Hydration Sensor | हायड्रेशन सेन्सर करून देईल पाणी पिण्याची आठवण

हल्ली फिटनेस गॅजेटस्ची इतकी क्रेझ वाढली आहे की, प्रत्येकाच्या हातात फिटनेस बँड दिसतो.
Hydration Sensor
हायड्रेशन सेन्सर करून देईल पाणी पिण्याची आठवण (Pudhari File Photo)
Published on
Updated on

आशीष शिंदे

हल्ली फिटनेस गॅजेटस्ची इतकी क्रेझ वाढली आहे की, प्रत्येकाच्या हातात फिटनेस बँड दिसतो. जिममध्ये व्यायाम करताना असो किंवा रनिंग ट्रॅकवर भर उन्हात धावताना, बँडमध्ये किती कॅलरी बर्न केल्या हे पाहणं म्हणजे जणू सवयीचा भाग झाला आहे. पण त्या कॅलरी बर्न करताना अंगातून किती घाम गेला, किती पाणी आणि खनिजं कमी झाली हे पाहणं मात्र आपण विसरतो. उलट काहीजण तर ‘आज खूप घाम आला, छान वर्कआऊट झालं!’ असं म्हणतात. पण त्यामुळे झालेलं निर्जलीकरण आपल्याला कळतं का? तहान लागली की पाणी प्यायचं ही आपली सवय. पण पाणी तहान भागवतं; मात्र शरीराला आवश्यक असलेलं सोडियमसारखं खनिज परत मिळवून देत नाही. त्यामुळेच थकवा, डिहायड्रेशन आणि स्नायूंना गोळे येण्याची समस्या निर्माण होते. हातातील फिटनेस बँड किंवा मोबाईल ट्रॅकर हे दाखवत नाहीत. मात्र, आता या समस्येचे उत्तर गॅजेट वर्ल्डमध्ये उपलब्ध झाले आहे.

अगदी फिटनेस बँडसारखाच एक छोटासा पॅच हातावर किंवा पाठीवर लावायचा आणि झाले! हा एआय पॅच सांगतो की, तुम्हाला पाणी पिण्याची गरज आहे की नाही. एवढंच नव्हे तर इलेक्ट्रोलाईटस्ची गरज आहे का, हेही तो नेमकं ठरवतो. हा एआय सेन्सर जणू स्मार्ट आरशासारखे काम करतो. त्वचेवर चिकटताच तो घामाचे रिअल टाईम विश्लेषण करतो. किती वेळाने पाणी प्यायचे, किती प्रमाणात प्यायचे आणि कोणते इलेक्ट्रोलाईटस् घ्यायचे याची सगळी माहिती थेट तुमच्या मोबाईलवर पोहोचते. त्यामुळे हायड्रेशनबाबत आता अंदाजावर नाही तर अचूक डेटावर भर देता येतो.

Hydration Sensor
Editorial : लवंगी मिरची : निसर्ग प्रेरणा

यातील कलरिमेट्रिक बायोसेन्सर घामातील सोडियमचे प्रमाण तपासतात. त्याला सरळ सोप्या आकड्यांमध्ये बदलून अ‍ॅप तुम्हाला सांगते, फक्त पाणी पुरेसं आहे की इलेक्ट्रोलाईटस् घ्यायला हवेत. याशिवाय अ‍ॅप तुमच्या वर्कआऊट पॅटर्न्स, वजन आणि घामाच्या पद्धती शिकते. त्यावरून प्रत्येकासाठी वेगळा वैयक्तिकृत हायड्रेशन प्लॅन तयार होतो. खेळाडूंसाठी तर हा पॅच एकदम वरदान आहे. कारण त्यामध्ये उपलब्ध असलेला कोच डॅशबोर्ड संपूर्ण टीमचा डेटा एका स्क्रीनवर दाखवतो. कोणत्या खेळाडूचा फ्लुईड लॉस सर्वाधिक आहे, कोणाला तातडीने इलेक्ट्रोलाईटस् हवे आहेत, हे प्रशिक्षक लगेच समजू शकतात. त्यामुळे सामन्यादरम्यान कार्यक्षमतेत अडथळा येऊ नये म्हणून योग्यवेळी उपाय करता येतात.

या एआय सेन्सरचा वापरही अगदी सोपा आहे. तो डिस्पोजेबल असल्यामुळे दरवेळी नवा पॅच वापरता येतो. हातावर किंवा पाठीवर तो सहज चिकटतो. वजनाने हलका असल्यामुळे तो त्रासदायक वाटत नाही. फक्त तीन स्टेपमध्ये सेटअप पूर्ण होतो आणि लगेच डेटा मोबाईलवर दिसू लागतो. आज फिटनेस ही केवळ आवड नाही तर जीवनशैली झाली आहे. अशा काळात शरीराला योग्य प्रमाणात पाणी आणि खनिजं मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे, जितके वर्कआऊट करणे. हा हायड्रेशन सेन्सर घामातूनच शरीराच्या आतली तहान उलगडतो आणि योग्य वेळी योग्य पाणी किंवा इलेक्ट्रोलाईटस् पिण्याची आठवण करून देतो. याची किंमत सध्या 12 ते 15 हजार रुपयांच्या घरात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news