Healthy Sleep Lifestyle | चेहर्‍यावरील भाव, ताण ओळखून झोप सुधारेल

आरोग्यदायी झोप ही केवळ विश्रांतीसाठी नाही, तर जीवनशैलीसाठी महत्त्वाची आहे.
Healthy Sleep Lifestyle
चेहर्‍यावरील भाव, ताण ओळखून झोप सुधारेल(Pudhari File Photo)
Published on
Updated on

आशिष शिंदे

आरोग्यदायी झोप ही केवळ विश्रांतीसाठी नाही, तर जीवनशैलीसाठी महत्त्वाची आहे. सततच्या धावपळीत ताणतणाव वाढत असताना, झोप ही नुसती शरीराची गरज राहिलेली नाही, तर ती मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी एक आवश्यक टप्पा ठरत आहे; पण अनेकदा या ना त्या कारणामुळे झोपेच्या वेळा बिघडतात; मग काय थकवा, चिडचिड हे ठरलेलेच. अशावेळी वाटते, इतकी सारे गॅजेटस् आहेत; पण हातातील मोबाईल ठेव आणि झोप आता, असे सांगणारेही एक गॅजेट असावे. एक असे गॅजेट तयार झाले आहे, जे तुमच्या चेहर्‍यावरील भाव ओळखते. डोळ्यांखालील सूज, थकव्याची लक्षणे किंवा तणावाची चिन्हे दिसली की, लगेच घरातील वातावरणात बदल घडवते. प्रकाशाची तीव्रता कमी-जास्त करते, तापमान संतुलित ठेवते, सौम्य ध्वनी निर्माण करते व तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. इतकेच काय, तुमचा चेहरा स्कॅन करून ताणतणावाची माहिती गोळा करते व तुम्ही डोळे मिटावेत, बाहेर फेरफटका मारावा किंवा एखादा छोटा विरंगुळा घ्यावा, अशीही सूचना हे उपकरण देते.

या फेशियल ट्रेकिंग ट्रेस डिटेक्टर गॅजेटचा चेहरासद़ृश इंटरफेस त्याला अधिक आकर्षक बनवतो. काचेच्या गोळ्यात बसवलेला कॅमेरा चेहरा स्कॅन करतो आणि त्याच्या खालील ध्वनिशंकूमध्ये आवाज पकडण्याची क्षमता दडलेली आहे. चेहरा लुकलुकतो, स्मित देतो, भाव बदलतो आणि त्यामुळे हा यंत्रमानव अधिक जिवंत वाटतो. त्याच वेळी आवाजाचे सूक्ष्म कंपन टिपून त्यांचा उपयोग तणावाचे मोजमाप करण्यासाठी केला जातो.

हे उपकरण केवळ झोप सुधारण्यासाठीच नाही, तर दैनंदिन आयुष्य अधिक संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. एका अ‍ॅपच्या साहाय्याने हे स्मार्टफोन व इतर वेअरेबल्सशी जोडले जाते. पाणी पिण्याचे प्रमाण, झोपेचे तास किंवा दिवसभरातील मोबाईल वापर कमी करणारे इतर घटक नोंदवले जातात. यात आणखी एक खास फीचर म्हणजे संपूर्ण दिवसाचा वैयक्तिक वेलनेस रिपोर्ट. वापरकर्त्याच्या भावनिक आणि शारीरिक संकेतांचे विश्लेषण करून अ‍ॅप दिवसअखेर एक छोटा अहवाल तयार करते. त्यात किती वेळ ताण जाणवला, किती वेळ शरीर रिलॅक्स होते आणि पुढच्या दिवसासाठी कोणते बदल उपयुक्त ठरतील याची माहिती देते. झोपेच्या आधी हे उपकरण स्लीप मोड सक्रिय करते.

Healthy Sleep Lifestyle
World Watch | ‘ट्रम्प स्लंप’चा अमेरिकेच्या पर्यटनाला फटका

मंद उजेड, थंडावा देणारे वातावरण आणि मऊ स्वरातील संगीत, यामुळे मन शांत होते आणि झोप पटकन लागते. सकाळी उठवताना मात्र हे गॅजेट गजराऐवजी सौम्य सूर आणि प्रकाश वापरते, ज्यामुळे दिवसाची सुरुवात शांततेत होते. या तंत्रज्ञानाचा मुख्य हेतू चेहरा ओळखण्याच्या विद्यमान तंत्राला निगराणीपुरते न ठेवता त्याचा वापर सकारात्मकतेसाठी करणे हा आहे. ताण, चिंता यांचे मोजमाप करून वातावरण आपोआप बदलणे, झोपेची सवय सुधारण्यासाठी नवी दिशा देणे हा या डिव्हाईसचा गाभा आहे. सध्या बाजारात झोपेवर लक्ष ठेवणारे अनेक वेअरेबल्स उपलब्ध आहेत. मात्र, घरगुती वातावरणाशी जुळवून घेत झोपेच्या सवयी सुधारण्याचे सामर्थ्य या उपकरणात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news