

जून महिना जवळ आला की शासकीय कर्मचार्यांना बदल्यांचे वेध लागतात. आपल्याला हवी त्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी यासाठी अर्थपूर्ण वाटाघाटी करण्याची प्रथा तशी जुनीच आहे. मंडळी, शासकीय स्तरावर बदल्या का होत असतील किंवा बदल्या करणे का आवश्यक असेल याची असंख्य कारणे असतात. एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्यांचे हितसंबंध स्थानिक पातळीवर तयार झालेले असतात. यामधून बर्यापैकी आर्थिक देवाण-घेवाण होत असते. हे परस्पर हितसंबंध तोडण्यासाठी दर तीन वर्षांनी बदल्या केल्या जातात. तसे पाहण्यास गेले तर कुणाही कर्मचार्याला बदल्या नको असतात. बदली होणारच असेल तर ती आपल्या सोयीच्या गावी व्हावी यासाठी कर्मचार्यांचा आग्रह असतो.
सोयीच्या गावी म्हणजे आपल्या मूळ घराच्या गावापासून दूर बदली झाली तर बरेचदा कर्मचार्यांना एकटे राहावे लागते. मुलाबाळांचे शिक्षण, त्यांचे महत्त्वाचे वर्ग हे सर्व बघून घर न हलवता कर्मचारी स्वतःच हलतो आणि बदलीच्या ठिकाणी रुजू होतो. बदलीचे ठिकाण दूरवर असेल तर तो आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार-रविवारी आपल्या घरी जात असतो. बदलीचे ठिकाण 40 ते 50 किलोमीटरवर असेल तर तो रोज अपडाऊन करत असतो. जे चालले ते बरे आहे असे त्याला वाटत असते. परंतु तीन वर्षांनंतर बदली होणे टळणार नसते.
आपल्याला पाहिजे त्या गावात बदली मिळण्यासाठी कर्मचारी मंडळी साधारण मार्चपासूनच कामाला लागतात. हे कामाला लागणे म्हणजे आपल्या ओळखीतील पुढारी किंवा अधिकारी यांच्या मदतीने आपले प्यादे पुढे दामटणे आहे. हा खेळ तसे पाहता अवघडच.
बदल्यांमध्ये होणारी देवाण-घेवाण टाळण्यासाठी शासनाने सामोपचाराने ऑनलाईन पद्धतीने बदल्या हा नवीन प्रकार आणला हे स्वागतार्ह आहे. जिल्हाधिकारी किंवा जिल्हा कार्यकारी अधिकारी बदलीसाठी निश्चित झालेल्या कर्मचार्यांशी थेट संवाद साधून त्यांना आपसात बोलायला लावून शक्यतो जिथे पाहिजे तिथे बदली देण्याचा प्रयत्न करतात.
अनेक जिल्हाधिकारी यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. एका मोठ्या सभागृहात सर्व इच्छुकांना समोर बसवले जाते आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बदल्या केल्या जातात. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्यांना या प्रक्रियेमुळे मोठाच धक्का बसतो तर कोणताही वशिला नसलेले कर्मचारी या प्रक्रियेमुळे सुखावत असतात. अशीच बदल्यांची पद्धत शिक्षक मंडळींसाठीही राबवली जाते. याचे स्वागत केले पाहिजे. कर्मचार्यांमध्ये संख्येच्या दृष्टीने पाहिले तर प्रत्येक दुसरा कर्मचारी शिक्षक आहे. याचा अर्थ 50 टक्के कर्मचारी हे शिक्षक वर्गात मोडतात. अशा सर्व गुरुजींना सोयीस्कर पोस्टिंग दिली तर ते अध्यापनाचे काम अधिक तत्परतेने आणि एकाग्रतेने करू शकतील यात शंका नाही.