बेकायदा उत्खननाने सूक्ष्म जीवांचा अधिवास धोक्यात

नदीचे पर्यावरण ढासळत चालले आहे
illegal-sand-mining-threatens-microorganism-habitats
बेकायदा उत्खननाने सूक्ष्म जीवांचा अधिवास धोक्यातPudhari File Photo
Published on
Updated on
विलास कदम

अलीकडच्या काळात सर्वच राज्ये नद्यांमधील वाळू उपशामुळे त्रस्त झाली आहेत. यामुळे पाण्यातील सूक्ष्म जीवांचा अधिवास धोक्यात सापडला आहे. नदीचे पर्यावरण ढासळत चालले आहे. सतत वाळू उपसा केला जात असल्याने नदीचे पाणी दूषित होते आणि त्यामुळे सूर्यप्रकाशाची किरणे थेट तळापर्यंत जाताना अडथळे येतात. प्रकाश संश्लेषणही होत नाही. डायएटम, मॅक्रोइनिवर्टीब्रेट, बेथिक एल्गी आणि माशांची अंडी नष्ट होतात. उथळ आणि अडथळ्यांतून मार्ग काढणार्‍या पाण्याच्या प्रवाहामुळे माशांच्या विहारात आणि स्थानांतरात बदल होतो. साहजिकच अन्नसाखळी विस्कळीत होते.

नदी म्हणजे नुसते पाणी नसून जीवनवाहिनी आहे. अनादिकाळापासून ते आधुनिक युगापर्यंत नद्यांना इतिहास लाभलेला आहे. पौराणिक कथा असो, मध्ययुगीन भारताचा इतिहास असो, ब्रिटिशकालीन इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर काळ असो, नद्यांचा उल्लेख वेळोवेळी आणि ठळकपणे झाला आहे. जगातील अन्य देशांसाठी नदी हा पाण्याचा स्रोत असेलही; परंतु भारतीयांना ती एका मातेसमान आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, कावेरी, गोदावरी, कोसी, सिंधू यांसारख्या नद्यांनी तहान भागविण्याबरोबरच उपजीविकेचे साधनही उपलब्ध करून दिले; मात्र अलीकडच्या काळात नद्यांना उत्खननाचे ग्रहण लागले आहे. बांधकामासाठी नद्यांचे प्रवाह अडविले किंवा वळविले जात आहेत. परिणामी ऋतुचक्र बिघडत आहे. सरकारने मानवी हस्तक्षेपाला पायबंद घालण्यासाठी वेळीच पावले उचलली नाहीत, तर नद्यांचे अस्तित्व संकटात सापडेल.

डोंगरदर्‍यांतून खळखळत वाहत जाणारी नदी सजीवपणाचे प्रतीक आहे. प्रत्येक नदीला उगमाची कथा असून ती प्रादेशिक वातावरण आणि पर्यावरणावर प्रभाव पाडते. नदी मार्ग हा रक्तवाहिन्यांप्रमाणे असतो. कालपरत्वे यात बदल होत असतो. नद्यांच्या प्रवाहात नैसर्गिक बदल होत असले तरी तो कुठेही रोखला जात नाही आणि अखंडपणे वाहत असतो. नदीचा वेग ही एक प्रकारे निसर्गाची लयबद्ध धून आहे आणि यात मनुष्य आणि प्राणिमात्र हरवून जातात. भूस्थितीमुळे वेगात बदल होत असला, तरी तो परिस्थितीनुरूप असतो. नद्यांचा प्रवाह हा स्थानिक पातळीवर मातीची गुणवत्ता, हवामान, वातावरण, जमिनीचा कस, सुपिकता, झाडांचे आयुष्य निश्चित करत असतो. शिवाय हा प्रवाह हवामान बदल, भूगर्भशास्त्रात मोलाची भूमिका बजावतो. या माध्यमातून नदी मार्ग आणि नदी पात्र तयार होते.

प्रवाहासमवेत येणारा गाळ काठावर वाळू, विविध प्रकारचे दगड, खनिजे, माती आणत असतो. नद्यांचा कमी-जास्त प्रवाह हा स्थानिक भूभागातील स्थितीचे दर्शन घडवणारा असतो. उंच डोंगरातून वाहत येणारी नदी ही समतल पातळीवर आल्यानंतर संथ होते आणि आपोआपच स्थिरता येते. ठिकठिकाणी वळणातून येणार्‍या नद्या ‘ऑक्सबो लेक’ तयार करतात, तर त्यांचा गाळ हा नदीकाठाला बळकटी देतात आणि त्याचवेळी सखल मैदानही तयार करतात. ऑक्सबो सरोवर म्हणजे यू आकाराचा तलाव आणि तो नदीने विस्तृत वळण कापल्यानंतर तयार होतो. या परिस्थितीमुळे नदी शांत होते आणि पर्यावरणपूरक वातावरण राहण्यास हातभार लागतो; मात्र मानवी हस्तक्षेप झाल्यास किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने एकाच ठिकाणी साचून राहिल्यास नदी मार्ग बदलते आणि साहजिकच पॅटर्नदेखील बदलतो.

