Dashavatar Artists | दशावताराला दिलासा!

Dashavatar Artists |
Dashavatar Artists | दशावताराला दिलासा!
Published on
Updated on

गणेश जेठे

दशावतारी कलाकारांना आता सरकारचा आधार मिळणार आहे. यामुळे कोकणच्या सांस्कृतिक वारशाला नवी उभारी मिळेल.

विष्णूचे दहा अवतार दशावतार... एक नाट्यप्रयोग! लिखित संहिता नसलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक पारंपरिक कलाविष्कार. रंगमंचावर स्‍वयंस्‍फूर्तीने संवादफेक करत पुराणातले अनेक प्रसंग उभे करून रसिकांची मने जिंकणारे दशावतारी कलाकार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गावागावात आहेत. ‘दशावतार’ हेच त्यांचे जीवन. रंगमंचावर दोन्‍ही पाय घट्ट रोवून दमदार संवादफेक हेच या कलाकारांचे ध्येय आणि रसिकांच्या टाळ्या, शिट्ट्या वाजवून दिलेली दाद हीच त्यांची भूक. एकशेवीसपेक्षा अधिक दशावतारी नाट्य मंडळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कलेची सेवा करतात. दोन हजारपेक्षा अधिक कलाकारांनी दशावतारासाठी वाहून घेतले आहे. कोकणचा हा सांस्कृतिक ठेवा जतन करत ध्येयवेड्या कलाकारांनी तो समृद्ध करण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे सुरू ठेवला आहे.

पंधराव्या शतकात या कलेचा उगम झाला. एकेकाळी उघड्या जमिनीवर आरंभलेला दशावतार त्यानंतर थांबला नाही. ज्यांनी पहिल्यांदा गदा हातात घेतली, त्यांच्या वारसदारांनी ती कधी खाली ठेवली नाही. अनेक अडथळे पार करत या कलेला आजवर प्रवाहित ठेवले. कुणी राजा, कुणी नारद, कुणी विनोदी संकासुर, कुणी विष्णू, कुणी ब्रह्मदेव तर कुणी राणी, कुणी राजकन्या... प्रत्येक कलाकार जीव ओतून पात्र साकारत आला. स्‍त्री भूमिकेतील तरुणाला कुणीही ओळखू शकणार नाही. आता स्‍त्रियाही सहभाग घेतात. रात्री ॲल्युमिनियम ट्रंकमधून वेशभूषा, दागिने, मुकूट, रंगभूमीचे साहित्य काढायचे आणि स्वतःच मेकअप करत रंगमंचावरील एन्ट्रीसाठी सज्‍ज व्‍हायचे हे या कलेचे एक वैशिष्ट्य. रात्रीच्या नाटकात राजाची भूमिका करणाऱ्या कलाकाराला सकाळी तीच ट्रंक डोकीवर घेऊन चालावे लागते तेव्हा ‘रात्रीचा राजा आणि सकाळी डोकीवर बोजा’ अशा शब्दांत कलाकारांच्या वेदनाही बाहेर पडल्‍या. या वेदनांवर फुंकर घालायचे काम यापूर्वी झाले नाही असे नाही. दशावतारी नाट्य महोत्सव आयोजनापासून कलाकारांना मानधन देण्यापर्यंत आणि दशावतारी नाट्य मंडळांना वाहने पुरविण्यापासून त्यांना सतत प्रोत्साहन मदत करण्यापर्यंतचे काम सरकार करत आले. परंतु काळ बदलला.

मध्यरात्री सुरू झालेला दशावतार पार पहाट उजाडेपर्यंत बहरत जातो. मनोरंजनात आकंठ बुडालेल्या मालवणी माणसाला उजेड पडला आहे याचे भानही राहात नाही. म्हणून लग्नसमारंभ, बारसे, पूजा, वर्धापन दिन व इतर कार्यक्रमांमध्ये तीन तासाचाच प्रयोग होतो. आता या कलाकारांनी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून कोल्हापूर, पुणे, मुंबईत प्रयोग सुरू केलेत. प्रत्येक मंडळात १२ ते १५ कलाकार नाटक सादर करतात. प्रमुख कलाकाराला एका रात्रीचे पाचशे ते सातशे रुपये मिळतात. नव्या पिढीतले कलाकारही परंपरा पुढे नेत आहेत.

पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांच्या उजेडात रात्र जागवणारा हा दशावतार आता एलईडीच्या प्रकाशझोतात आला. लाईट इफेक्टस्‌ आले. साध्या रंगमंचाऐवजी पडदे, सेट आले. त्यामुळे दशावतार अधिक खुलू लागला आहे. पारंपरिक पुराणकथा हा या कलेचा आत्मा. पण त्यातून आता सामाजिक, राष्ट्रभक्ती, पर्यावरण संवर्धन आणि व्‍यसनमुक्‍तीचे संदेशही पोहोचत आहेत. उच्‍चशिक्षित तरुणसुद्धा या कलेकडे ओढले गेले. फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्रामवर दशावतारी कला व्‍हायरल होऊ लागली आहे. पौराणिक कथांमधील थरार आणि राजा व राक्षसामधील युद्धाची दृश्ये रसिकांच्या टाळ्या मिळवत आहेत. जग बदललं, इतर भाषा वरचढ झाल्या तरी या कलाकारांनी आपली मालवणी बोली दूर लोटली नाही. नाटकात किमान एक तरी पात्र असते, जे मालवणी भाषेत धमाल उडवून देते. दहिकाला म्हटले की दशावतारी नाटक आलेच. ही परंपरा, संस्कृती आर्थिक संकटांशी सामना करत नव्या पिढीतल्या कलाकारांनी टिकवून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला आहे. या कलाकारांना सरकारने पुन्हा एकदा मजबूत हात देऊ केला आहे. सध्या विधिमंडळ अधिवेशनात कोकणातले आमदार नीलेश राणे यांनी या कलावंतांची धडपड, वेदना सरकारसमोर मांडल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या कलाकारांना आर्थिक सहाय्य जाहीर केले. कला मंडळाला वर्षासाठी ५० हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत. वृद्ध कलाकारांनाही मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे आता रात्रीचा राजा सकाळीही राजाच असेल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news