

मेहेंदळे हे प्रकांड पंडित आणि प्रखर स्मरणशक्ती असलेले साक्षेपी इतिहास संशोधक अथवा इतिहासकार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते अगदी लहानपणापासून निस्सीम भक्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान चरित्राचे यथार्थ दर्शन घडवणारा ग्रंथ आजवर निर्माण झालेला नाही, याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणून त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षीच शिवचरित्र लिहिण्याचा संकल्प केला व त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली.
पांडुरंग बलकवडे
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. मेहेंदळे हे प्रकांड पंडित आणि प्रखर स्मरणशक्ती असलेले साक्षेपी इतिहास संशोधक अथवा इतिहासकार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते अगदी लहानपणापासून निस्सीम भक्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान चरित्राचे यथार्थ दर्शन घडवणारा ग्रंथ आजवर निर्माण झालेला नाही, याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणून त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षीच शिवचरित्र लिहिण्याचा संकल्प केला व त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. जसं त्यांना शिवचरित्राचे आकर्षण तसे त्यांना मिलिटरी सायन्स या विषयाचेही आकर्षण होते. ते सैन्य दलात दाखल होऊन त्यांनी सैन्य दलाची तीन वर्षे सेवाही केली. डिफेन्स स्टडी या विषयात ते गोल्ड मेडलिस्ट होते.
खरे तर मेहेंदळे एक अष्टपैलू, अवलिया व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी एकाच वेळेत अनेक गोष्टी केल्या. त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते. 1971 च्या बांगला देश युद्धात म्हणजेच पूर्व पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष धोका पत्करून वार्तांकन केले होते. 1971 च्या युद्धावर त्यांनी एक ग्रंथही प्रसिद्ध केला; परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो प्रसिद्ध झाला नाही.
जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारे दुसरे महायुद्ध हा त्यांचा आकर्षणाचा विषय झाला. पहिले आणि दुसरे महायुद्ध या दोन्हीही युद्धांवर प्रकाशित व अप्रकाशित ग्रंथांचा अभ्यास करून हजार पानांचे पाच खंडांचे लेखन त्यांनी केले आहे. ते अंतिम प्रसिद्धीच्या टप्प्यात होते. शिवचरित्रासाठी तत्कालीन विविध भाषांतील सर्व ऐतिहासिक साधनांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. त्याआधारे मराठीमध्ये अडीच हजार पानांचा पूर्वार्ध त्यांनी प्रसिद्ध केला आणि अडीच हजार पानांचे शिवचरित्र प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर होते.
गेली काही वर्षे त्यांना शारीरिक समस्या सुरू झाल्या होत्या. तब्येतीचा विचार करत त्यांनी अस्सल साधनांवर आधारित शिवचरित्र जगासमोर यायचे असेल, तर ते इंग्रजी भाषेत जगासमोर यायला हवे, अशी जाणीव त्यांना व्हायला लागली. त्यामुळे हातातील सर्व कामे बाजूला ठेवून त्यांनी ‘शिवाजी लाईफ अँड टाईम’ हा ग्रंथ साकार केला. ‘आदिलशाही फर्माने’, ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर...’, ‘टिपू ः अॅज ही रिअली वॉज’, ‘छत्रपतींचे आरमार...’ हे त्यांचे मौलिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. ‘इस्लामची निर्मिती आणि त्यांची चौदाशे वर्षांची वाटचाल व त्याचा जगावर झालेला परिणाम...’ याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. पाच हजार पानांची इस्लामची ओळख हे पाच खंड प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर होते. मेहेंदळेंचा अभ्यासासाठी देशभर प्रवास चालू असे.
मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सर्व अर्काईव्ह महाराष्ट्र, कोलकाता, बिकानेर येथील अर्काईव्ह आणि ग्रंथालयांना त्यांनी भेटी दिल्या आणि तेथील साधनांचा सखोल अभ्यास केला होता. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाशी त्यांचा 60 वर्षांचा ऋणानुबंध होता. मंडळाची गेली अनेक वर्षांची जी वाटचाल चालू आहे, ती आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करत आलो आहोत. खरं तर इतिहास संशोधक मंडळ त्यांची कर्मभूमी राहिली आहे. भांडारकर इन्स्टिट्यूट, आनंदाश्रम, एशियाटिक सोसायटी अशा अनेक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता.