

इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेला मान्यता देण्याचा निर्णय शासनाने तत्काळ मागे घेतला, असे दिसत आहे. आम्हास एक समजत नाही की काही एक निर्णय घेतल्यानंतर निश्चित गदारोळ होणार आहे हे मंत्रिमहोदयांना समजत नाही की काय? शिक्षण खात्यामध्ये जे कोणी तथाकथित तज्ज्ञ आहेत त्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी सारासार विचार केला होता की नाही हे समजण्यास मार्ग नाही. आधीच मराठी भाषेबद्दल लोकांच्या अस्मिता टोकदार असताना पुन्हा त्याच लोकांवर हिंदी लादणे हे निश्चितच वाद-विवादाला निमंत्रण होते आणि त्याप्रमाणे झालेही. आपण आपल्या भाषा, आपल्या प्रांताच्या भाषा, राष्ट्रभाषा, इंग्रजी भाषा अशी चर्चा करत असताना चीनसारखा झपाट्याने प्रगती करणारा देश मात्र वेगळाच निर्णय अमलात आणत आहे. साहजिकच या ठिकाणी भारत आणि चीन यांची तुलना करण्याचा मोह होतो.
चीनमधून अमेरिकेत आयात होणार्या मालावर अमेरिकन सरकारने जबर कर लावला त्याला न जुमानता चीनने जशास तसे उत्तर दिले. चीन अमेरिकन दादागिरीला अजिबात घाबरून गेला नाही, याचे कारण म्हणजे त्यांची मजबूत असलेली अर्थव्यवस्था. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था तेव्हाच मजबूत होईल जेव्हा शिक्षण व्यवस्था मजबूत असते. आपल्याकडे भाषिक गदारोळ सुरू असताना चीनने इयत्ता पहिलीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच ‘एआय’चा वापर करणे सक्तीचे केले आहे.
उद्या चालून जगावर राज्य करायचे असेल तर आपला प्रत्येक विद्यार्थी या नवीन तंत्रज्ञानाशी ओळख असलेला असलाच पाहिजे, हा चीनचा आग्रह आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रामध्ये जगात आपण अग्रेसर असले पाहिजे, या द़ृष्टीने प्राथमिक शिक्षणामध्ये चीनने ‘एआय’ची बाराखडी मुलांना शिकवायला सुरुवात केली आहे. सहा वर्षे व त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेत कृत्रिम तंत्रज्ञान शिकणे सक्तीचे केले आहे.
मुलांनी या तंत्रज्ञानाची तोंडओळख लहान वयात करून घेतली पाहिजे म्हणजेच त्यांचे मूलभूत कौशल्य विकसित होईल, या उद्देशाने शालेय जीवनापासून या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. चीनच्या या योजनेनुसार प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुले वर्षभरात किमान आठ तास ‘एआय’चे धडे अभ्यासणार आहेत. यासाठी शाळांना सध्याच्या विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानासारख्या विषयांमध्ये ‘एआय’चा अभ्यासक्रम समाविष्ट करण्याची किंवा स्वतंत्र विषय म्हणून त्याचा समावेश करण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे.
याचा साधा सोपा अर्थ म्हणजे चीनमधील सहा वर्षांची मुले ही चॅटबॉटचा वापर करण्यास शिकतील आणि माध्यमिक अभ्यासक्रमामध्ये ते प्रत्यक्ष अनुभव, नावीन्यपूर्ण प्रकल्प, तसेच प्राथमिक पातळीवरील प्रोग्रामिंग व मशिन लर्निंगचा वापर शिकून घेतील... जगभरातील अनेक देश ‘एआय’चे महत्त्व ओळखून त्यांच्या शैक्षणिक चौकटीत ते सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.