वाचूननामे आहेत का केवळ भेंडोळी, हे नंतर कळेल. फक्त निवडणुकीच्या आधी स्वप्नांचे इमले रचने हेच जाहीरनाम्याचे इंगीत राहिले आहे. ते पार पाडले गेले, एवढे निश्चित!