झाले असे की, एक जोडपे मेघालयामध्ये हनिमूनसाठी गेले. नवपरिणीत पत्नीच्या मनात हनिमूनऐवजी काही वेगळाच बेत होता. तिने चक्क आपल्या नवर्याचीच सुपारी एक प्रियकर आणि इतर दोन गुंड यांना दिली. नेमून दिलेल्या कामाला आणि रकमेला जागून गुंडांनी पतीचा गेम केला आणि त्याला संपवले. नववधू पती फरार झाला म्हणून कांगावा करत राहिली आणि नंतर ती पण स्वतः फरार झाली. मेघालय पोलिसांना तिला शोधण्यासाठी 17 दिवस लागले. मेघालय हे तसे छोटेसे राज्य आहे. तुमच्या मनात प्रश्न येईल की, पोलिसांना इतके दिवस का लागले? या प्रश्नाचे उत्तर तिने केलेला मेकअप हे आहे.
नुकतेच लग्न झालेले त्या नववधूचे फोटो पोलिसांच्या ताब्यात आले. त्यामध्ये सुंदर असणारी ती तरुणी भरपूर मेकअप केलेली होती आणि तो फोटो घेऊन पोलीस सर्वत्र तिचा शोध घेत होते. दरम्यानच्या काळामध्ये तिचा मेकअप पूर्ण गेला होता आणि ती साधी दिसत होती. त्यामुळे बरेचदा पोलिसांसमोर येऊनही ते तिला ओळखू शकले नाहीत. ही अशी असते मेकअपची किमया!
आजकाल मेकअप आर्टिस्ट लोकांना फार मोठी डिमांड आलेली आहे. नवरीच्या मेकअपसाठी चक्क दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम लागू शकते. एखाद्या साधारण घरातील लग्न असेल, तरी नवरा-नवरीची आई, बहिणी, मावश्या आणि इतर लोक जे मेकअप करतात त्याचा खर्चसुद्धा एक लाखापर्यंत जात असतो. तुमच्या चेहर्यावर काही दोष असेल, तर ते मेकअपने लपवले जाऊ शकतात. आजकाल तुम्ही पाहा, कोणत्याही लग्नामध्ये नवरा-नवरी दिसायला सुंदर असतात. प्रत्यक्षात ते तेवढे सुंदर असतात का, तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. मेकअप करून साधारण बारा तास या पती-पत्नीचे आणि वर्हाडातील अनेकांचे रंग, रूप बदललेले असते.
लग्नाला वगैरे केला जाणारा मेकअप आजकाल सर्रास प्रत्येक सोहळ्यासाठी केला जातो. नातेवाईकांमधील डोहाळ जेवण, छोटे-मोठे वाढदिवस यासाठीसुद्धा महिला नटूनथटून आलेल्या असतात. त्यांनी भरपूर मेकअप करून चेहर्यावर विविध प्रकारचे थर चढवलेले असतात. तुमचे मूळ रूप कसेही असो, मेकअप केल्यानंतर तुम्हाला सौंदर्य बहाल केले जाते. तुम्ही याला खोटे सौंदर्य म्हणाल; परंतु अशा पद्धतीने सुंदर दिसणे आता साधारण झाले आहे. यावरून एक विनोद सांगितला जातो. एक पती आपल्या पत्नीला घेऊन मेकअप पार्लरमध्ये गेला. तासभराने त्याची पत्नी बाहेर आली तेव्हा त्याला ती ओळखूच नाही आली. पत्नीने त्याला ‘चला घरी’ असे म्हटले आणि त्याचा हात पकडला तेव्हा तो कावराबावरा झाला आणि त्याने विचारले की कुठे जायचे? तिने सांगितले, ‘हो मीच आहे. दुसरे कोणी नाही. चला पटकन!’ तेव्हा त्याला कळाले की, आपली पत्नी सुंदर दिसत आहे.

