Prof V. Kamakoti | व्ही. कामाकोटी

Prof V. Kamakoti |
Prof V. Kamakoti | व्ही. कामाकोटी
Published on
Updated on

तानाजी खोत

आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामाकोटी हे सध्या देशातील राजकीय व शैक्षणिक वर्तुळात प्रचंड चर्चेत आले आहेत. निमित्त ठरले आहे ते देशातील परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेला उच्चस्तरीय ‘टास्क फोर्स’ आणि त्यावरून संसदेत रंगलेले राजकीय नाट्य. नीट परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत प्रा. कामाकोटी यांचा समावेश करण्यात आला; मात्र लोकसभेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी प्रा. कामाकोटी यांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांना 'गोमूत्र एक्स्पर्ट' असा टोला लगावला. या टीकेनंतर देशातील २०० हून अधिक शास्त्रज्ञ आणि कुलगुरूंनी प्रियांका गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला.

प्रा. कामाकोटी यांनी १९८९ मध्ये संगणक अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केल्यानंतर १९९५ मध्ये आयआयटी मद्रासमधून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. आयआयएससी बंगळुरू आणि आयएमएससी चेन्नई येथे पोस्ट डॉक्टरेट संशोधन केल्यानंतर त्यांनी उद्योग क्षेत्रातही काम केले. शालेय जीवनात रसायनशास्त्रात अवघे १ गुण मिळवून सुरुवातीला जेईई परीक्षेत अपयशी ठरलेल्या कामाकोटी यांनी पुढे जाऊन त्याच आयआयटी मद्रासचे संचालकपद भूषवले आणि जेईई परीक्षेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

भारताचा पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर ‘शक्ती’ विकसित करणाऱ्या टीमचे नेतृत्व प्रा. कामाकोटी यांनीच केले आहे. सायबर सुरक्षा, संगणक रचना आणि व्हीएलएसआय डिझाईनमधील त्यांच्या क्रांतिकारी संशोधनाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे (NSAB) सदस्य असून, भारत सरकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता टास्क फोर्सचे अध्यक्षही राहिले आहेत. डीआरडीओ कडून शैक्षणिक उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळवणारे प्रा. कामाकोटी हे व्हायोलिनवादक आणि ग्रामीण शिक्षणाला प्रोत्साहन देणारे विचारवंतही आहेत.

तंत्रज्ञान आणि शैक्षणिक संशोधनाच्या पलीकडे जाऊन प्रा. कामाकोटी यांनी देशाच्या धोरणात्मक व तांत्रिक सुरक्षेत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. भारताच्या 'नॅशनल सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी'ची रूपरेषा तयार करण्यात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे. देशातील बँकिंग क्षेत्र, डिजिटल पेमेंट यंत्रणा आणि संरक्षण क्षेत्रातील डिजिटल पायाभूत सुविधा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सुरक्षा फ्रेमवर्क विकसित केले. याशिवाय, देशातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संगणक शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी स्वयम आणि 'NPTEL' या राष्ट्रीय डिजिटल शैक्षणिक प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक विस्तारातही पुढाकार घेतला. केवळ लॅबमध्ये संशोधन न करता उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग थेट सामान्य नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेत कसा करता येईल, यावर त्यांच्या संपूर्ण कार्यशैलीचा मुख्य भर राहिला आहे. वैज्ञानिक सिद्धांतांवर मतभेद असू शकतात; परंतु राजकीय हेतूने एखाद्यावर लेबल लावणे लोकशाही आणि वैज्ञानिक प्रगती या दोन्हीसाठी घातक आहे. प्रा. कामाकोटी यांच्यासारख्या तंत्रज्ञांचा योग्य सन्मान राखत देशाच्या परीक्षा पद्धतीतील दोष दूर करणे हेच राष्ट्रहिताचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news