

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाठीभेटींना फार महत्त्व आहे. नातेवाईक, मित्र-सोयर्याकडील मंडळी यांना आपण नेहमी भेटत असतो. आपल्याकडे दसरा-दिवाळीला भेटताना किंवा मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी भेटताना गळाभेटी पण घेत असतात. जवळच्या मित्रांना एकमेकांना भेटल्याशिवाय करमत नाही. ज्यांची गाठ भेट झाली नाही त्यांच्याविषयी कधी एकदा भेटतो, अशी ओढ असणे हे भारतीय संस्कृतीचे प्रमुख लक्षण आहे.
राजकारणामध्ये मात्र वेगळे असते. गाठीभेटी झाल्या की त्याची बातमी होत असते. मंत्रालयात एखादा सत्ताधारी पक्षाचा एखादा मंत्री असेल आणि विरोधी पक्षातील कोणी आमदार जाता जाता सहज डोकावून आतमध्ये पाच मिनिटे बोलून गेला तरी त्याची बातमी होत असते. सध्या दोन ठाकरे बंधू एकत्र येतील काय, अशी चर्चा असताना भेटी गाठींचा सिलसिला सुरू आहे. टाळीसाठी हात आधी पुढे कोण करणार याची चर्चा आहे. कुणीही टाळीसाठी हात पुढे केला तर त्याचा भाऊ त्याला टाळी देणार का, हा एक मोठाच प्रश्न आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राजकारणात काय होईल याची कल्पना नाही; परंतु मीडियाला चघळायला एखादा विषय लागतो.
हा एक तगडा आणि दीर्घकाळ चालणारा विषय त्यांच्यासमोर आहे. दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच अचानक मुख्यमंत्री महोदय आणि रेल्वे इंजिनवाले बंधू यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याच्या बातम्या आल्या. आता बैठक झाली ही पहिली बातमी झाली आणि ही बैठक दोन तास झाली, ही दुसरी बातमी झाली आहे. आपण सहज म्हणून कोणाकडे गेलो तरी अर्धा पाऊण तास बोलतोच. इथे दोन मोठे राजकीय नेते चक्क दोन तास एकमेकांना भेटत आहेत म्हणजे निश्चितच काहीतरी महत्त्वाचा विषय असणार यात शंका नाही.
येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विशेषत्वाने त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एखाद्या राज्याचे बजेट असावे त्यापेक्षा मोठे बजेट मुंबई मनपाचे असते. या मनपावर ताबा मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आसुसलेले आहेत. निवडणुका ठरल्याप्रमाणे होतील, परंतु त्यासाठीची फिल्डिंग लावण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे.
येणार्या काळात आपल्याही गावातील नगरपरिषद किंवा महानगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक म्हटले की मराठी माणसाच्या अंगात चैतन्य संचारते. कोण येणार? कोण पडणार? कोणत्या वार्डात कोणाची ताकद आहे? याच्या चर्चा घराघरात रंगायला लागतात. लोकशाहीमध्ये वर्षभर निवडणूक असल्यामुळे ब्रेकिंग न्यूजची इथून पुढे काही कमी नाही.