

विनिता शाह
दहा डिसेंबर हा दिवस जगभरात
मानवाधिकार दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त...
सध्याच्या डिजिटल युगामध्ये ऑनलाईन विश्वातील मानवाधिकारांविषयी चर्चा करणे अपरिहार्य बनले आहे. कारण, आर्टिफिशियल इंटिलिजन्स, हायस्पीड इंटरनेट आणि सध्याच्या ‘24/7 स्क्रीन लाईफ’मध्ये मानवाधिकाराची संकल्पना ही 19 किंवा 20 व्या शतकातील राहिलेली नाही. शिवाय सार्वभौम मानवाधिकाराची व्याख्यादेखील वेगाने बदलत आहे. आजची पिढी इंटरनेट, डिजिटल जीवनशैली आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स यासारख्या वातावरणात वाढत आहे. अशावेळी त्यांचे हक्क आणि जबाबदारी यांनाही मानवाधिकाराने व्यापले आहे.
डिजिटल युगात भावनांचा आदर केल्यशिवाय मानवाधिकाराची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही. कारण, आजघडीला मानवी आयुष्याचा मोठा काळ डिजिटायजेशनयुक्त झाला आहे. म्हणून डिजिटल युगाने व्यापलेल्या आयुष्याचे, जीवनाचे संरक्षण करणे, आदर राखणे आणि त्यांच्या भावनेचा आदर करणेदेखील एकप्रकारे मानवाधिकारच आहे. मानवाधिकाराप्रती सजग राहायचे असेल, तर डिजिटल प्रायव्हसीचा आदर करणे आणि त्याचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
स्मार्ट फोनचे दोन क्लिक एखाद्याची मानसिक शांतता भंग करू शकतात. बॉडी शेमिंग, ट्रोलिंग, मीम या नावाखाली केला जाणारा अवमान हे मनोरंजन नसून डिजिटल हिंसाचार आहे; पण एक भावनाप्रधान आणि मानवाधिकाराप्रती सजग असणारा तरुण अशा मुद्द्यावर शांत बसत नाही. तो तक्रार करतो आणि ब्लॉक करत पीडिताला मदत करत असतो. या गोष्टी आज सामाजिक जबाबदारीचा भाग ठरत आहेत. एखाद्याला मानसिक आधार देणेदेखील मानवाधिकार असून त्याचे संरक्षण करणे हे डिजिटल तंत्रज्ञानात वावरणार्या प्रत्येक तरुणाचे कर्तव्य आहे. त्यामुळे मानवाधिकारावर स्वार होण्यासाठी या हालचालींवर मौन बाळगणे चुकीचे आहे.
कोणाचाही फोटो, चॅट, स्क्रीनशॉट किंवा एखाद्याचा व्हिडिओ तातडीने व्हायरल करण्यापूर्वी थोडे थांबा आणि विचार करा. कुणी परवानगी देत असेल, तरीही खासगीपणा जपण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर अशी कृती केली नाही, तर तुम्ही डिजिटल जगात शिष्टाचाराचे पालन करत नाही आणि लोकांप्रती संवेदनशील नसल्याचे सिद्ध होईल. कारण, तुम्ही केलेली चेष्टामस्करी किंवा मजा ही एखाद्याच्या भावना दुखविणारी किंवा त्याच्या अस्मितेला धक्का लावणारी असू शकते. आजच्या तरुण पिढीसाठी ‘कन्सेट कल्चर’ हे केवळ भौतिक गोष्टीशी संबंधित नाही, तर डिजिटल युगातही आवश्यक आहे. दुसर्याच्या परवानगीचा आदर करणे हा डिजिटल नैतिकेचा आधार आहे.
डिजिटल जगात मानवाधिकारप्रती सजग असाल, तर चिथावणी देणारे भाषण आणि भ—ामक बातम्यांपासून दूर राहणे गरजेचे आहे. एक एडिट केलेला व्हिडीओ, एक चुकीची माहिती तणाव निर्माण करू शकते. मानसिक आरोग्यदेखील मानवाधिकार असून त्याचे संरक्षण तुम्हालाच करावे लागते. इंटरनेट काहीच विसरत नाही, हे लक्षात ठेवा. सोशल मीडियावर शेअर केलेला प्रत्येक शब्द कायमस्वरूपी नोंदला जातो. स्वत:विषयी किंवा मित्राबाबत दाखविलेला निष्काळजीपणा हा करिअर, संबंध किंवा प्रतिमा बिघडविण्यास हातभार लावू शकतो.
त्यामुळे कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी दहावेळेस विचार करा. ‘डिजिटल फूट प्रिंट’कडे म्हणजेच ऑनलाईन वर्तनाकडे लक्ष देणे हा समंजस, संवेदनशील आणि भविष्याचा द़ृष्टिकोन बाळगणारा डिजिटल सिटिझन होण्याचा एक सोपा मार्ग ठरू शकतो. मतभेद स्वाभाविक असतात; परंतु अवमानकारक भाषा ही नीतीमूल्यांना पायदळी तुडवते. आर्थिक सुरक्षा बाळगताना आर्थिक व्यवहाराबाबत सजगता दाखविणे मानवाधिकाराचाच एक भाग आहे.