European politics news | बल्गेरियातील ऐतिहासिक सत्ता परिवर्तन

European politics news |
European politics news | बल्गेरियातील ऐतिहासिक सत्ता परिवर्तनStoyan Nenov
Published on
Updated on

मुरलीधर कुलकर्णी

बल्गेरिया या बाल्कन राष्ट्राने नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत एक ऐतिहासिक आणि अत्यंत अनपेक्षित कौल दिला असून, या निकालाने संपूर्ण युरोपचे लक्ष वेधून घेतले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष रुमेन रादेव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा घेतलेला निर्णय सार्थ ठरला असून, त्यांच्या ‘प्रोग्रेसिव्ह बल्गेरिया’ या पक्षाने 44.7 टक्के मतांसह निर्विवाद बहुमत मिळवले. गेल्या पाच वर्षांत आठ निवडणुका पाहणार्‍या बल्गेरियासाठी हा निकाल केवळ सत्तांतर नसून एका प्रदीर्घ राजकीय अस्थिरतेचा शेवट मानला जात आहे. 1997 नंतर प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाला संसदेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतपत स्पष्ट जनादेश मिळाला आहे.

रुमेन रादेव यांची ही खेळी अत्यंत धाडसी होती. कारण, त्यांनी राष्ट्राध्यक्ष या सुरक्षित आणि सन्माननीय पदाचा त्याग करून सक्रिय राजकारणाची धुरा हाती घेतली. या विजयामुळे आता ते देशाचे नवे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारतील, तर त्यांच्या जागी सध्या इलियाना योटोवा या हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार पाहत आहेत. रादेव यांचा हा विजय प्रामुख्याने भ्रष्टाचारविरोधी लढ्यावर आधारित होता. त्यांनी प्रस्थापित नेत्यांच्या ‘माफिया राज’विरुद्ध छेडलेली मोहीम तरुणाईला आणि सामान्य मतदारांना भावली. यापूर्वीच्या युती सरकारांमधील अंतर्गत कलहामुळे बल्गेरियाची प्रगती खुंटली होती, ज्यामुळे जनतेमध्ये मोठा असंतोष होता; मात्र या विजयामुळे युरोपियन युनियन आणि नाटो या संघटनांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

रादेव यांना ‘रशिया धार्जिणे’ नेते म्हणून ओळखले जाते. त्यांनी युक्रेनला लष्करी मदत देण्याच्या धोरणांना आणि युरोपीय निर्बंधांना सातत्याने विरोध दर्शवला आहे, ज्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपची एकसंध फळी कमकुवत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्थिक पातळीवर बल्गेरिया सध्या मोठ्या संकटातून जात आहे. देशाने अलीकडेच ‘युरो’ हे चलन स्वीकारल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. रादेव यांनी याच मुद्द्याला हात घालत ‘युरो-संशयवादी’ भूमिका मांडली आणि स्थानिक अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला. बल्गेरियाचे स्थान काळ्या समुद्राच्या काठी असल्याने धोरणात्मक आहे. रादेव यांच्या नेतृत्वाखालील सरकार रशियासोबतचे ऊर्जा आणि व्यापारी संबंध पुन्हा सुधारण्यास प्राधान्य देईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हे पाऊल युरोपीय समुदायासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

जागतिक स्तरावर इंधनाचे दर 35 टक्क्यांनी वाढलेले असताना आणि भूराजकीय स्थिरता डळमळीत असताना रादेव यांचा हा विजय युरोपच्या राजकारणात एक नवीन ‘पॉवर सेंटर’ निर्माण करणारा ठरला आहे. बल्गेरियातील जनतेने स्थिरतेला आणि कणखर नेतृत्वाला पसंती दिली असली, तरी रादेव यांची रशियाशी असलेली जवळीक देशाला जागतिक राजकारणात एकाकी पाडते की नव्या उंचीवर नेऊन ठेवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आगामी काळात बल्गेरियाचे परराष्ट्र धोरण केवळ त्यांच्या देशापुरते मर्यादित न राहता युरोपीय अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम करणारे ठरेल, यात मुळीच शंका नाही. त्यामुळेच ही निवडणूक आधुनिक युरोपमधील लोकशाही आणि वाढत्या राष्ट्रवादाचा एक नवा अध्याय मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news