

डॉ. दीपक शिकारपूर
बदलत्या रोजगारविश्वात केवळ पदवी नव्हे, तर कौशल्य, अनुभव आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती हीच यशाची खरी गुरुकिल्ली ठरत आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व आणि भविष्यातील संधींविषयी...
नोव्हेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने १५ जुलै हा दिवस 'संयुक्त युवा कौशल्य दिन' म्हणून घोषित केला. या निर्णयामागील विचार अत्यंत स्पष्ट होता. जगभरातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी, स्वावलंबी घडविण्यासाठी आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठी कौशल्य शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे. दुर्दैवाने आपल्या देशातील शिक्षणव्यवस्थेचा मोठा भाग अजूनही परीक्षा, गुण आणि पदवी यांच्या चक्रव्यूहात अडकलेला दिसतो. विद्यार्थ्यांच्या हातात पदवी येते; पण अनेकांच्या हातात काम करण्याचे कौशल्य नसते. परिणामी, एकीकडे लाखो सुशिक्षित युवक रोजगाराच्या शोधात भटकताना दिसतात, तर दुसरीकडे उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्राला योग्य कौशल्य असलेले मनुष्यबळ मिळत नाही. हीच आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
एकविसाव्या शतकातील यशाचे सूत्र अत्यंत सोपे आहे. पदवी+कौशल्य+कार्यानुभव+सकारात्मक मनोवृत्ती = करीअर. या चार गोष्टींपैकी एक जरी कमी पडली, तर स्पर्धेच्या जगात मागे पडण्याची शक्यता वाढते. केवळ पदवी मिळवून करिअर घडत नाही. ज्ञानाला कृतीची जोड आणि कृतीला अनुभवाची साथ मिळाली, तरच व्यक्तिमत्त्व सक्षम बनते. योग्य अभिरुची, सकारात्मक दृष्टिकोन आणि संघभावनेने काम करण्याची क्षमता हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली ठरते.
प्रत्येक माणूस जन्माला येताना ईश्वराकडून एक वेगळी देणगी घेऊन येतो. प्रत्येकाची बुद्धी, आवड, कल्पकता, हातोटी आणि कलागुण वेगळे असतात. कोणाला चित्रकलेची आवड असते, कोणाला संगीताची, कोणाला गणिताची, कोणाला संवाद साधण्याची, तर कोणाला नेतृत्व करण्याची. दुर्दैवाने आपण सर्व विद्यार्थ्यांना एका मोजपट्टीने मोजण्याचा प्रयत्न करतो. गुणपत्रिकेतील आकडेच विद्यार्थ्याचे भविष्य ठरवतील, असा गैरसमज अजूनही समाजात आहे. आधुनिक संशोधनातून मल्टिपल इंटेलिजन्सची कल्पना पुढे आली आहे. प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक क्षमता वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रकट होत असते. त्यामुळे कारकीर्द निवडताना स्वतःची ताकद, आवड आणि क्षमता ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःला समजून घेतलेला विद्यार्थी योग्य क्षेत्र निवडतो आणि त्या क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवतो. दुसऱ्यांचे अनुकरण करण्यापेक्षा स्वतःचा मार्ग शोधणे अधिक महत्त्वाचे आहे. आज आपण ज्ञानाच्या विस्फोटाच्या युगात जगत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती इतक्या वेगाने होत आहे की, कालचे आधुनिक मानले गेलेले तंत्रज्ञान आज जुने ठरत आहे. नवीन साधने, नवीन पद्धती, नवीन व्यवसाय आणि नवीन संधी सातत्याने निर्माण होत आहेत. जागतिक स्पर्धा आणि खुल्या अर्थव्यवस्थेमुळे कामाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. आज अनेक क्षेत्रांत कामाच्या तासांपेक्षा कामाच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व दिले जाते. ज्याच्याकडे अधिक कौशल्य, अधिक वेग, अधिक सर्जनशीलता आणि अधिक जबाबदारी आहे, त्यालाच अधिक संधी मिळते. नवीन ज्ञान स्वीकारणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि बदल स्वीकारण्याची तयारी ठेवणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आपल्या कामाशी संबंधित नवीन तंत्र, नवीन साधने, नवीन कार्यपद्धती आणि नवीन विचार शिकण्याची सवय माणसाला कायम स्पर्धात्मक ठेवते. बदलत्या रोजगार विश्वात टिकून राहण्यासाठी ही सवय अमूल्य ठरते. ज्याने शिकणे थांबवले, त्याची प्रगतीही थांबते; पण जो सातत्याने शिकत राहतो, त्याच्यासाठी प्रत्येक बदल नवी संधी घेऊन येतो.
राष्ट्रीय युवा कौशल्य दिन हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नाही. तो प्रत्येकाला स्वतःच्या भविष्याचा आरसा दाखवणारा दिवस आहे. शाळा, महाविद्यालये, पालक, उद्योग क्षेत्र आणि शासन यांनी मिळून कौशल्याधारित शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले, तर भारत जगातील सर्वात सक्षम युवा शक्ती बनू शकतो. पदवीला कौशल्याची जोड, कौशल्याला अनुभवाची साथ आणि अनुभवाला सातत्याने शिकण्याची वृत्ती मिळाली, तर कोणताही युवक यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. आता वेळ आली आहे गुणांच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची आणि गुणवत्तेच्या प्रवासाला सुरुवात करण्याची. कारण, भविष्य त्यांचेच असणार आहे, जे शिकत राहतील, बदल स्वीकारतील आणि कौशल्याच्या बळावर स्वतःचे तसेच राष्ट्राचे भविष्य घडवतील.