Heatwave challenge | उष्माप्रकोपाचे आव्हान

Heatwave challenge |
Heatwave challenge | उष्माप्रकोपाचे आव्हान(Pudhari File Photo)
Published on
Updated on

एप्रिलच्या मध्यातच तापमानाचा पारा वेगाने वर सरकण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसांत देशाच्या मध्य आणि पूर्व भागांत उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा दिला आहे. नागपूर, भोपाळ, अमरावती आणि भुवनेश्वर यासारख्या शहरांत पारा 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दिल्ली-एनसीआरमध्ये यावेळी प्रथमच तापमान 40 अंशांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये 18 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार आहे. अकोल्यामध्ये राज्यातील उष्माघाताचा पहिला बळी गेला असून, किनारपट्टीच्या जिल्ह्यात यापूर्वीच संभाव्य रुग्ण आढळले आहेत. एकुणात पुढील दोन महिन्यांचा काळ स्वतःला सांभाळून राहण्याचा आहे. माणूस चंद्र, मंगळ अशी वारी करत सूर्यासमीप पोहोचला असला, तरी अद्याप निसर्गाचे ऋतुचक्र बदलण्यात त्याला यश आलेले नाही. उलट सुचारूपणाने चालणार्‍या निसर्गनियमांशी अनुकूल न राहता त्यामध्ये विकासाच्या गोंडस नावाखाली हस्तक्षेप केल्यामुळे हवामान बदल, पर्यावरणीय संकटे, विविध आपत्ती यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

‘आयपीसीसी’च्या अहवालानुसार, उष्णतेमुळे कामाच्या तासांत होणारी घट भारताच्या ‘जीडीपी’वर थेट परिणाम करत आहे. उष्णतेच्या लाटेचे निकष स्पष्ट आहेत. मैदानी प्रदेशात तापमान 40 अंश सेल्सिअस आणि डोंगराळ भागात 30 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले की, धोक्याची घंटा वाजते. जर तापमान 45 अंशांच्या पार गेले, तर ती थेट आपत्तीच ठरते. यंदाचा काळ पाहता, ‘अल निनो’चा प्रभाव आणि जागतिक तापमानवाढीची भर, यामुळे ही परिस्थिती अधिकच चिघळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ओडिशामध्ये 1998 यावर्षी भीषण उष्णता जाणवली होती. त्यामध्ये अधिकृतपणे 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरच भारतात उष्णतेच्या लाटांकडे नैसर्गिक आपत्ती म्हणून गांभीर्याने पाहिले जाऊ लागले. पुढील काळात आंध्र प्रदेशात 2003 मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेत तापमान 50 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले होते. 2010 मध्ये गुजरातेत हीटवेवने हाहाकार माजवला होता. अहमदाबादेत त्यावर्षीच्या मे महिन्यात तापमानाने 46.8 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने शेकडो जण मरण पावले होते.

याच घटनेनंतर 2013 मध्ये भारताचा पहिला ‘हीट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार झाला. 2015 ची उष्णतेची लाट ही भारताच्या इतिहासातील सर्वात घातक लाटांपैकी एक मानली जाते. त्याकाळात प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 2,500 हून अधिक बळी गेले होते. गेल्या तीन वर्षांत उष्णतेच्या लाटांचा कालावधी वाढला आहे. ‘लान्सेट’च्या अहवालानुसार, 1990 च्या तुलनेत भारत आता उष्णतेच्या लाटेला 15 टक्क्यांनी अधिक बळी पडत आहे. या आपत्तीचे स्वरूप बहुआयामी आहे. कडाक्याच्या उन्हात काम करणार्‍या शेतमजुरांपासून ते बांधकाम कामगारांपर्यंत सर्वांचीच कार्यक्षमता घटते. 2021 मध्ये भारताला यामुळे सुमारे 5.4 टक्के उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला होता. हे नुकसान कोणत्याही मोठ्या मंदीपेक्षा कमी नाही. उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि शेतीपुढील संकटे, यामुळे अर्थव्यवस्थेचा कणा असणार्‍या ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडून पडत आहे. जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) ताज्या अहवालांनुसार, उष्णतेची लाट ही आता प्रदीर्घ आणि तीव्र होत चालली आहे. जागतिकस्तरावर उष्णतेच्या लाटा नवीन क्षेत्रांमध्ये वेगाने पसरत आहेत आणि वर्षाच्या असामान्य काळातही त्या अनुभवायला मिळत आहेत.

