भारत-अफगाण चर्चा नव्या अध्यायाची नांदी

दुबईत झालेली भारत-अफगाण बोलणी दुहेरी हिताच्या द़ृष्टीने महत्त्वाची
India-Afghan Discussion
भारत-अफगाण चर्चा नव्या अध्यायाची नांदीPudhari File Photo
Published on
Updated on
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

भारताला मानवतावादी मूल्यांवर भर द्यावयाचा आहे आणि राजकीय लाभापेक्षाही दीर्घकालीन मानवी संबंध सुधारण्याचा भारताने नेहमीच आग्रह धरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दुबईत झालेली भारत-अफगाण बोलणी दुहेरी हिताच्या द़ृष्टीने महत्त्वाची आहे.

अफगाणिस्तानातील पारंपरिक आणि ऐतिहासिक मैत्रीला नव्या संदर्भात नवा उजाळा मिळत आहे. प्राचीन काळात गांधार देश म्हणून ओळखला जाणारा अफगाणिस्तान आता भारताच्या द़ृष्टीने बफर स्टेट म्हणून महत्त्वाचा आहे. विशेषतः भारताशी शत्रुत्व घेणार्‍या पाकिस्तानपासून बचाव करण्यासाठी अफगाणिस्तान नेहमीच तटस्थ राहून आपल्या बाजूने भूमिका घेत आला आहे. अलीकडे तालिबान सरकार आणि पाकिस्तानातील तणाव वाढले आहेत. तालिबान सरकार पाकिस्तानच्या कृष्णकृत्यावर प्रकाश टाकून त्याच्यावर हल्लेही करीत आहे. शिवाय तालिबान सरकारने भारतविरोधात दहशतवादी गटांना आपल्या भूमीचा वापर करू देणार नाही याची हमी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागातील दहशतवादी उपद्व्याप थोडेसे कमी झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दुबईमध्ये झालेल्या भारत-अफगाणिस्तान मैत्री संवादाचे विशेष महत्त्व आहे.

भारत आणि अफगाणिस्तान या दोहोंनाही समान पातळीवर मित्र मानणार्‍या देशांमध्ये दुबईचे अग्रस्थान आहे. त्यामुळे उभयतांच्या चर्चेसाठी दुबई या योग्य स्थानाची निवड करण्यात आली. यापूर्वी निम्न सचिव स्तरावर बोलणी होत असत. पण प्रथमच यावेळी उच्च सचिव दर्जावर ही बोलणी झाली आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्यात ही बोलणी झाली. या बोलणीला विशेष महत्त्व आहे. एस. जयशंकर यांनी म्हटल्याप्रमाणे, ही बोलणी कमी राजकीय आणि अधिक मानवतावादी आहेत. अफगाणिस्तान सध्या संकटात सापडलेला आहे. नुकताच भूकंपाच्या तडाख्यातून वाचल्यानंतर त्याला भारताने भरघोस मदत केली. शिवाय 50 मेट्रिक टन गहू, पोलिओ लस, औषधे यांचा हप्ताही भारताने अफगाणिस्तानला दिला. ही मदत मानवी पातळीवर आहे. माणूस म्हणून अफगाणिस्तानातील दुःखी, कष्टी प्रजेला सहाय्य करणे आपले कर्तव्य आहे. कारण एके काळचे अफगाण हे भारतीय रक्ताचे, वंशाचे समूह आहेत. त्यामुळे ज्या ज्यावेळी अफगाणिस्तान संकटात सापडतो, त्यावेळी भारत धावून जात असतो. यावेळी सुद्धा भारताने अफगाणिस्तानला मदतीचा हात दिला आहे ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घेतली पाहिजे. अफगाणिस्तानात महागाई आणि टंचाई तसेच दुष्काळाने कहर केला होता. त्यावेळी भारताने अफगाणिस्तानला सातत्याने अन्नधान्याचा पुरवठा केला आणि गव्हाचा पुरवठा केला. त्यामुळे अफगाणिस्तानमधील गोरगरीब लोकांना दोनवेळा सुखाचे जेवण प्राप्त होऊ शकले. त्यामुळे प्रत्येक अफगाण माणूस भारत आणि भारतीय संस्कृतीचा ऋणी आहे. शिवाय आता अफगाणिस्तानातील लोकांना भारतामध्ये आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. तेथील रुग्णांना भारतात आरोग्य सेवा आणि मुला-मुलींना भारतामध्ये येऊन शिक्षण घेण्याची संधीही मिळणार आहे. हीसुद्धा आणखी एक जमेची बाजू आहे.

अफगाणिस्तानचे असे म्हणणे आहे की, रावळपिंडीपासून काबूलपर्यंतचा एक पट्टा हा अफगाण लोकांच्या दाट वस्तीचा पट्टा आहे. या भागावर फार पूर्वीपासून अफगाण लोकांचे वर्चस्व आहे. विशेषतः काबूलपासून खैबरखिंडीपर्यंतच्या भागावर त्या चिंचोळी पट्टीवर आपले प्रभुत्व आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न अफगाणिस्तान अनेकवेळा करीत असतो. पण पाकिस्तान त्याचा हा दावा नाकारतो. त्यामुळे उभय देशांत संघर्ष होतो. तेथील अफगाण क्रांतिकारकांना हुसकावून लावणे, त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांच्यावर लष्करी कारवाया करणे अशा प्रकारच्या अनेक घटना पाकिस्तानकडून होतात. पाकची अफगाणविरुद्धची आक्रमकता जशी वाढत आहे, तशी भूराजनैतिक दृष्टीने भारताशी जवळीक होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एकीकडे पाकच्या डोक्यावर बलुचिस्तानची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे अफगाण बंडखोरही पाकिस्तानविरोधात कारवाया करीत आहेत. त्यामुळे पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील संघर्ष वाढला आहे. जणू उभयतांमध्ये विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. या पार्श्वभूमीवर आता अफगाणिस्तानला पाकिस्तानशी अधिक संघर्ष करण्यासाठी भारतासारख्या सच्च्या मित्राचे सहाय्य हवे आहे. पण भारताने युद्धापेक्षाही शांतता व विकासावर अधिक भर दिला आहे. भारताच्या मते, सारे प्रश्न सामोपचाराने सोडविले पाहिजेत आणि विकासाच्या योजनांवर प्रथम भर दिला पाहिजे. अफगाणिस्तानच्या सामुदायिक विकासासाठी भारताचा प्रयत्न आहे. अफगाण देशातील लोकांच्या विकासाचे अनेक प्रकल्प भारताच्या मदतीने पुढे गतिमान होत आहेत. एक काळ असा होता, हमीद करझाई यांच्या काळात भारताने लोया जिरगा सभागृह बाधूंन दिले होते. आता तालिबान काळातसुद्धा अनेक अफगाण तरुण भारतात शिकण्यासाठी उत्सुक आहेत. सुरुवातीच्या काळात अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला भारताने कोणतेही सहकार्य केले नाही. किंबहुना आजपर्यंत त्याला राजकीय मान्यताही दिलेली नाही. परंतु मुत्सद्दी पातळीवरील बोलणी मात्र सुरू आहेत आणि आता काही प्रतिनिधी काबूलमध्ये जाऊन तेथील भारतीय दूतावासाचे कामकाज सुरू करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान आणि भारत या उभय देशातील संबंध आता नव्याने खुलत आहेत, फुलत आहेत आणि ते समान शत्रू या समीकरणावर आधारून अधिक नवी गती घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news