

मयुरेश वाटवे
अलीकडेच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गोवा दौर्यात येत्या विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेना 30 जागा लढवेल अशी घोषणा केली आहे. ही घोषणा किती वास्तववादी आहे?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेनेने 1989 पासून गोव्यात निवडणुका लढवायला सुरुवात केली. मराठी भाषिक पट्टा व ‘मराठी माणूस’ हा भावनिक धागा गोव्यात शिवसेनेसाठी जमेची बाजू होती. मात्र संघटनात्मक बांधणी व खमके स्थानिक नेतृत्व नसल्याने सेनेला एकही आमदार कधी मिळाला नाही. सुरुवातीच्या काळात शिवसेनेला जे ग्लॅमर होते, ते आज राहिलेले नाही. आज तो पक्ष तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसारखाच परका वाटतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोव्यात आमदार होते. 2002 व 2007 मध्ये पक्षाचे प्रत्येकी तीन आमदार निवडून आले. 2012 साली एकही आमदार निवडून आला नाही. 2017 साली पुन्हा एक आमदार निवडून आला. पण आज त्या पक्षाची अवस्थाही दयनीय आहे.
शिवसेनेच्या आतापर्यंत गोव्यातील कामगिरीचा आढावा घेतल्यास 1989 च्या विधानसभा निवडणुकीत 6 उमेदवार, 4960 मते. 1999 मध्ये 14 जागा लढवून 5987 मते. 2017 मध्ये 3 जागा लढवून फक्त 792 मते म्हणजे 0.09 मत टक्का मिळवला. सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. गोव्यात 27 वर्षांपूर्वी शिवसेनेला सहा हजारांच्या आसपास मते मिळाली होती. ती सर्वाधिक. आज गोव्याची मतदारसंख्या साडेअकरा लाखांच्या आसपास आहे. संघटनात्मक कार्य सोडा, गोव्यात अस्तित्वही नसताना 30 जागा लढवण्याची घोषणा महत्त्वाकांक्षीच म्हटली पाहिजे.
गोव्यात 1994 व 1999 वगळता शिवसेना कधीही भाजपसोबत युतीत लढली नाही. याचे कारण महाराष्ट्रात 30 वर्षे भाजप-सेना युती होती. ‘मैत्रीमुळे आम्ही गोव्याकडे लक्ष दिले नाही’, असे आदित्य ठाकरे यांनी 2022 मध्ये कबूल केले. भाजपने 2019 नंतर ‘पाठीत खंजीर खुपसल्याने’ सेनेने स्वतंत्रपणे गोवा लढवायचे ठरवले. 1989 ते 1994 पर्यंत भाजप गोव्यात शिवसेनेप्रमाणेच चाचपडणारा पक्ष होता. तेव्हा त्यांना अधिकाधिक मित्रपक्षांची गरज होती. भाजपची मगो (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष) सोबत युती होती. आज परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. तेव्हा मगो हा गोव्यात मोठा भाऊ होता, जशी महाराष्ट्रात शिवसेना. आज महाराष्ट्र आणि गोव्यात शिवसेना व मगो छोट्या भावाच्या भूमिकेत आहे.
2022 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून 10 जागा लढवल्या होत्या. संजय राऊत यांनी ममहाराष्ट्रातील महाविकास आघाडी मॉडेल गोव्यात राबवू, असे म्हटले होते. पण काँग्रेसने युती नाकारली. निकालात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे गट मविआमध्ये राहिला. आता गोव्यातही दोन्ही गट सक्रिय आहेत. 19 मे 2026 रोजी उदय सामंत यांनी पणजीत जाहीर केले की, शिंदे शिवसेना गोव्यात सुमारे 30 जागा लढवेल. निवडणूक लढवणे हेच उद्दिष्ट नाही, तर गोव्यात सत्तास्थापन करायची आहे, असे सामंत म्हणाले. 2023 मध्ये आनंद अडसूळ यांनीही पुढील निवडणुका लढवू, प्रचार मोहीम सुरू करू, असे सांगितले होते. संजय राऊत अजूनही उद्धव सेनेचे गोव्याचे प्रभारी आहेत. पण 2022 पासून काहीच संघटनात्मक काम झालेले नाही.
1989 ते 2022 पर्यंत सेनेला गोव्यात एकही आमदार, एक टक्केपेक्षा जास्त मते कधीही मिळालेली नाहीत. बाळासाहेबांनंतर गोव्यात जनाधार असलेला चेहरा सेनेकडे नाही. संजय हरमलकर, रमेश नाईक यांच्या काळात आमदार नसला तरी लढवय्या पक्ष अशी शिवसेनेची इमेज होती. आज ती राहिलेली नाही. पक्षाला 2022 मध्ये पणजीतून उमेदवारी मागे घेऊन उत्पल पर्रीकरांना पाठिंबा द्यावा लागला होता. बाळासाहेबांच्या नावावर गोव्यात भावनिक कनेक्ट आहे. पण मतांमध्ये त्याचे रूपांतर झालेले नाही. उदय सामंत यांची 30 जागांची घोषणा महत्त्वाकांक्षी आहे. पण 0.09 मत टक्का ते 30 जागा हे अंतर प्रचंड आहे. दोन गटांतील भांडणामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. महाराष्ट्रात शिंदे गट सत्तेत असला तरी गोव्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवून आमदार निवडून आणण्याएवढी पक्षाची शक्ती नाही.