Guruji To Sir | गुरुजी, यू टू?

आजकाल ‘गुरुजी’ म्हटलेले कोणाला फारसे आवडत नाही. त्याऐवजी ‘सर’ हा शब्द प्रचलित झालेला आहे.
Guruji To Sir
गुरुजी, यू टू?(Pudhari File Photo)
Published on
Updated on

आजकाल ‘गुरुजी’ म्हटलेले कोणाला फारसे आवडत नाही. त्याऐवजी ‘सर’ हा शब्द प्रचलित झालेला आहे. कोणी एकेकाळी शाळेत शिकविणार्‍या प्रत्येक व्यक्तीला गुरुजी म्हटले जात असे. गुरुजी या शब्दामध्ये गुरू हा शब्द अंतर्भूत आहे. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण जीवन घडविणारा तो गुरुजी, असे वर्तनही गुरुजींचे असे. वेळप्रसंग आला तर किंवा विद्यार्थ्याचे काही चुकीचे वागणे झाले तर गुरुजी त्याला शिक्षा करत. विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्यासाठी गुरुजी शाबासकीही देत. सौम्य शिक्षा आणि भरपूर शाबासकी देऊन अनेक शिक्षकांनी या देशातील अनेक पिढ्या घडविल्या आहेत.

अलीकडच्या काळात शैक्षणिक अर्हता असली तरी शिक्षक म्हणून नोकरी मिळण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या व्यक्तीलाच शिक्षकाची कायमस्वरूपी नोकरी मिळते. या परीक्षेचे पेपर फोडणार्‍या टोळीला नुकतीच कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. टोळी हा शब्द सहसा चोरांची टोळी, घरफोडी करणार्‍यांची टोळी, गुन्हे करणार्‍यांची टोळी किंवा एकंदरीतच वाममार्गाला लागलेल्या व्यक्तींची टोळी असते. जे शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करू नका म्हणून सांगतात, परीक्षा सुरळीत व्हाव्यात म्हणून जे स्वतः सुपरव्हिजन करतात, तेच शिक्षक एखाद्या परीक्षेत पास होण्यासाठी पेपर फोडण्यापर्यंत जात असतील तर काय बोलायचे? अर्थात अनेक सन्माननीय शिक्षकांचा अपवाद याला आहेच. तसा तो नेहमीच असतो. पण, इथे टीईटी पेपर फोडणार्‍या टोळीमध्ये चक्क पाचजण शिक्षक होते.

Guruji To Sir
Pudhari Editorial : वर्चस्वाचा खेळ!

टीईटी परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षार्थी मंडळींना हे लोक तीन लाख रुपये घेऊन पेपरची झेरॉक्स देणार होते. पुन्हा कोणी पैसे देईल न देईल, यासाठी लोकांकडून कोरे चेक म्हणजे धनादेशही घेऊन ठेवण्यात आले होते. यामुळेच आम्हाला शाबास गुरुजी असे म्हणावेसे वाटते. टोळीमध्ये असणार्‍या पाच शिक्षकांना आमचे वंदन. तीन लाख रुपये देऊन गुरुजी होण्यासाठी तयार असणार्‍या भावी शिक्षकांनाही आमचे कोपरापासून दंडवत. आपल्या विद्यार्थ्यांना ‘सर्व’ प्रकारे तयार करण्याची या शिक्षकांची तयारी पाहता या सर्वांना पुरस्कार देऊन गौरवले पाहिजे.

अभ्यास करा, गृहपाठ करा, वर्गात लक्ष देऊन शिक्षण घ्या, या सर्वांपेक्षा उत्तीर्ण होण्याचा ‘सोपा मार्ग’ गुरुजींनी सर्व विद्यार्थ्यांना शिकवला आहे हे निश्चित. हा सोपा मार्ग म्हणजे काहीही न करता पैसे खर्चून पेपर फोडा आणि उत्तीर्ण व्हा. टीईटी परीक्षेचा पेपर फोडणारे असे गुरुजी आणि हा फोडलेला पेपर मिळवून परीक्षा उत्तीर्ण होणारे गुरुजी हे या देशाचे भवितव्य कसे घडवणार? अशावेळी चांगले शिक्षक, पालक आणि विद्यार्थी आणि प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी मोठी ठरते. कारण एक शिक्षक चुकला तर एक अख्खी पिढी बिघडू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news