

सतिंदर मोहन, चित्रपट समीक्षक
सात दशकांहून अधिक काळ 'इफ्फी'ने भारतीय चित्रपटांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच नव्या तंत्रज्ञानाची आणि चित्रपटनिर्मितीतील बदलत्या प्रवाहांची ओळख करून दिली.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) हे कथाकथनाची कला आणि चित्रपट तंत्रज्ञानातील प्रगती यांचा संगम घडवणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. चित्रपट निर्मितीतील डिजिटल तंत्रज्ञान, आभासी वास्तव, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निर्मितिपश्चात प्रक्रिया आणि दृकश्राव्य अनुभवांमधील नवनवीन प्रयोगांची ओळख करून देण्यात या महोत्सवाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्याबरोबरच तिला जागतिक चित्रपटविश्वाशी जोडण्याची भूमिका भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने बजावली आहे.
पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १९५२ मध्ये मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. दुसरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १९६१ मध्ये दिल्ली येथे झाला. तिसऱ्या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते संघटनांच्या महासंघाची (FIAPF) मान्यता मिळाली. हा भारतातील पहिला स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ठरला. याच वेळी प्रथमच महोत्सवाच्या नावात ‘ऑफ इंडिया’ हे शब्द जोडण्यात आले आणि त्याचे नामकरण ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ असे करण्यात आले. सुरुवातीचे महोत्सव दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आले. त्यानंतर स्पर्धाविरहित महोत्सव दरवर्षी दिल्लीबाहेर आयोजित करण्याची परंपरा सुरू झाली.
नवी दिल्ली येथील माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि आता या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) माध्यमातून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. याशिवाय, भारतीय चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन मिळावे आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने विविध राज्य सरकारांकडूनही चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापासून सुरू झालेली ही परंपरा आज बंगळूर, केरळ, चेन्नई, पुणे, धर्मशाळा, लखनौ, जयपूर, त्रिशूर आणि सिलीगुडी यांसारख्या शहरांपर्यंत विस्तारली आहे. ३५ वा 'इफ्फी' गोव्यात आयोजित करण्यात आला. त्याच वर्षी गोवा हे 'इफ्फी'चे कायमस्वरूपी केंद्र म्हणून घोषित करण्यात आले. दिल्ली सरकारने २५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला. या महोत्सवाचे नाव ‘आयएफएफडी २६’ असे होते. गोव्यातील 'इफ्फी'च्या धर्तीवर या महोत्सवाची आखणी आणि आयोजन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महोत्सवात मार्गदर्शनपर विशेष सत्रांचाही समावेश होता.
जागरण चित्रपट महोत्सव हा एक वैशिष्ट्यपूर्ण महोत्सव आहे. कारण, हा एक फिरता चित्रपट महोत्सव असून, आंतरराष्ट्रीय चित्रपट देशाच्या तळागाळातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. भारतातील विविध शहरांमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी जागरण चित्रपट महोत्सवाची १४ वी आवृत्ती असून, त्याचे उद्घाटन २० ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आले. १४ शहरांमधून प्रवास केल्यानंतर या महोत्सवाचा मुंबईत समारोप झाला. मी २०१७ पासून जागरण चित्रपट महोत्सवासाठी चित्रपटांचे पूर्वावलोकन करत आहे आणि यावर्षीही पूर्वावलोकन समितीचा सदस्य आहे.
माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने १९ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) १५ ते २१ जून या कालावधीत मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा माहितीपट चित्रपट महोत्सव आहे. भारतात हा महोत्सव दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो. १९ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार केलेल्या चित्रपटांचे आणि ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या उपक्रमातील चित्रपटांचेही प्रदर्शन करण्यात आले. यंदा प्रथमच जम्मू आणि काश्मीरमध्ये ७ ते १० सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला. हरियाणवी इनोव्हेटिव्ह फिल्म असोसिएशननेही डीएलसी सुपवा यांच्या सहकार्याने १९ आणि २० सप्टेंबर रोजी रोहतक (हरियाणा) येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला. आता ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे आयोजित होणार आहे. भारतीय चित्रपट निर्माते आणि निर्मात्यांना चित्रपटनिर्मितीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवे विचार आणि जागतिक स्तरावरील प्रयोगांची ओळख करून घेण्याची ही एक उत्तम संधी ठरेल, असा मला विश्वास आहे. अशा महोत्सवांमुळे भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळण्याबरोबरच अधिक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी प्रेरणा मिळेल.