‘आयपीसीसी’च्या निकषांनुसार, जागतिक तापमानवाढीमुळे भविष्यात या लाटांची वारंवारता आणि कालावधी अधिक वाढणार असून, त्यांचा विळखा अधिक घट्ट होत जाणार आहे. उष्णतेच्या लाटेचा सर्वात मोठा धोका रात्रीच्या वाढत्या तापमानामुळे निर्माण झाला आहे. दिवसाचे कमाल तापमान जेवढे महत्त्वाचे असते, तितकेच रात्रीचे किमान तापमानही आरोग्यासाठी निर्णायक ठरते. वैद्यकीयशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी हवा थंड झाल्यास मानवी शरीराला उष्णतेतून सावरण्यासाठी वेळ मिळतो; मात्र किमान तापमानातही वाढ होत राहिल्यास शरीराची ही नैसर्गिक पुनर्प्राप्ती प्रक्रिया थांबून उष्माघाताचा धोका वाढतो. गेल्या दशकभरामध्ये देशातील शहरीकरणाचा वेग कमालीचा वाढला आहे. कोरोना महामारीच्या काळात गावाकडे वळलेली स्थलांतरितांची पावले शहरांकडे वळून स्थिरावू पाहत आहेत. दाट लोकवस्ती आणि काँक्रीटच्या बांधकामांमुळे शहरे ही आजूबाजूच्या ग्रामीण भागापेक्षा 5 ते 10 अंश सेल्सिअसने अधिक उष्ण असतात. ‘डब्ल्यूएमओ’च्या मते, वाढत्या शहरीकरणामुळे ‘अर्बन हीट आयलंड’चा परिणाम अधिक तीव्र झाला असून, यामुळे केवळ मानवी आरोग्याबरोबरच वीजपुरवठा खंडित होणे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होण्यासारखे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.

जागतिक हवामान संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हवामान अंदाजाबरोबरच उष्णतेच्या लाटेचा लोकांच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होईल, याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले आणि बाहेर काम करणारे मजूर यांच्यासाठी हवामानाबाबतच्या पूर्वसूचना जीवनदायी ठरू शकतात. 2012 मध्ये चीनमध्ये सलग 70 दिवस चाललेली उष्णतेची लाट किंवा 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये जाणवलेली तीव्र उष्णता ही हवामान बदलाची स्पष्ट चिन्हे आहेत. वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर सामूहिक व संघटित प्रयत्नांची गरज आहे. वातावरणातील आर्द्रता, पाण्याचा खालावलेला दर्जा आणि वणवे यासारख्या समस्या उष्णतेच्या लाटेमुळे अधिक गुंतागुंतीच्या बनतात. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि निसर्गानुकूल उपाययोजना राबवणे हा एकमेव शाश्वत मार्ग उरला आहे. दुर्दैवाने, आर्थिक आणि राजकीय महत्त्वाकांक्षांमुळे पर्यावरणीय प्रश्नांना तिलांजली देत आहे. जागतिक महासत्तेचा अध्यक्ष स्वतः सर्व नियम धाब्यावर बसवून पर्यावरण करारातून बाहेर पडत असेल, तर अन्य देशांबाबत काय बोलायचे? युद्धसंघर्षादरम्यान पाणी प्रकल्प, वीज प्रकल्प, पायाभूत सुविधा, नैसर्गिक संसाधने यांचा विध्वंस करण्याच्या धमक्या देण्यापर्यंत वैचारिक पातळी खालावली असेल, तर उष्णतेच्या लाटांनी होणारी होरपळ अटळ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news