Smallest Laser TV Projector | घरीच आयमॅक्सचा अनुभव देणारा प्रोजेक्टर

Smallest Laser TV Projector |
Smallest Laser TV Projector | घरीच आयमॅक्सचा अनुभव देणारा प्रोजेक्टर
Published on
Updated on

आशिष शिंदे

शनिवारची निवांत संध्याकाळ, हातामध्ये पॉपकॉर्नचा टब, सोफ्यावर मारलेली सुशेगात बैठक आणि समोर थेट थिएटरसारखा भव्य पडदा. आपल्याच घरात असा सिनेमाचा शाही थाट अनुभवायला कोणाला आवडणार नाही? घरच्या घरी थिएटरचा हाच थरार जगण्यासाठी आजकाल अनेक जण मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीऐवजी लेझर प्रोजेक्टर्सकडे वळत आहेत. पण, बाजारात मिळणारे बहुतांश प्रोजेक्टर म्हणजे जणू वजनाने भारी आणि आकाराने अवाढव्य असणारे पांढरे हत्तीच! लहान खोलीत त्यांना जागा देणे म्हणजे एक मोठी कसरत असते. गॅजेट वर्ल्डमध्ये या समस्येवर एक भन्नाट आणि तितकाच शक्तिशाली उपाय अवतरला आहे. हा जगातील सर्वात लहान लेझर टीव्ही प्रोजेक्टर आहे.

हा लेझर प्रोजेक्टर इतका सुटसुटीत आणि कॉम्पॅक्ट आहे की तो तुमच्या खोलीतील छोट्या कपाटात किंवा टेबलाच्या कोपऱ्यात अगदी सहज मावून जाते. याचे वजन साडेचार किलो! या गॅजेटचे फिचर्स मात्र थक्क करणारे आहेत. याच्या नावावर सध्या जागतिक बाजारपेठेत सर्वात कमी अंतरावरून मोठी स्क्रीन देणारा प्रोजेक्टर म्हणून मान मिळाला आहे. हा प्रोजेक्टर भिंतीपासून किंवा पडद्यापासून अवघ्या ६.६ इंच म्हणजेच साधारण एका वितीपेक्षा थोडेसे जास्त दूर ठेवला, तरी तो तुमच्या समोर तब्बल १०० इंचांचे अवाढव्य चित्र उभे करतो! आणि जर तुम्ही याला भिंतीपासून केवळ दीड फूट मागे सरकवले, तर थेट १५० इंचांचा पडदा तयार होतो. तुमची राहती खोली क्षणार्धात आलिशान आयमॅक्स थिएटरचे रूप धारण करते.

या मशिनच्या पोटात कंपनीचे पेटंट असलेले प्रगत ट्राय-लेझर मशिन आहे. यात थेट तीन लेझर किरणांचा प्रकाश वापरला जातो. तब्बल ३६०० आयएसओ ल्युमेन्सच्या प्रखर ब्राइटनेसमुळे, खोलीत दुपारचा उजेड असेल किंवा आजूबाजूचा प्रकाश चालू असेल, तरी चित्राची स्पष्टता अजिबात कमी होत नाही. या तंत्रज्ञानाची खरी जादू उलगडते ती चित्रपटांमधील रात्रीच्या किंवा अंधाऱ्या दृश्यांमध्ये! उच्च कॉन्ट्रास्टमुळे पडद्यावर गडद काळा रंग इतक्या घनतेने उमटतो की, हॉलीवूड सिनेमे पाहताना पडद्यावरील अंधारालाही सिनेमॅटिक खोली मिळते. प्रत्येक रंग इतका अचूक आणि उजळ दिसतो की निसर्गचित्र पाहताना आपण स्वतः तिथे उपस्थित असल्याचा भास होतो. डेन्मार्कच्या जगप्रसिद्ध ऑडिओ ब्रँडची २० वॉटची इनबिल्ट साऊंड सिस्टीम बसवली आहे. डॉलबी ॲटमॉस आणि थ्रीडी साऊंड फॉरमॅटला सपोर्ट करणारा याचा आवाज बासयुक्त आहे. यामुळे खोलीच्या कानाकोपऱ्यात गाण्याचा प्रत्येक सूर स्पष्ट ऐकू येतो.

घरगुती वापरासाठी तुम्हाला वेगळ्या साऊंडबार किंवा होम थिएटर स्पीकर्सचे जाळे पसरवण्याची अजिबात गरज भासणार नाही. याशिवाय, यात थेट गूगल टीव्ही इन-बिल्ट असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्म्स फोर के दर्जासह रिमोटवरील व्हॉईस सर्चद्वारे एका क्लिकवर सुरू होतात. यात प्रगत टीओएफ सेन्सर आणि दोन स्मार्ट कॅमेरे दिले आहेत. तुम्ही हे मशिन टेबलवर कुठेही ठेवा, ते काही सेकंदांत स्क्रीनचा आकार, फोकस आणि कोपरे आपोआप अचूक सेट करते. तुमच्या घरची भिंत रंगीत असेल, तरीही नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी हे गॅजेट स्वतःचे सेटिंग बदलून घेते. कनेक्टिव्हिटीसाठी यात हाय-स्पीड वाय-फाय ६ आणि गेमिंगसाठी दोन एचडीएमआय २.१ पोर्ट्स दिलेेत. या संपूर्ण सेटसोबत एक स्टाईलिश ट्रॅव्हल बॅग मिळते, ज्यामध्ये प्रोजेक्टर आणि रिमोट सुरक्षित ठेवून तुम्ही मित्राच्या घरी मॅच पाहण्यासाठी किंवा सुट्टीवर फिरायला सहज घेऊन जाऊ शकता. भारतीय चलनात याची किंमत अंदाजे २ लाख ३० हजार ते २ लाख ३५ हजार रुपयांच्या घरात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news