

मतदारसंघ पुनर्रचना-महिला आरक्षण अशा जोड विधेयकावर सहा महिन्यांपूर्वी एनडीए सरकारला लोकसभेत पराभव पत्करावा लागला होता. प्रत्येक राज्यात लोकसभेचे पन्नास टक्के मतदारसंघ वाढविणारे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारने आजपासून संसदेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. सरकारच्या कुशल रणनीतीपुढे इंडिया आघाडीमध्ये मोठी फाटाफूट झाली. देशहिताचा विचार करून या विधेयकाला शरद पवार, एम. के. स्टॅलिन, जगनमोहन रेड्डी तसेच तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या वीस खासदारांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे लोकसभेच्या ५४३ जागांवरून ८१५ जागा निर्माण करणारे विधेयक मंजूर होणे सरकारला सुलभ झाल्याचे दिसते. सहा महिन्यांपूर्वी ज्या विरोधी पक्षांनी मतदारसंघ पुनर्रचना-महिला आरक्षण विधेयकाला कडाडून विरोध केला, त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, हे लक्षात घ्यावे लागेल. या कारणाने विरोधकांमध्ये मोठी फूट पडल्यामुळे हे विधेयक मंजूर होणे दृष्टिक्षेपात आले आहे. काँग्रेस पक्ष संसदेत एकाकी पडण्याची शक्यताही दिसू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 'एक्स'वर एक व्हिडीओ पोस्ट केला. नारीशक्तीला सहभाग मिळवून देण्याची लढाई अनेक दशकांपासून चालू आहे.
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षांना देशातील नारीशक्तीचा संसदेत व विधानसभेत सहभाग वाढविण्यापासून कधीही रोखता येणार नाही. फक्त वेळेची प्रतीक्षा आहे. पंतप्रधानांनी महिलांच्या मुद्द्यावर विरोधकांचा कल तपासताना राजकीय डावपेच टाकला, हे उघड आहे. मतदारसंघ पुनर्रचना-महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक सरकारच्या वतीने यावेळी पुन्हा मांडले जाईल. याच वर्षी १६ ते १८ एप्रिल २०२६ या काळात सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते; पण विरोधी पक्षांच्या एकजुटीपुढे हे विधेयक २९८ विरुद्ध २३० अशा मतांनी फेटाळले गेले. सरकारला दोन तृतियांश बहुमत मिळविण्यासाठी ५४ मते कमी पडली. गेल्या बारा वर्षांत मोदी सरकारचा संसदेत प्रथमच असा मोठा पराभव झाला; पण यापासून सरकारने धडा घेतला. सरकारने अगोदर आश्वासन दिल्याप्रमाणे प्रत्येक राज्यात लोकसभा मतदारासंघ ५० टक्क्यांनी वाढतील अशी तरतूद या विधेयकात असेल. त्यामुळेच विरोधी पक्षातील अनेकांचा विरोध मावळला. महिला आरक्षणाला कोणत्याच राजकीय पक्षांचा विरोध उरलेला नाही; पण मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला जोडून पुन्हा महिला आरक्षण विधेयक मांडले जात आहे म्हणून विरोध केला जात आहे.
लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक २०२३ मध्ये संसदेने मंजूर केले. लोकसभेत ४५४ विरुद्ध २ मतांनी ते मंजूर झाले, तर राज्यसभेत उपस्थित असलेल्या सर्व २१४ सदस्यांनी महिला आरक्षणाला समर्थन दिले. जनगणनेनंतर मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावर महिला आरक्षण लागू होईल, हीच त्यात मोठी अडचण होती. २०२७ मध्ये जनगणना झाल्यावर मतदारसंघ पुनर्रचना होणार व त्यानंतर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणे कसे शक्य आहे, हा खरा पेच होता. म्हणून सरकारने २०११ ची जनगणना आधारभूत मानून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणले व त्याला महिला आरक्षणाची जोड देऊन मंजुरीसाठी पुन्हा विशेष अधिवेशन बोलावले. २०२७ मध्ये जनगणना होणार असताना २०११ ची जनगणना आधारभूत मानणे यालाही विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. वाढलेल्या लोकसंख्येवर आधारित मतदारसंघ पुनर्रचनेचा लाभ उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांना होईल व लोकसंख्या कमी असलेल्या दक्षिणेतील राज्यांचे नुकसान होईल असे काँग्रेस पक्ष सतत सांगतो आहे. मतदारसंघ पुनर्रचना मंजूर झाल्यास दक्षिणेतील राज्यांचे मतदारसंघ उत्तरेतील राज्यांच्या तुलनेने कमी वाढतील व उत्तर- दक्षिण अंतर वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेनुसार नव्या निकषांतील नोंदी होणाऱ्या घटकांना त्यात सामावून कसे घेणार, असाही प्रश्न विचारला जातो. हिंदी भाषिक मोठ्या राज्यांत भाजपची सत्ता व प्रभाव आहे. त्या राज्यात मतदारसंघ वाढल्याने केंद्रात भाजपची शक्ती अधिक वाढेल, असा युक्तिवाद केला जात आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या ५४३ लोकसभा मतदारसंघांतच महिला आरक्षण लागू करावे, असा आग्रह काँग्रेसकडून धरला जात आहे; पण अन्य विरोधी पक्षांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद बघता एनडीए सरकार आता माघार घेण्याची शक्यता दिसत नाही. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा सरकारला या निमित्ताने काढायचा आहे आणि परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना)-महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांवर मात करायची आहे. लोकसभेत तीन जागा रिक्त आहेत. त्यामुळे ५४० सदस्यांच्या सभागृहात दोन तृतियांश बहुमत साध्य करण्यासाठी विधेयकाच्या समर्थनार्थ ३६१ मते मिळणे आवश्यक आहे. एप्रिल महिन्यात लोकसभेत या विधेयकावर झालेल्या मतदानावेळी एनडीएकडे २९८ मते होती. आता एनडीएची सदस्य संख्या ३२० आहे. त्यामुळे दोन तृतियांश मतांनी विधेयक मंजूर करण्यासाठी आणखी ४१ मतांची गरज आहे. द्रमुकच्या २२ खासदारांचे समर्थन स्टॅलिन यांनी जाहीर केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, तृणमूल काँग्रेसचे २०, तसेच काही लहान पक्षांचे व अपक्षांचे समर्थन सरकारला मिळणे अपेक्षित आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत तामिळनाडूचा ७.२ टक्के वाटा कायम असावा अशी द्रमुकची अपेक्षा आहे, तर सर्व राज्यात समान ५० टक्के जागा वाढाव्यात असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले; पण नियमित होणारे हिवाळी अधिवेशन कधी, याचा मागमूस नाही, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेत २७२ जागा महिलांसाठी आरक्षित असतील. फेब्रुवारी-मार्च महिन्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. या राज्यांतील निवडणुकांमध्ये महिलांना आरक्षण आम्हीच मिळवून दिले, असे भाजपला सांगण्याची मोठी संधी प्राप्त होईल. जे संसदेत विरोध करतील ते महिला आरक्षणविरोधी आहेत, असा प्रचार केला जाईल. परिसीमन-महिला आरक्षण विधेयकाची संसदीय लोकशाहीत ऐतिहासिक वाटचाल म्हणून नोंद होईल.