

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणार्या व्यक्तींच्या यशाचे रहस्य त्यांच्या क्रियाशील कल्पनाशक्तीत दडले आहे. यामुळेच सापेक्षवाद सिद्धांताचा जनक अल्बर्ट आईनस्टाईन नेहमी म्हणायचा, "Imagination is more powerful than Knowledge' तुम्ही कल्पना करा. त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा. कल्पना प्रत्यक्ष वस्तुस्थितीत परावर्तीत होईल.
जन्मास येणार्या प्रत्येक व्यक्तीजवळ कल्पनाशक्ती असतेच. त्याच्याजवळ असलेल्या कल्पनाशक्तीचा तो कसा वापर करतो, हे महत्त्वाचे आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जगातील सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखल्या जाणार्या व्यक्तींच्या यशाचे रहस्य त्यांच्या क्रियाशील कल्पनाशक्तीत दडले आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ‘ताजमहाल’ हा मोगल सम्राट शहाजहान यांच्या कलारसिक आणि क्रियाशील कल्पकतेतून साकारला गेला. एकदा आयझॅक न्यूटनला विचारले गेले की, तू गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लावलास? यावर न्यूटन उत्तरला, मी नेहमी या सिद्धांताविषयी विचार करायचो. क्षणोक्षणी माझ्या मनात गुरुत्वाकर्षणाचे विचार भिनलेले होते. वरून पडणारी वस्तू वर न जाता खालीच का पडते, हा प्रश्न मला भंडावून सोडत असे. अहोरात्र विचार केल्यानंतर मला गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा शोध लागला.
कल्पनाविलास आणि शास्त्रीय द़ृष्टिकोन एखाद्या व्यक्तीला क्रियाशील बनवून तिच्यामार्फत विश्व नियमांचे गुपीत उघडे करतो. झाडावरून फळे खाली पडताना न्यूटनच्या आधी कित्येक लोकांनी ती पाहिली असतील. फळे खाली पडताना पाहणारा न्यूटन हा काही एकटा नव्हता. जेम्स वॅटप्रमाणे कोट्यवधी लोकांनी दैनंदिन जीवनात किटलीचे झाकण उडताना पाहिले होते; पण किती जणांनी वाफेचे इंजिन बनवले? थोडक्यात, सक्रिय मन क्रियाशील कल्पनाशक्तीचा वापर करू शकते. जॉर्ज बर्नाड शॉ म्हणत असे, ‘जर तुम्हाला हवेत मजले बांधण्याची सवय असेल, तर हरकत नाही; पण त्याच्याखाली पाया बांधण्यास विसरू नका.’ कल्पनाशक्ती आणि प्रोत्साहन ही विचाररथाची दोन चाके आहेत. त्यामुळे जगापेक्षा काही वेगळं करायचं असेल, तर त्यांच्यात समन्वय साधलाच पाहिजे.
एखादे ध्येय साध्य करताना अनुभवी विचारवंतांनी काही घटकांचा आधार घेण्यास सांगितले आहे. सर्वप्रथम तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही नेमके काय करणार आहात, हे निश्चित करा! त्यानंतर तुमच्या उपजत बुद्धीच्या साहाय्याने आणि पूर्वीचा अनुभव व स्मरणशक्तीच्या आधारे तुम्ही मिळविलेल्या माहितीचे विश्लेषण करा. त्यानंतर तुम्हाला करावयाच्या गोष्टींबद्दल आपोआप मार्ग गवसण्याची प्रक्रिया सुरू होईल. पुढे वारंवार सर्व क्रमवार घटनांमध्ये सुधारणा आणि उजळणी करून इप्सित ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. ध्येयपूर्तीसाठी प्रबळ इच्छाशक्ती असली, तरी त्यास सुद़ृढ आरोग्याची जोड हवी असते. तुमच्या मनाची मशागत चांगली झाल्यास तुमचे शरीरही सुद़ृढ होईल. सदैव विविध आजारांनी जर्जर हेन्ले या कवीचे उद्गार उद्बोधक आहेत. तो म्हणतो, "My head is bloody, but unbowed' प्रख्यात आंग्ल साहित्यिक विल्यम शेक्सपियर तर म्हणायचा, "Asume virtue, if you have not' यावरून एखादा ध्येयवेडा त्याच्या कल्पनाशक्तीत रमला, तर त्याचे स्वप्न वास्तवात परावर्तीत होऊ शकते; मात्र एखाद्याने हिणवले म्हणून प्रयत्न सोडून दिले किंवा एखाद्याने स्तुती केली की, हरखून जायचे, ही वृत्ती त्यागावी लागेल.