

परीक्षा होऊन गेलेल्या असल्यामुळे सध्या निकालाचा सीझन जोरात आहे. बारावीच्या परीक्षांचे निकाल लागून गेले आहेत आणि त्यानंतर आता दहावीच्या परीक्षांचे निकाल लागले आहेत. कुणाला किती मार्क पडले या विषयाच्या चर्चा घराघरांत रंगत आहेत. महाराष्ट्र राज्य ही बुद्धिमत्तांची खाण असल्यामुळे राज्याचा यंदाचा बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. मुली या अधिक शिस्तबद्ध आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार्या असल्यामुळे साहजिकच त्यांचे पास होण्याचे प्रमाण जास्त असते. मुलांना मागे टाकत मुलींनी जवळपास 95 टक्केपर्यंत उत्तीर्ण होण्यामध्ये बाजी मारली आहे. मुलांचे हेच प्रमाण जवळपास 90 टक्केपर्यंत आहे. असेच निकाल दहावीचेही लागले आहेत.
भरभरून मार्क मिळावेत असे तर प्रत्येकालाच वाटत असते. पण मोजून मापून मार्क मिळवणार्यांचे पण कौतुक होत असते. पास होण्यासाठी मात्र 35 टक्के गुणांची मर्यादा फार पूर्वीपासून आहे. 35 टक्के मिळाले की उत्तीर्ण आणि त्यापेक्षा कमी मिळाले की नापास हे रहाटगाडगे वर्षानुवर्षे सुरू आहे. बरेचसे विद्यार्थी विविध विषयांमध्ये 55 ते 60 गुण मिळवतात आणि एखाद्या विषयात जेमतेम 35 टक्के गुण मिळून काठावर उत्तीर्ण होतात. बारावीच्या निकालामध्ये आटपाडी तालुक्यातील कौठाळी गावचा हेमंत नावाचा युवक चर्चेचा विषय बनला आहे.या हेमंतने सर्व विषयांमध्ये 35 टक्के गुण मिळवून आपली नैया पार करून घेतली आहे.
प्रत्येक विषयात 35 टक्के गुण मिळाल्यामुळे त्याची उत्तीर्ण होण्याची टक्केवारीही 35 च आहे. एकही गुण जास्त नाही किंवा एकही गुण कमी नाही. हा चमत्कार हेमंतच्या आयुष्यात घडून आला आहे. उत्तीर्ण होणे महत्त्वाचे असते. खूप जास्त भरभरून मार्क मिळवणे हा त्याच्या पुढचा टप्पा असतो. काठावरून चालताना न घसरता तोल ठेवून चालणारा हेमंतसारखा एखादाच विद्यार्थी असतो, जो 35 टक्के पेक्षा एकही मार्क जास्त किंवा कमी घेत नाही.प्रत्येक विषयामध्ये 35 टक्के गुण मिळवण्याचा हेमंतचा हा एक विक्रमच असण्याची शक्यता आहे.
उत्तीर्ण होण्याचे प्रमाण खूप वाढलेले असले तरी शासनाला मात्र नापासांची चिंता करावी लागते. नापास झालेले लोक मानसिकरीत्या सैरभैर होण्याची शक्यता असते. ज्यांचे स्वतःचे घरचे व्यवसाय आहेत, ते लोक अभ्यासात फारसे लक्ष देत नाहीत, असे आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ वडिलांचे मोठे किराणा दुकान असेल तर मुलगा जेमतेम कसाबसा दहावी पास होतो आणि प्रौढ झालेल्या आपल्या वडिलांना घरी बसायला सांगून स्वतः गल्ल्यावर बसायला सुरुवात करतो. असे विद्यार्थी अभ्यासाच्या भानगडीत पडत नाहीत. ते जेमतेम शाळा म्हणजे दहावी संपेपर्यंत आणि पुढे सरकले तर बारावीपर्यंत शिक्षण घेऊन सोडून देतात आणि आपले व्यवसाय करायला लागतात. अशा जेमतेम टाईप विद्यार्थ्यांसाठी हेमंतने नवीनच विक्रम प्रस्थापित केला आहे आणि तो म्हणजे अचूक असे 35 टक्के गुण त्याने प्रत्येक विषयात घेतले आहेत. हाही महाराष्ट्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांचा एक नमुना म्हणावा लागेल.