

भारत आणि बांगला देश यांच्यातील संबंध अधिकच चिघळण्याची चिन्हे असून, याला बांगला देशच संपूर्णतः जबाबदार आहे. तिथे अल्पसंख्याक हिंदू समाजावरील हल्ल्यांची मालिका सुरूच असून, सोमवारी सायंकाळी राजधानी ढाका येथे एका वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक असणाऱ्या हिंदू उद्योजकाची हत्या झाली. त्याआधी झेनैदाह जिल्ह्यात हिंदू विधवेवर घरात घुसून दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली.
तिला घराबाहेर झाडाला बांधून तिचे केस कापून या कृत्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकण्यात आला. गेल्या महिन्यात धर्मनिंदेचा खोटा आरोप ठेवून, जमावाने एका हिंदू तरुणाला भालुका उपजिल्ह्यात ठार मारले. या सगळ्याचे पडसाद उभय देशांतील क्रिकेटसंबंधातही पडू लागले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्देंशानंतर कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगसाठी निवडलेल्या बांगला देशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला संघातून वगळले. तेथील सध्याची राजकीय अस्थिरता आणि हिंदू नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुस्तफिझुरला भारतात खेळण्याची परवानगी देऊ नये, यासंदर्भात बीसीसीआयवर वाढता दबाव होता.
याच दबावातून बीसीसीआयने केकेआरला मुस्तफिझुरला संघातून वगळण्याचे आदेश दिले. त्यानुसार संघ व्यवस्थापनाने मुस्तफिझुरला करारमुक्त केले; मात्र त्यापूर्वी रहमानला 9 कोटी 20 लाख रुपये खर्च करून अभिनेता शाहरूख खानच्या केकेआरने खरेदी केलेच कसे, असा सवाल विचारत काही धर्मांध हिंदू नेत्यांनी शाहरूखला लक्ष्य केले. शाहरूखच्या देशनिष्ठेविषयी प्रश्न विचारण्यात आले. वास्तविक, स्वार्थी आणि द्वेषमूलक राजकारणासाठी शाहरूखवर टीका करण्याचे काहीच कारण नव्हते. यापूर्वी त्याचा मुलगा आर्यनलाही सूडबुद्धीने ड्रग्ज प्रकरणात तुरुंगवारी घडली होती.
खरे तर, मुस्तफिझुर हा 2016 पासून आयपीएल खेळत आहे. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स या संघांचे त्याने प्रतिनिधित्व केले आहे. म्हणजे, त्याला संघात घेणे हा काही गुन्हा नव्हे. त्याने कोणतेही अपराधी कृत्य केलेले नाही. यंदा ‘केकेआर’ने रहमानला त्याच्या दोन कोटी या मूळ किमतीच्या चौपटीपेक्षाही अधिक मोबदला मोजून खरेदी केले होते. यात केकेआरची चूक नाही. बीसीसीआयने पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलचे दरवाजे बंद केले आहेत; परंतु मुस्तफिझुरला बीसीसीआयने लिलावासाठी नोंदणी करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे याबाबत शाहरूख अथवा त्याच्या केकेआर संघाला कसा दोष देता येईल? गेल्या काही दिवसांत भारत-बांगला देश संबंध बिघडल्यामुळेच भारत सरकारकडून दडपण आल्यानंतर मुस्तफिझुरची मान्यता रद्द करण्यात आली.
दोन्ही देशांतील संबंध कसे राहतात, यावर बांगला देशच्या खेळाडूंचे आयपीएलमधील भवितव्य अवलंबून असेल. वास्तविक, भारताने व बीसीसीआयने ही कारवाई का केली, याचा बांगला देश सरकारने विचार करायला हवा होता; परंतु त्याऐवजी अविचारी भूमिका घेत त्यांनी बांगला देशात आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावरच बंदी आणली. सध्याची स्थिती लक्षात घेता मुस्तफिझुरला लीगमधून दूर करण्यात आले, असा खुलासा बीसीसीआयचे सचिव देवजित सैकित यांनी केला. बांगला देशात हिंदू अल्पसंख्याकांबाबत समोर आलेल्या घटनांतून निर्माण झालेल्या असंतोषामुळे आलेल्या दबावातून हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट आहे; परंतु पटण्यासारखे कारण न देताच मुस्तफिझुरला संघमुक्त करायला लावणे हे अतिशय चुकीचे असल्याचे म्हणत मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याने बांगला देशात आयपीएल सामने दाखवण्यास मनाई केली. या निर्णयामुळे म्हणे बांगला देशच्या लोकांना वेदना झाल्या असून, त्यांचा संतापही झाल्याचा दावा केला आहे.
एखादी गोष्ट माहीत असूनही त्याची गंधवार्ता नसल्याचा कांगावा करण्याची खोड बांगला देशला लागलेली दिसते. शेख हसीनाविरोधी उठावाच्या वेळी आणि नंतर हिंदूंचा छळ सुरू झाल्याच्या घटना घडल्या, तेव्हादेखील युनूस यांनी क्वचित एखाददुसरी घटना घडल्याचे म्हटले होते! हिंदू मंदिरांवरही फारसे हल्ले होत नसल्याचा खोटा दावा ते करत होते. तेथील अल्पसंख्य हिंदू भयाच्या सावटाखाली वावरत आहेत. अशावेळी भारतातील करोडो सामान्यजनांना होणारे दुःख व त्यांचा संताप यांची दखल घ्यावी, असे बांगला देशला वाटत नाही का? मुस्तफिझुरला वगळणे, ही या घटनांची प्रतिक्रिया आहे, हे समजून न घेण्याचा नादानपणा त्यांनी करू नये. आपल्या देशातील हिंदूंवरील अत्याचार गंभीर, की मुस्तफिझुरला वगळणे ही बाब गंभीर, याचा सारासार विचार या देशाने केला पाहिजे.
माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचा नुकताच मृत्यू झाला. त्याआधी काही दिवस त्यांचे पुत्र तारीक रहमान मायदेशी परतले. आमचे धोरण राष्ट्रहित समोर ठेवूनच असेल. ते भारत वा पाकिस्तानधार्जिणे नसेल, असे तारीक म्हणाले होते. बांगला देशात फेबुवारीत सार्वत्रिक निवडणुका असून, अवामी लीगला निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तारीक यांचा बीएनपी व जमाते इस्लामी हेच पक्ष रिंगणात असून, बीएनपीचीच सत्ता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तारीक रहमान हेच या देशाचे उद्याचे नेते असतील, अशी चिन्हे आहेत. आता तेथील क्रीडा मंत्रालयाने क्रिकेट मंडळाला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघाला भारतात न पाठवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
विश्वचषकातील आमच्या संघाचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, अशी विनंती बांगला देशी क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केली. त्यासाठी सुरक्षेचे कारण पुढे केले. राजकीय व सामाजिक परिस्थितीचे पडसाद प्रत्येक क्षेत्रावर पडतात, तसेच ते क्रीडा क्षेत्रातही उमटतात. खेळात राजकारण नको, असे मानणे हा बाळबोधपणा झाला. पाकिस्तान व बांगला देशात धर्मांधता वाढीस लागली असून, पाकनेही क्रिकेटच्या माध्यमातून भारतद्वेष जपला. आता बांगला देशचीही त्याच मार्गाने वाटचाल सुरू आहे. हा कट्टरतावाद या देशाला विनाशाच्या मार्गाने घेऊन जाणार, हे स्पष्ट आहे.