

वीरेंद्र सोनवणे
दिवाळीची सुट्टी म्हणजे मुलांसाठी खेळण्याचा, बागडण्याचा, नवनवीन गोष्टी अनुभवण्याचा आणि बालपण मनमुराद जगण्याचा काळ. मात्र, ही सुट्टी अभ्यासाच्या ओझ्याखाली दबली जायला नको.
दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुवास, किल्ला बनवण्याची धांदल आणि उटण्याचा सुगंध. शाळांना सुट्टी लागल्याने लहानग्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत असतो. पण ही सुट्टी सुरू होताच बहुतांश घरांमध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळते. ‘आधी गणिताचा स्वाध्याय पूर्ण कर, मग बाहेर खेळायला जा’, असा पालकांचा हुकूम सुटतो. सुट्टीचा गृहपाठ, शिकवणी वर्गांचे वेळापत्रक आणि गुणांची स्पर्धा यांमुळे दिवाळीचा हा सण बालमनासाठी आनंदाऐवजी मानसिक तणावाचा काळ तर बनत नाही ना? या पार्श्वभूमीवर स्वतःला एक प्रश्न विचारावा लागेल, ‘आपण मुलांना भविष्यातील यशस्वी नागरिक बनवण्याच्या नादात त्यांच्या वर्तमानकाळातील शिकण्याचा नैसर्गिक आनंद तर हिरावून घेत नाही ना?’
प्रत्येक मूल हे निसर्गाने स्वतंत्र आणि वेगळ्या क्षमतेचे बनवले आहे. सर्वांना एकाच चौकटीत बसवून अभ्यासाचा आग्रह धरणे अन्यायकारक ठरते. प्ले ग्रुप, नर्सरी व लहान बालवर्गातील मुलांची आकलनक्षमता ही अनुभवातून विकसित होते. या वयात पुस्तकांपेक्षा खेळ, रंगीबेरंगी चित्रे, गोष्टी आणि प्रत्यक्ष कृतींतून शिक्षण होणे गरजेचे असते. बालपणीचा हा काळ स्पर्श, आवाज आणि निरीक्षणातून जग समजून घेण्याचा असतो. प्राथमिक वर्गातील (पहिली ते चौथी) विद्यार्थ्यांसाठी भाषा समृद्धी, वाचन, सुवाच्य लेखन आणि गणितातील पायाभूत क्रिया महत्त्वाच्या असतात. या वयात पाठांतरापेक्षा रंजक उजळणी उपयुक्त ठरते. तर माध्यमिकपूर्व (पाचवी ते आठवी) विद्यार्थ्यांमध्ये तर्कशक्ती, संकल्पनांची स्पष्टता, प्रयोगशीलता आणि स्वअध्ययनाची सवय विकसित होणे आवश्यक असते.
एकाच वेळी अनेक धडे पाठांतर केल्याने सर्व काही लक्षात राहते, हा एक मोठा शैक्षणिक गैरसमज आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, मेंदू एकाच वेळी अमर्याद माहिती साठवू शकत नाही. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) अभ्यासक्रमानुसार, घोकंपट्टीने अल्पकालीन स्मरणशक्तीत माहिती जाते. पण ती दीर्घकालीन स्मरणशक्तीचा भाग बनत नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्येसुद्धा पाठांतराऐवजी ‘संकल्पनात्मक समज’ यावर भर दिला आहे.
दिवाळीची सुट्टी ही पुस्तकी अभ्यासाचे ओझे वाढवण्यासाठी नसून जीवनकौशल्ये शिकण्याची उत्तम संधी आहे. या सुट्टीत मुलांच्या वयोगटानुसार विविध उपक्रम राबवता येतील. लहान मुलांसाठी किल्ला निर्मिती हा सर्जनशील उपक्रम आहे; यातून इतिहास, माती काम, नियोजन आणि संघभावना शिकायला मिळते. रांगोळी काढणे आणि चित्रकलेतून हातात कला येईल. वाचन, गोष्टीलेखन आणि निसर्ग निरीक्षण यांमुळे कल्पकता वाढते. घरखर्चाची साधी नोंद ठेवण्यास सांगून प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील मुलांना व्यावहारिक गणित सहज शिकवता येते. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करून प्लास्टिकचा वापर टाळणे, पक्ष्यांसाठी धान्य - पाणी ठेवणे यांतून सामाजिक व पर्यावरणीय संवेदना विकसित होतात. या सर्व उपक्रमांतून अभ्यासाचा ताण न येता मुलांचा आत्मविश्वास आणि व्यवहारज्ञान वाढते.
आजच्या शिक्षणव्यवस्थेत शिक्षकांनी दिलेला अथांग गृहपाठ, पालकांच्या गुणांच्या अवास्तव अपेक्षा, खासगी शिकवणी वर्गांचे पेव आणि इतर मुलांशी केली जाणारी सततची तुलना यांमुळे मुले अभ्यासाला घाबरू लागली आहेत. यात शिक्षक किंवा पालकांना थेट दोषी धरणे योग्य ठरणार नाही. कारण तेही या स्पर्धात्मक व्यवस्थेचे भाग बनले आहेत. पण यावर संतुलित उपाय शोधणे काळाची गरज आहे. मुलांच्या निरोगी वाढीसाठी किमान आठ तासांची शांत झोप, रोज दोन तास मैदानी खेळ, पुरेशी विश्रांती आणि भावनिक सुरक्षितता अत्यंत आवश्यक आहे.
शिक्षकांनी सुट्टीत रोज ५० पाने लिहिण्याचा गृहपाठ देण्याऐवजी एखाद्या पुस्तकाचे वाचन किंवा दैनंदिन निरीक्षण नोंदवण्यासारखे स्वाध्याय द्यावेत. पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लादता त्यांच्यासोबत खेळण्यात व गप्पा मारण्यात वेळ घालवावा. दिवाळीतील उटण्याचा सुगंध जसा तन-मन ताजेतवाने करतो, तसेच ही सुट्टी मुलांच्या मनाला नवी ऊर्जा देणारी ठरली पाहिजे.