नैसर्गिक रूपाने विकसित नदी काठ हा प्रचंड प्रवाहाला थोपविण्याचे काम करतात अणि नदीकाठची परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची ते दक्षता घेतात. साहजिकच नदी एकाच दिशेने वाहत जाते. पुरात नदीचे पात्र वाढते आणि त्याचा गाळ हा सर्वत्र पसरतो. कालांतराने नदीचा प्रवाह कमी होतो तेव्हा नदीकाठ आणि त्याही पलीकडचा भाग अधिक सुपीक होतो. जसे गंगा नदीच्या खोर्‍याप्रमाणे शेतीयोग्य जमीन तयार होणे. अतिरिक्त पाणी साचविण्यासाठी तयार केलेल्या तलाव, धरणापर्यंत जाणार्‍या नद्या ‘डेल्टा’ होतात आणि त्या जैवविविधतायुक्त पर्यावरण तयार करतात. याचे उदाहरण म्हणजे, गंगा-ब्रह्मपुत्रा नदी या डेल्टा आहेत. या नद्या वाहताना अनेक स्रोत तसेच निसर्गचक्र सुरू ठेवण्यासाठी साह्यभूत ठेवणार्‍या घटकांत योगदान देतात.

ऋतुचक्र सुरू ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक वातावरण असणे गरजेचे आहे. नदीपासून निर्माण होणारा सर्वात मोठा घटक म्हणजे काठावरची वाळू आणि गाळ. ती एक प्रकारे मोफतच मिळते. प्रामुख्याने बांधकाम क्षेत्रात या घटकाला प्रचंड मागणी आहे. अर्थात, वाळू उत्खनननाच्या कामाचे नियमन सरकारच्या अधीन आहे; पण अलीकडच्या काळात बांधकामात होणारी वाढ पाहता देशातील जवळपास सर्वच राज्ये वाळू उत्खननाने त्रस्त झाली आहेत. वनक्षेत्र नसलेल्या भागात नद्यांची व्याप्ती अधिक असल्याने बेकायदा वाळू उत्खनन होत असल्याच्या बातम्या सारख्या पाहावयास मिळतात आणि त्याचवेळी वाळू तस्करांवर महसूल विभागाकडून कारवाईदेखील केली जाते; मात्र सध्याच्या काळातील घडामोडी पाहिल्या तर वाळूमाफिया आता वनक्षेत्रातही घुसखोरी करू लागले आहेत आणि वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर हल्लेदेखील होत आहेत. वास्तविक वाळू ही वाळवंटात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; परंतु त्याचे कण हे गरजेपेक्षा अधिक गोल असल्याने तसेच र्‍हास होण्याची शक्यता अधिक असल्याने ती वाळू बांधकामासाठी निरुपयोगी ठरते. बांधकामातील वाळू टोकदार असायला हवी आणि त्यात खनिजाचे प्रमाण असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच टणक आणि जाड वाळूचा शोध घेण्यासाठी वाळू तस्कर बराच आटापिटा करत असतात.

वाळूचा बेसुमार उपसा हा नद्यांच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांवर परिणाम करतात. म्हणूनच उपशाबाबत नियम करणे अत्यंत आवश्यक आहे. वाळू उत्खननाची अजस्र पद्धत आणि गाळातील स्वरूपात होणारा बदल हा नदी काठ भागावर परिणाम करतो आणि पाण्याची गुणवत्ता ढासळते. सततच्या उत्खननामुळे काठ कमकुवत होतात आणि प्रवाहदेखील विचलित होतो. धूप आणि गाळ जमा होण्याच्या प्रक्रियेवरही विपरीत परिणाम होतो. या कारणामुळे सभोवताली अनेक दुष्परिणाम पाहावयास मिळतात. रासायानिक घटकांचा विचार केल्यास वाळू उत्खनन आणि वाहतुकीत मशिनरीचा वापर होत असल्याने पाणी आणि हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. वाळू उपसा करणार्‍या मशिनमधून बाहेर पडणारा धूर आणि वापरले जाणारे इंधन यामुळे नदीचा नैसर्गिकपणा कमी होत आहे. वाळू काढल्याने गाळातील पोषक तत्त्वे नष्ट होत आहेत. ज्या ठिकाणी प्रचंड वाळू जमते, तेथेच उत्खनन केले जाते. साहजिकच नदीकाठ खचण्याचे प्रमाण वाढत जाते. भारतात पेरियार नदीच्या स्थितीचे आकलन केल्यास वाळू, माती आणि गाळ पोषक तत्त्वांनी युक्त असून काठ समृद्ध करणारा आहे; परंतु उत्खननामुळे नदीच्या पाण्यात असणारी पोषक तत्त्वे कमी होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news