

युवराज इंगवले
आयुष्य पुन्हा सुरू करण्यासाठी कधीही उशीर होत नाही, असे आपण अनेकदा ऐकतो. पण या वाक्याला प्रत्यक्षात जगणारे फार कमी लोक असतात. महान मॅरेथॉनपटू फौजा सिंग हे याच दुर्दम्य इच्छाशक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. वयाच्या 114 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे जीवन हे विलक्षण जिद्दीचे आणि प्रेरणादायी संघर्षाचे प्रतीक होते. वयाच्या 89 व्या वर्षी दुःखावर मात करण्यासाठी धावण्यास सुरुवात करणार्या या अवलियाने वयाच्या शंभरीत मॅरेथॉन पूर्ण करून जगाला अचंबित केले.
फौजा सिंग यांचा जन्म 1 एप्रिल 1911 रोजी पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील ब्यास पिंड गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. जन्मानंतर पाच वर्षांपर्यंत ते चालू शकत नसल्याने कुटुंबाला ते अपंग असल्याची भीती वाटत होती. त्यांचे पाय इतके कमजोर होते की, त्यांना जास्त अंतर चालणेही कठीण जायचे. 1992 मध्ये पत्नीच्या निधनानंतर ते इंग्लंडला मुलाकडे स्थायिक झाले. पण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना 1994 मध्ये घडली. त्यांचा पाचवा मुलगा कुलदीपच्या अपघाती निधनानंतर त्यांना धक्का बसला. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी धावण्याचा मार्ग निवडला.
सुरुवातीला केवळ विरंगुळा म्हणून धावणार्या फौजा सिंग यांनी वयाच्या 89 व्या वर्षी, 2000 मध्ये लंडन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि 6 तास 54 मिनिटांत पहिली मॅरेथॉन पूर्ण केली. या कामगिरीमुळे त्यांनी 90 वर्षांवरील वयोगटातील आधीचा विश्वविक्रम सुमारे 58 मिनिटांनी मोडला. त्यानंतर फौजा सिंग यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘टर्बनेड टोरनॅडो’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्या या धावपटूने न्यूयॉर्क, टोरांटो आणि मुंबईसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. 2003 मध्ये टोरोंटो वॉटरफ्रंट मॅरेथॉन 5 तास 40 मिनिटांत पूर्ण करून त्यांनी सर्वोत्तम वेळ नोंदवली. 2011 मध्ये वयाच्या 100 व्या वर्षी, फौजा सिंग यांनी कॅनडातील टोरांटो येथे झालेल्या एका विशेष स्पर्धेत एकाच दिवसात 8 विश्वविक्रम नावावर केले. 16 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांनी टोरांटो वॉटरफ्रंट मॅरेथॉन 8 तास 11 मिनिटे आणि 6 सेकंदात पूर्ण केली.
यासह ते मॅरेथॉन पूर्ण करणारे जगातील पहिले सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले. मात्र, 1911 साली भारतात जन्मनोंदणीची अधिकृत पद्धत नसल्याने जन्मदाखला सादर करू न शकल्याने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्ने या विक्रमास अधिकृत मान्यता दिली नाही. तरीही त्यांच्या पासपोर्टवर त्यांची जन्मतारीख 1 एप्रिल 1911 अशीच आहे आणि खुद्द ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी त्यांना 100 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पत्र पाठवले होते. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मशालवाहक होण्याचा मान मिळवलेल्या फौजा सिंग यांनी वयाच्या 101 व्या वर्षी स्पर्धात्मक धावण्यामधून निवृत्ती घेतली.. डेव्हिड बेकहॅम आणि मोहम्मद अली यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी एका प्रसिद्ध स्पोर्टस् ब्रॅंडच्या जाहिरातीतही काम केले. त्यांच्या जीवनावर आधारित टर्बनेड टोरनॅडो नावाचे पुस्तक 2011 मध्ये प्रकाशित झाले असून, दिग्दर्शक ओमंग कुमार बी यांनी त्यांच्यावर फौजा नावाच्या बायोपिकची घोषणा केली आहे. फौजा यांची कहाणी केवळ धावण्यापुरती मर्यादित नाही, तर ती इच्छाशक्तीचा एक आविष्कार आहे. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे आणि खरी शक्ती तुमच्या मनात असते, असे त्यांनी दाखवून दिले.