Hope For Humanity | मानवतेचा आशादायी चेहरा

hope for humanity
Hope For Humanity | मानवतेचा आशादायी चेहराPudhari Photo
Published on
Updated on

तानाजी खोत

ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील बाँडी बीचवर 11 डिसेंबर रोजी सायंकाळी एका सामुदायिक केंद्रात ज्यू नागरिक हानुक्का सण साजरा करत असताना ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. द्वेषमूलक दहशतवादी विचारधारेने प्रेरित झालेल्या दोन हल्लेखोरांनी निष्पाप नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांचे हे कृत्य पूर्वनियोजित कटकारस्थानाचा भाग होते, ज्याचा उद्देश ज्यू समुदायाचा मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवून भीती पसरवणे हा होता. दहशतवाद्यांनी निवडलेले लक्ष्य, त्यांच्या विचारांची क्रूरता आणि समाजाला विभाजित करण्याची त्यांची विकृत मानसिकता स्पष्ट होती.

या भयानक घटनाक्रमात 43 वर्षीय अहमद अल अहमद नावाच्या एका सामान्य फळ विक्रेत्याची भूमिका निर्णायक ठरली. गोळीबार सुरू झाल्यावर जीव वाचवण्यासाठी अनेकजण पळत असताना उपजत करुणा आणि मूलभूत मानवी धैर्याने प्रेरित झालेल्या अहमद यांनी आपल्या सुरक्षिततेचा कोणताही विचार न करता एका हल्लेखोरावर झडप घातली आणि त्याचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. हा केवळ एक शारीरिक संघर्ष नव्हता, तर एका सामान्य माणसाने विकृत विचारधारेविरुद्ध दिलेला तो नैतिक लढा होता.

या जीवघेण्या झटापटीत त्यांना दोन गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले; मात्र या झटापटीमुळे दहशतवाद्याचा हल्ला विस्कळीत झाला. यामुळे अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी पळ काढायला पुरेसा वेळ मिळाला आणि मोठी जीवितहानी टळली. अन्यथा आता जेवढे नागरिक मृत्युमुखी पडले त्याहून अधिक नागरिक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले असते. अहमद अल अहमद हे 43 वर्षांचे असून सिडनीमधील सदर्न शायर परिसरामध्ये फळांचे दुकान चालवतात. त्यांना दोन मुले आहेत.

घटनेच्या वेळी ते पूर्णपणे निशस्त्र होते आणि त्यांना रायफल किंवा कोणत्याही शस्त्रास्त्र चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. कुटुंबाची जबाबदारी आणि कोणतेही लष्करी प्रशिक्षण नसतानाही एका सामान्य फळ विक्रेत्याचा जीव वाचवण्यासाठी धावून जाण्याचा हा निर्णय पूर्णपणे त्यांचे वैयक्तिक नैतिक धैर्य आणि मानवी करुणा दर्शवतो. गोळ्या लागून गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अहमद अल अहमद यांच्या या अतुलनीय कृत्याचे केवळ ऑस्ट्रेलियातच नव्हे, तर जगभरातून कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना ‘खरे नायक’ म्हणून गौरवले आणि जगभरातील माध्यमांनी त्यांच्या धैर्याची प्रशंसा केली. त्यांच्या कृतीतून एक गोष्ट स्पष्ट होते की, दया आणि करुणा ही मानवाची उपजत आणि नैसर्गिक प्रेरणा आहे, जी त्याला शिकवावी लागत नाही.

त्यासाठी कुठलेही शिबिर जॉईन करावे लागत नाही. याउलट दहशत माजवणे, द्वेष आणि हिंसा शिकवावी, त्यासाठी तरुणांना मृत्यूनंतरच्या रमणीय जीवनाचे खोटे स्वप्न दाखवून आणि असत्याचा प्रसार करून भूलथापा द्याव्या लागतात. याउलट अनादी काळापासून माणसात असलेली करुणा वेळ पडल्यास कशी बाहेर येते, हे अहमद अल अहमद यांनी कृतीतून दाखवून दिले. अहमद यांच्या कृतीत वैश्विक करुणेची आणि मानवतावादी मूल्ये दिसतात, जी हिंसेच्या विकृत विचारधारेपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत. त्यांच्या या शौर्याने दहशतवाद्यांच्या द्वेशमुलक विचारांना पराभूत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news